CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा 4 मेपासून सुरू होणार

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा 4 मे 2021 पासून सुरू होणार आहेत, अशी घोषणा भारताचे शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे.

CBSE बोर्ड परीक्षांच्या तारखांची घोषणा आज (31 डिसेंबर) संध्याकाळी 6 वाजता जाहीर करणार असल्याचं पोखरियाल यांनी सांगितलं होतं. त्यानुसार पोखरियाल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन तारखांची घोषणा केली.

त्यानुसार, CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा 4 मे 2021 पासून सुरू होतीलय. 10 जूनपर्यंत या परीक्षा संपवण्यात येतील. परीक्षेचा निकाल 15 जुलैपर्यंत लावण्यात येणार आहे.

बोर्डच्या प्रात्यक्षिक परीक्षा 1 मार्चपासून सुरू होतील, असंही पोखरियाल यांनी सांगितलं.

साधारणपणे, CBSE बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा जानेवारी महिन्यात घेतल्या जातात, तर बोर्डाच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होतात. पण कोरोना साथीमुळे या परीक्षा तब्बल तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

पोखरियाल यांनी नुकताच देशभरातील शिक्षकांशी डिजिटल कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला होता.

जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेणं शक्य होणार नाही. पण या परीक्षा कधी घ्यावीत, याबाबत तज्ज्ञांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असं पोखरियाल यांनी म्हटलं होतं.

कोरोनामुळे CBSE बोर्ड परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन अशीही चर्चा सुरू झाली होती. पण या परीक्षा ऑनलाईन घेणार नसल्याचं वरीष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

ऑनलाईन परीक्षेसाठी कॉम्प्युटर आणि इंटरनेट गरजेचं असतं. पण अनेक विद्यार्थ्यांना ते उपलब्ध होत नाही. त्यामुळे एकाही विद्यार्थ्याची परीक्षा चुकू नये, यासाठी परीक्षा ऑफलाईनच घेण्यात येणार आहेत.

नुकतेच परीक्षेबाबत शिक्षणमंत्र्यांनी विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या होत्या. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी मास्क घालणं अनिवार्य असेल, असं त्यांनी सांगितलं होतं.

नीट परीक्षेदरम्यान विरोधी पक्षांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. पण बराच गोंधळ होऊनसुद्धा केंद्राने या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)