You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी : 'भारतात उत्पादित झालेली लस लोकांना मिळणार'
भारतात उत्पादित केलेली लस देशातल्या सगळ्या वर्गापर्यंत वेगानं पोहोचावी, यासाठीचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
अजून भारतीय नियामकांनी कोणत्याही लशीला मंजुरी दिलेली नाही. पण पंतप्रधान मोदींचं हे वक्तव्य लशीबद्दलचा महत्त्वाचा संकेत मानायचं का?
भारतात सध्याच्या घडीला उत्पादन होत असलेल्या लशींमध्ये सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशील्ड, झायडस कॅडीलाची झायकॉव डी, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि डॉ. रेड्डीज लॅब बनवत असलेली स्पुटनिक 5 या लशी आहेत.
यापूर्वी व्हॅक्सिन टास्क फोर्सचे प्रमुख आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी भारतातल्या कोल्ड स्टोरेजच्या व्यवस्थेबद्दल बोलताना लशी साठवण्यासाठी 2 ते 8 डिग्री तापमानाच्या कोल्ड स्टोरेजची व्यवस्था झालेली आहे असं म्हटलं होतं. वर उल्लेख केलेल्या लशी या तापमानात साठवता येऊ शकतात त्यामुळे यापैकी जी लस सुरक्षितता आणि परिणामकारकतेच्या निकषांवर उत्तीर्ण होईल तिला मान्यता मिळू शकते असं मानता येईल.
मॉडर्ना किंवा फायझरच्या लशींच्या साठवणुकीसाठी अल्ट्रा कोल्ड स्टोरेजची आवश्यकता आहे. सध्याच्या घडीला ती सुविधा भारतात उपलब्ध नाही. पण या कंपन्यांशीही संपर्क करणार असल्याचं आणि त्या लशींचंही उत्पादन पुढे भारतात करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं डॉ. व्ही. के. पॉल रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले होते.
मोदी काय म्हणाले?
मोदींनी गुजरातच्या राजकोट इथल्या AIIMSच्या कोनशिलेचं अनावरण केलं. यावेळी ते बोलत होते.
पीटीआय वृत्तसंस्थेनं यासंदर्भात बातमी दिली आहे.
भारतातील कोरोना लशीकरणाची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. देशातील लोकांना भारतात उत्पादित झालेली लस मिळेल, असं मोदींनी म्हटलं आहे.
मोदींनी मांडलेले मुद्दे -
- देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या खालावत आहे. पुढच्या वर्षी जगातील सगळ्यात मोठा लशीकरणाचा कार्यक्रम आपला देश राबवणार आहे.
- आयुष्मान भारत योजनेमुळे गरीब जनेतेचे 30 हजार कोटी रुपये वाचले,असंही मोदींनी म्हटलं आहे.
- याआधी मी म्हणायचो दवाई नही तो ढिलाई नही, दवाई भी और कडाई भी. आता 2021 साठी आपला मंत्र दवाई भी और कडाई भी असा असेल.
- वर्षाचा आजचा शेवटचा दिवस कोरोनाच्या काळात काम करणारे लाखो डॉक्टर्स, सफाई कर्मचारी, औषधी दुकानातील कर्मचारी या सगळ्यांना धन्यवाद देण्याचा आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)