राजेश टोपे: नव्या प्रकारच्या कोरोनाचा एकही रुग्ण महाराष्ट्रात नाही

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC
वेबसाईट आणि वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या
1. नव्या प्रकारच्या कोरोनाचा एकही रुग्ण महाराष्ट्रात नाही
महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ब्रिटनमधून 43 जण महाराष्ट्रात आले. त्यांच्यापैकी कुणालाही नव्या स्ट्रेनच्या कोरोनाची लागण झालेली नाही असा खुलासा टोपेंनी केला, ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेत राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कुठेही नवा कोरोनाचा अवतार आढळला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही. पण तरीही आवश्यक ती काळजी घेणं महत्त्वाचं असून रुग्णाचे स्वॅब पाठवण्यास हलगर्जीपणा झाला असेल तर तुम्ही जाब विचारू शकता असंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
2. कोरोनाची लक्षणं जाणवत असल्यामुळे हजर राहू शकत नाही - खडसे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावली आहे. पुण्यातील भोसरीतील ) भूखंड खरेदी प्रकरणी बुधवारी (30 डिसेंबर) मुंबईत चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे, न्यूज 18 लोकमतने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Twiiter/eknath khadse
विशेष म्हणजे एकनाथ खडसे मुंबईत दाखल झालेही आहेत. मात्र, ते उद्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहाणार नसल्याची माहिती समजते. याबाबत एकनाथ खडसे यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र देखील सादर केलं आहे.
एकनाथ खडसे यांना कोरोनाची लक्षणं जाणवत आल्याची माहिती त्यांनी वकिलामार्फत कोर्टात दिली. त्यामुळे ते ED च्या चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाही, असंही सांगण्यात आलं आहे.
3. 'काँग्रेस काय, भाजप काय, सर्व पक्ष स्वार्थीच- अण्णा हजारे
अहमदनगर - सरकार कुठल्याही पक्षाचे असू दे, काँग्रेस काय, भाजप काय, हे सर्वच पक्ष स्वार्थी आहेत. ते आपल्या पक्षाचा फक्त फायदा पाहतात. समाजाचे त्यांना काहीही पडलेले नाही. त्यांना खरोखरच समाजाविषयी तळमळ असती, तर आज हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, हे काय त्यांना दिसत नाही का? ईटीव्ही भारतने हे वृत्त दिले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला. हजारे यांनी शेती प्रश्नांविषयी केंद्र सरकारला पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या मागील आंदोलनावेळी सरकारने दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. या आश्वासनांची पूर्तता होत नसेल तर आपण पुन्हा आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.
4. 'मोदीजी, लौटा दो हमारे बुरे दिन' अशा घोषणा देत रस्त्यावरच...
घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरची दरवाढ झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने सांगतील चूल पेटवून आंदोलन केले. आम्हाला आमचे बुरे दिन परत करत असं म्हणत हे आंदोलन चाललं, महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.
2014 च्या निवडणुकीत अच्छे दिन आएंगे असा नारा मोदींनी दिला होती. त्यावरूनच राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने मंगळवारी सांगलीत शरसंधान साधनले. रस्त्यावरच चूल पेटवून केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन केले.

फोटो स्रोत, EPA
चूलमुक्त भारताची घोषणा करणाऱ्या केंद्र सरकारने पुन्हा महिलांवर चूल पेटवण्याची वेळ आणली, असा आरोप महिला आघाडीने केला आहे.
केंद्र सरकारने तातडीने गॅस सिलिंडरची दरवाढ रद्द करावी, अन्यथा सर्व पेट्रोल पंपांवर असलेले पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचे फलक काढून टाकू, असा इशारा राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने दिला आहे. यावेळी 'मोदीजी, नही चाहिए अच्छे दिन, लौटा दो हमारे बुरे दिन', 'भाजप सरकार होश में आओ, जनता से तुम ना टकराओ', अशा घोषणांचे फलक घेऊन महिला कार्यकर्त्या आंदोलनात उतरल्या होत्या.
5. सहावेळा खासदार राहिलेल्या गुजरातमधील माजी केंद्रीय मंत्र्याची पक्षाला सोडचिठ्ठी
आदिवासींच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठविणारे गुजरातमधील भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनसुख वसावा यांनी मंगळवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे, ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
नर्मदा जिल्ह्यातील 121 गावांना पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं होतं. वने, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने त्याबद्दल जारी केलेली अधिसचूना मागे घ्यावी अशी मागणी मनसुख वासवा यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याकडे एका पत्राच्या माध्यमातून केली होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)























