You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
औरंगाबादचं नाव बदलण्यास काँग्रेसचा ठाम विरोध - बाळासाहेब थोरात #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1) औरंगाबादचं नाव बदलण्यास काँग्रेसचा ठाम विरोध - थोरात
"शहरांची नावं बदलून विकासाचे प्रश्न सुटत नाहीत. काँग्रेस पक्षाचा भर जनतेचे प्रश्न सोडवण्यावर, विकासाची काम करण्यावर आहे," अशी भूमिका मांडत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराला विरोध केला. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, "औरंगाबादचे नाव बदलण्याचा विषय आमच्याकडे चर्चेसाठी आलेला नाही. ज्यावेळी समन्वय समितीमध्ये हा विषय चर्चेला येईल त्यावर काँग्रेस भूमिका मांडेल परंतु नाव बदलण्यास काँग्रेस पक्षाचा ठाम विरोध आहे."
औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थोरातांनी पक्षाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
"राज्यात तीन पक्षाचे सरकार हे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आले आहे. हे सरकार किमान समान कार्यक्रमावर चालते. यात शहरांची नावं बदलण्याचा मुद्दा नाही," असं थोरातांनी सांगितलं.
तसंच, औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष ताकदीने उतरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
2) 30 जानेवारीला पुण्यात एल्गार परिषद होणारच - कोळसे पाटील
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध 31 जानेवारीपर्यंत वाढवले असतानाच, एल्गार परिषदेचे आयोजक आणि माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी पुण्यात 30 जानेवारी 2021 ला एल्गार परिषद आयोजित करणार असल्याची घोषणा केली. दैनिक सकाळनं ही बातमी दिली आहे.
येत्या 30 जानेवारीलाच पुण्यातील गणेश कला क्रीडा सभागृहात एल्गार परिषद घेण्यात येणार आहे, अशी माहिती बी. जी. कोळसे पाटील यांनी दिली.
यापूर्वी 31 डिसेंबर 2020 रोजी एल्गार परिषदेच्या आयोजनासाठी परवानगी मागण्यात आली होती. मात्र, पुणे पोलिसांनी परवानगी देण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता कोळसे पाटलांनी नवी तारीख जाहीर केलीय.
3) पुढच्या वर्षाचा अंदाज बांधणं अवघड - उद्धव ठाकरे
नवीन वर्षानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे राज्यातील जनतेला सदिच्छा दिल्या आहेत. नवीन वर्ष आरोग्यदायी होण्यासाठी स्वयंशिस्तीचा निर्धार करण्याचं आवाहन ठाकरेंनी केलं. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
"पुढील काळ कसा असेल याचा अंदाज बांधता येणे अवघड आहे. लस आपल्यापर्यंत येईल आणि ती सर्वांना मिळेल हा एक भाग झाला. पण दरम्यान कोरोना विषाणूच्या बदलत्या रुपामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीचाही आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल," असं उद्धव ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे.
यंदाच्या वर्षी करोनाला पूर्णपणे हद्दपार करण्याचा आणि आपल्या वैयक्तिक आरोग्याबरोबरच इतरांच्या आरोग्याची काळी घेण्याचा संकल्प नवीन वर्षात करुयात, असं आवाहनही त्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.
4) केरळ विधानसभेत कृषी कायद्यांविरोधात प्रस्ताव, भाजपचाही पाठिंबा
केरळ विधानसभेत केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करणारा प्रस्ताव मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मांडला. यासाठी विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. द हिंदूनं ही बातमी दिली आहे.
विशेष म्हणजे, या प्रस्तावावरील भाषणादरम्यान भाजपचे आमदार ओ. राजगोपाल यांनी काही मुद्द्यांविरोधात भाष्य केलं. मात्र, ज्यावेळी प्रस्तावावर मतदान करण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी विरोध केला नाही.
केंद्र सरकारने नवीन कायदे रद्द करावेत, असं प्रस्तावात म्हटलंय. कुठल्याही विरोधाविना हा प्रस्ताव केरळ विधानसभेत मंजूर झाला.
5) EPF च्या 6 कोटी खातेधारकांना एकदाच व्याज मिळणार
कर्मचारी भविष्य निधी (EPF)च्या 6 कोटी खातेधारकांना 2019-20 वर्षासाठीचा एकदाच 8.5 टक्के व्याज मिळेला, अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी दिली. एनडीटीव्हीने ही बातमी दिलीय.
याआधी 9 सप्टेंबर 2020 ला EPFO च्या केंद्रीय मंडळाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर म्हटलं होतं की, 31 डिसेंबर 2020 नंतर EPF नंतर खातेधारकांना व्याजाचा एक भाग दिला जाईल.
कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला असून, यासंबंधी औपचारिक अधिसूचनेलाही मंजुरी देण्यात आलीय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)