हर्षवर्धन जाधव : रावसाहेब दानवे यांचे जावई का सापडतात वारंवार वादात?

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

"मी हर्षवर्धन जाधव. रावसाहेब दावनेंचा तिसरा जावई. 26 मार्च 2003ला माझं दानवेंच्या मुलीशी लग्न झालं. आणि नंतर काही काळानं तिनं माझ्यासोबतचे वैवाहिक संबंध तोडले. ते आजपर्यंत नीट झालेले नाहीत.

"तिच्या वागण्याचा मला प्रचंड मानसिक त्रास व्हायचा, त्यामुळे मी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन मार्गदर्शन घ्यायला लागलो. नेहमीच घरात प्रॉब्लेम होते. बायकोचे आणि माझे कुठलेही वैवाहिक संबंध नसल्यामुळे त्याचा मला खूप त्रास झाला."

नुकताच सोशल मीडियावर असा व्हीडिओ प्रसिद्ध करून आपल्या कौटुंबिक गृहकलहाबाबत खुलासा करणारे हे हर्षवर्धन जाधव सध्या चर्चेत आहेत.

माजी आमदार तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई असलेल्या हर्षवर्धन जाधवांनी काही दिवसांपूर्वीच राजकीय संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं.

पण हर्षवर्धन जाधव यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी राहिली, ते आपण इथं पाहणार आहोत.

कौटुंबिक पार्श्वभूमी

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पिशोर हे हर्षवर्धन जाधवांचं मूळ गाव. त्यांचे वडील रायभान जाधव हे सनदी अधिकारी होते. काही काळ ते माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे स्वीय सहाय्यकही होते.

काही वर्षं नोकरी केल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि पिशोर जिल्हा परिषद सर्कलमधून निवडणूक लढवली. पहिल्यांदा त्यांचा पराभव झाला, पण दुसऱ्यांदा ते निवडून आले.

"दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर रायभान जाधव यांनी जनसंपर्क वाढवला. त्यानंतर ते कन्नड विधानसभेला उभे राहिले आणि जवळपास साडेबारा वर्षं त्यांनी आमदार म्हणून कन्नड मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. 1997ला त्यांचं निधन झालं आणि मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. रायभान जाधव यांच्या पत्नी यांनी ती जिंकली आणि अडीच वर्षं त्या आमदार राहिल्या. त्यानंतर मात्र कन्नड मतदारसंघात शिवसेनेचं वर्चस्व राहिलं," कन्नडचे सकाळचे पत्रकार संजय जाधव सांगतात.

राजकारणात एंट्री

1999ला याच पिशोर जिल्हा परिषद सर्कलमधून हर्षवधन जाधव यांनी निवडणूक लढवली आणि जिंकली. याशिवाय कन्नड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणूनही ते निवडून आले.

2009 मध्ये हर्षवर्धन जाधव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आणि ते कन्नडचे आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासून दहा वर्षं म्हणजे 2009 ते 2019 पर्यंत कन्नडचे आमदार राहिले.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना वेरूळला दौऱ्यावर आले होते. जाधव यांनी त्यांना भेटण्याचा आग्रह केला होता. यासाठीची परवानगी त्यांना मिळालेली नव्हती. पण ते ऐकत नाही म्हटल्यावर त्यांना आमदार असताना पोलिसांचा मार खावा लागला होता.

याप्रकरणी राज ठाकरे यांनी पुरेसं सहकार्य न केल्याचा आरोप हर्षवर्धन जाधवांनी केला, आणि ते मनसेतून बाहेर पडले आणि शिवसेनेची वाट धरली.

"2014ची विधानसभा निवडणूक ते शिवसेनेकडून लढले आणि जिंकले. पण औंरगाबाद जिल्ह्याची शिवसेनेची सगळी सूत्रं चंद्रकांत खैरे यांच्या हातात होती. या कालावधीत बाजार समितीच्या निवडणुकीत खैरे आणि जाधव यांचं खटकलं. त्यानंतर जाधव यांनी पक्षांतर्गत स्व. रायभान जाधव विकास आघाडी स्थापन केली आणि बाजार समितीचा सभापती त्यांचा निवडून आला. त्यानंतर मग खैरे आणि जाधव यांच्यातील वाद विकोपाला गेले," जाधव पुढे सांगतात.

मराठा आरक्षणाचा काळ

2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू होतं. याच आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरुणाने नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली. जाधव यांनी त्याच्या घरी भेट दिली आणि कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत देऊ केली. त्यानंतर ते मराठा तरुणांच्या गळ्यातले ताईत बनले. हा जाधव यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतला सुवर्णकाळ होता.

2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी स्वत:चा 'शिवस्वराज्य बहुजन पक्ष' स्थापन केला आणि दोन लाखांपेक्षा अधिक मतं मिळवली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, पण त्याचबरोबर औंरगाबादचे शिवसेनेचे तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं.

त्यानंतर लागलेली विधानसभा निवडणूक जाधव यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाकडूनच लढवली, पण यात त्यांचा शिवसेनेच्या उदयसिंग राजपूत यांनी पराभव केला. त्यानंतर जाधव यांनी मनसेत प्रवेश केला आणि त्यांच्याकडे औरंगाबाद शहराचं जिल्हाध्यक्षपद सोपवण्यात आलं.

चार दिवसांपूर्वी एक व्हीडिओ प्रसिद्ध करत आपण राजकारणातून संन्यास घेत असल्याचं हर्षवर्धन यांनी जाहीर केलं.

रावसाहेब दानवे हर्षवर्धन जाधव यांच्याबद्दल काय म्हणाले होते?

7 मे 2019ला 'टीव्ही 9 मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत हर्षवर्धन जाधव यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर रावसाहेब दानवे यांनी म्हटलं होतं, "माझं असं मत आहे की हर्षवर्धन हे कुणाचा सल्ला घेत नाहीत. आमचं तर बिल्कुल ऐकत नाहीत. त्यांच्या मनात येईल तसं ते करतात, आणि मला असं वाटतं, की भाजपला गरज पडण्याची सुतराम शक्यता नाही."

पुढे ते म्हणाले, "जावयाची हिस्ट्री तुम्ही बघितली का, त्यांच्या वडिलांना तिकीट नाही दिलं तर त्यांनी बंडखोरी केली होती. लोकसभा लढणं सोपं नाही, हे मी स्पष्ट शब्दांत त्यांना सांगितलं होतं."

'बेभरवशाचा राजकारणी'

हर्षवधन जाधव यांचं राजकारण नेहमीच बेभरवशाचं राहिलंय, असं मत औंरगाबादचे 'महाराष्ट्र टाइम्स'चे वरिष्ठ सह-संपादक प्रमोद माने व्यक्त करतात.

जाधव यांच्या कारकिर्दीविषयी ते सांगतात, "चंद्रकांत खैरेंबरोबरचं भांडण असो वा औरंगाबादचा कचरा प्रश्न, हर्षवर्धन जाधव यांनी वेळोवेळी जी भाषणं दिली, जी आवाहनं केली, ते म्हणजे चर्चेत राहण्यासाठीच्या क्लृप्त्या होत्या. वडील रायभान जाधव यांच्याप्रमाणे प्रगल्भतेचं, परिपक्वतेचं राजकारण त्यांना करता आलं नाही. हर्षवर्धन यांचं राजकारण नेहमीच बेभरवशाचं राहिलं."

"2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवनंतर त्यांचे कौटुंबिक कलह सार्वजनिक झाले. आधी त्यांच्या आईने सुनेविरुद्ध तक्रार केली आणि मग सुनेनं सासुविरुद्ध तक्रार केली. हर्षवर्धन हे भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. त्यामुळे या भांडणात नेहमीच दानवे केंद्रस्थानी येत गेले," माने पुढे सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)