शेतकरी आंदोलन: आंदोलकांकडून 1300 जिओ मोबाईल टॉवर्सचा वीजपुरवठा खंडित #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पाहूयात,

1. पंजाबमध्ये आंदोलक शेतकऱ्यांकडून 1300 जिओ मोबाईल टॉवर्सचा वीजपुरवठा खंडित

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे समर्थन करणाऱ्या काही गटांनी पंजाबमध्ये रिलायन्स जिओ मोबाईल टॉवरवर हल्ला केला आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

राज्यात अनेक ठिकाणी यामुळे जिओ ग्राहकांना रेंज मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पंजाबमधील या गटांनी 1,300 मोबाईल टॉवर्सचा वीजपुरवठा खंडित केला आहे.

पंजाबमध्ये जिओचे 9 मोबाईल टॉवर्स असून यापैकी अनेक टॉवर्सला वीजपुरवठा करणाऱ्या वायर्स आंदोलकांनी कापल्या आहेत.

दिल्लीच्या सीमेवर गेल्या महिनाभरापासून कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आंदोलक शेतकऱ्यांनी अदानी आणि अंबानीसारख्या बड्या उद्योजकांनाही विरोध केला आहे.

हिंसक कृत्य केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिला आहे.

2. तिने आंदोलकांना वाटले दहा लाख रुपयांचे कपडे

दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अशा परिस्थितीत ट्रॉली, ट्रॅक्टर, टेंट जागा मिळेल त्याठिकाणी शेतकरी थंडीत कुडकुडत झोपत असल्याची दृश्यं समोर आली.

यासंदर्भातील दृश्य पाहत असताना अमेरिकेत राहत असलेल्या मुलींनी आपल्या शेतकरी वडिलांना थंडीत कुडकुडताना पाहिले. काही दिवसातच तो शेतकरी इतरांना थंडीपासून बचावासाठी कपडे वाटताना दिसला. लोकमतने हे वृत्त दिले आहे.

दिल्ली-जयपूर हायवे 48 च्या हरियाणा-राजस्थान सीमेवरील रेवाडी खेडा सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनात पंजाबचे सरकार सतनाम सिंग सहभागी झाले आहेत.

टिव्हीवर यासंदर्भातील वार्तांकन सुरू असताना सरदार सतनाम सिंग यांच्या अमेरिकेत राहणाऱ्या मुलींनी आपल्या वडिलांना थंडीत कुडकुडताना पाहिले. मुलींनी तात्काळ अमेरिकेहून वडिलांसह सर्व आंदोलक शेतकऱ्यांसाठी दहा लाख रुपयांचे उबदार कपडे पाठवले.

शेती करूनच मुलींना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवले होते अशी माहिती सरदार सतनाम सिंग यांनी दिली.

3. विमा कंपन्यांविरोधात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन

यवतमाळ येथील विमा कंपनीत खासदार भावना गवळी यांनी ठिय्या आंदोलन केले. विमा कंपन्या शेतकऱ्यांना लूटत असल्याचा आरोप त्यांनी केला. याविरोधात त्यांनी यवतमाळच्या स्टेट बँक चौकात 'जवाब दो' आंदोलन केले. टिव्ही 9 ने हे वृत्त दिले आहे.

महसूल आणि कृषी विभागाच्या सर्वेक्षणात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान स्पष्ट आहे. तरीही विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत नसल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.

पीक विमा योजनेत कंपन्या हजारो कोटी रुपयांचा व्यवहार करतात पण शेतकऱ्यांना मदत करण्याची वेळ येते तेव्हा कंपन्या हात वर करतात असा आरोप खासदार भावना गवळी यांनी केला आहे.

शेतकऱ्यांना मदत न करणाऱ्या विमा कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचंही भावना गवळी यांनी सांगितले.

4. रामनारायण मंदिराच्या पायाभरणीसाठी 11 हजार लीटर दूध, दही, तूप मातीत

राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील रतलाई भागात देवनारायण मंदिराच्या स्थापनेसाठी 11 हजार लीटर दूध, दही आणि तूप पायाभरणीच्यावेळी मातीत टाकण्यात आले. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिले आहे.

मंदिराच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी भक्तांनी आपल्या घरातून दूध, दही, तूप डब्यात आणले होते.

यासंदर्भात बोलताना मंदिर समितीचे प्रवक्ते रामलाल गुर्जर यांनी सांगितले, "गुर्जर समाजातील आणि इतर भक्त आपल्या घरातून दुग्धजन्य पदार्थ घेऊन आले. देवनारायण यांच्यासाठी असलेल्या भक्तीचे हे प्रतीक आहे."

11 हजार लीटरमध्ये 1500 लीटर दही, एक क्विंटल तूप आणि बाकीचे दूध होते. या पदार्थांची किंमत जवळपास दीड लाख रुपये एवढी असू शकते.

यामुळे दुग्धजन्य पदार्थ वाया गेले नाही का? असे मंदिर समितीला विचारले असता त्यांनी सांगितले, "गुर्जर समाजात आम्ही देवनारायणावर दूध चढवतो कारण तोच आमच्या गुरांचे रक्षण करतो. देवाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत." अशी प्रतिक्रिया रामलाल गुर्जर यांनी दिली.

5. 'राहुल गांधी आपल्या आजारी आजींना भेटण्यासाठी गेले आहेत'

राहुल गांधी हे सध्या इटलीमध्ये आहेत. त्यांच्या इटलीच्या दौऱ्यावरुन भाजप नेत्यांकडून टीका होत आहे. राहुल गांधी यांची भारतातली सुटी आता संपली आहे आणि आता ते इटलीत गेले आहेत अशी टीका भाजप खासदार गिरीराज सिंह यांनी केली होती.

त्यांच्या या टीकेला काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी उत्तर दिले आहे. सुरजेवाला म्हणाले राहुल गांधी हे सुटीवर गेलेले नाहीत तर त्यांच्या आजी आजारी आहे. त्यांना भेटण्यासाठी ते इटलीला गेले आहेत, असं वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.

28 डिसेंबर रोजी काँग्रेसचा स्थापना दिवस होता. त्या कार्यक्रमालाही राहुल गांधी हजर नसल्यामुळे उलट सुलट चर्चा झाली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)