You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अर्णब गोस्वामी यांनी TRP वाढवण्यासाठी BARC च्या प्रमुखांना पैसे दिले- मुंबई पोलीस
TRP घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी TRP वाढवण्यासाठी बार्कचे (BARC) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांना पैसे दिल्याचं मुंबई पोलिसांनी कोर्टात सांगितलं आहे.
TRP घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पार्थ दासगुप्ता यांना सोमवारी कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात दाखल केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये, क्राइम ब्रांचने अर्णब गोस्वामी यांनी TRP वाढवण्यासाठी लाखो रूपये दिले असल्याचं नमूद केलं आहे.
मुंबई क्राइम ब्रांचने पहिल्यांदाच रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचं नांव TRP घोटाळ्याप्रकरणी थेट घेतलं आहे.
मुंबई क्राइम ब्रांचच्या उच्चपदस्थ सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, अर्णब गोस्वामी यांच्याकडून याबाबत अजून प्रतिक्रिया आलेली नाही.
काय म्हटलं आहे रिमांड रिपोर्टमध्ये?
- मुख्य कार्यकारी अधिकारी असताना पार्थ दासगुप्ता यांनी रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांच्याशी संगनमत करून गैरमार्गाने TRP वाढवला.
- त्याबदल्यात अर्णब गोस्वामी यांनी पार्थ दासगुप्ता यांना लाखो रूपये दिल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. या पैशातून दासगुप्ता यांनी किमती वस्तू, दागिने विकत घेतले.
- दासगुप्ता यांच्या घरातून एक घड्याळ आणि सिल्व्हर रंगाच्या धातूचे 3 किलो 300 ग्रॅम वजनाचे दागिने तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहेत
मुंबई क्राइम ब्रांचने कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, पार्थ दासगुप्ता जून 2013 पासून नोव्हेंबर 2019 पर्यंत बार्कमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करत होते.
भारतामध्ये प्रसारीत होणाऱ्या टीव्ही चॅनल्सचा TRP मोजण्याचं काम ब्रॉडकास्टिंग ऑडियन्स रिसर्च काउंसिल (BARC) या संस्थेकडून केलं जातं.
क्राइम ब्रांचने कोर्टात सादर केलेल्या माहितीनुसार, पदाचा गैरवापर करून TRP वाढवण्याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली होती. हा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे.
TRP घोटाळ्याप्रकरणी आत्तापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील 14 आरोपींना कोर्टाने जामीनावर मुक्त केलं आहे.
पार्थ दासगुप्ता यांना मुंबई क्राइम ब्रांचने 25 डिसेंबरला पुण्याहून अटक केली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)