रावसाहेब दानवेंमध्ये कंसालाही लाजवेल इतका अहंकार - हर्षवर्धन जाधव #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1) रावसाहेब दानवेंमध्ये कंसालाही लाजवेल इतका अहंकार - हर्षवर्धन जाधव

कंसालाही लाजवेल इतका अहंकार रावसाहेब दानवेंमध्ये असल्याची टीका माजी आमदार आणि दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी केलीय. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

ज्याप्रमाणे कंस राक्षसाचा अंत झाला, तशीच रावसाहेब दानवे या मग्रूर नेत्याची अवस्था होईल, असंही हर्षवर्धन जाधव म्हणाले.

"रावसाहेब दानवे यांचा तोल ढळला आहे. गेल्यावेळीही त्यांनी शेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांबद्दल बोलताना त्यांचा तोल ढासळला आहे. ज्यांच्यामुळे अन्न मिळतं अशा शेतकऱ्यांना रावसाहेब दानवे यांनी चीन आणि पाकिस्तानचे हस्तक म्हटलं आहे. ही मग्रुरी आहे, जनता ही मग्रुरी उतरवल्याशिवाय राहणार नाही," असं हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे.

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन हे हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. या आंदोलनाच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले होते. त्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होतेय.

2) तीनपैकी एकही कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात नाही - नितीन गडकरी

"केंद्र सरकारने आणलेल्या तीनपैकी एकही कृषी कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी या बिलाचं समर्थन केलंय," असं केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी म्हणाले.

हे कृषी कायदे शेतकरी हिताचेच आहेत, असं सांगतानाच गडकरी पुढे म्हणाले, काही लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. एबीपी माझाला नितीन गडकरी यांनी मुलाखत दिली.

हे कृषी कायदे लागू झाल्यास शेतकरी आत्महत्या थांबतील, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

"मीही सेंद्रीय शेती करतो. माझ्या शेतीतल्या भाज्या मी थेट बाजारात विकतो. हे या कायद्यामुळे शक्य झालं. हा कायद नसता, तर मलाही भाज्या एपीएमसीमध्ये विकाव्या लागल्या असत्या," हे स्वत:चं उदाहरण देत गडकरींनी कृषी कायद्यांचे फायदे सांगितले.

3) आगामी दोन दिवसात खान्देशात गारपिटीची शक्यता

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढच्या दोन दिवसात महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गारपीट तर काही भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे.

पुढच्या दोन दिवसात खान्देशातील धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांमध्ये गारपीट पडण्याची शक्यता आहे. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली आहे.

त्याचबरोबर उत्तर कोकणात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबईसह ठाणे आणि कोकणातील काही भागांध्ये शुक्रवारी (11 डिसेंबर) सकाळी हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर मुंबई, ठाणे आणि कोकणसह खान्देशात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होतं. हे ढगाळ वातावरण पुढच्या एक-दोन दिवसात निवळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

4) लोकशाही निशाण्यावर असताना मी रबर स्टॅम्प बनून राहू शकत नाही - जगदीप धनखड

पश्चिम बंगालमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी घेतली आहे. या घटनेबाबत धनखड यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला आपला अहवाल पाठवला आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

"ममता बॅनर्जी यांना राज्यघटनेचे पालन करावेच लागेल. जेव्हा त्या राज्यघटनेचे पालन करत नाहीत तेव्हा मला यात पडावे लागते. लोकशाही निशाण्यावर असताना मी राजभवनात रबर स्टँप बनून राहू शकणार नाही," असं म्हणत राज्यपाल धनखड यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधलाय.

आपण कोणत्या एका पक्षाची बाजू घेत नसून घटनेच्या चौकटीत राहूनच आपले कर्तव्य बजावत असल्याचे राज्यपाल धनखड म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याविषयी त्यांना विचारले असता त्यांनी स्पष्टपणे कोणतेही भाष्य केलं नाही. मात्र, ते म्हणाले, "याबाबत आपण कोणतेही भाष्य करणार नाही, मात्र काल जे काही झाले ती एक चिंताजनक अशी स्थिती होती. ती एक लोकशाही व्यवस्थेला धक्का पोहचविणारी घटना होती."

5) राजस्थान सरकारचा पाठिंबा काढण्याचा BTP चा इशारा

काँग्रेसने आपला विश्वासघात केल्याचा आरोप करत भारतीय ट्रायबल पार्टी (BTP) ने राजस्थानमधील सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. एनडीटीव्हीने ही बातमी दिलीय.

जिल्हास्तरावर काँग्रेस आणि भाजप यांची हातमिळवणी झाल्याचा आरोपही BTP ने केला आहे.

डुंगरपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरून हा वाद झाला. 27 सदस्यसंख्येच्या या जिल्हा परिषदेत BTP ने 13 जागा जिंकल्या. इथं काँग्रेसने आपल्याला समर्थन देण्याऐवजी भाजप आणि अपक्षांना समर्थन दिल्याचा आरोप BTP चा आहे.

भाजप आणि काँग्रेस एकच असून, आम्ही सरकारचा पाठिंबा मागे घेत आहोत, अशी घोषणा BTP चे संस्थापक छोटुभाई वसावा यांनी केली.

BTP चे राजस्थानमध्ये केवळ दोन आमदार आहेत. त्यामुळे सरकारचा पाठिंबा काढल्यास सरकारवर फारसा परिणाम दिसणार नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)