You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
International Day of Disabled Persons : कमी उंचीवर मात करत NEET पास झालेल्या बहिणींची गोष्ट
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
"यशाचं उंच शिखर गाठायचं असेल तर मनात जिद्द पाहिजे. स्वत:वर विश्वास असला पाहिजे. ध्येय साध्य करताना अडचणी येतीलच. त्यांचा धीराने सामना केला पाहिजे. स्वप्नांचा पाठलाग करताना शारीरिक अडचणींना कधीच अडसर म्हणून समजू नका."
हे शब्द आहेत मुंबईच्या नागपाडा परिसरात रहाणाऱ्या 23 वर्षांच्या जुबैदा इंद्रीसीचे.
जन्मत:च शारीरिक वाढीसाठी लागणारे 'ग्रोथ हॉर्मोन' कमी असल्याने जुबैदाची वाढ सामान्य मुलांसारखी झाली नाही. जुबैदाची उंची आहे फक्त 3.5 फूट.
तिची सख्खी बहीण 22 वर्षाची हुमैरासुद्धा तिच्यासारखीच आहे तिचीही उंची फक्त 3.9 फूट आहे.
नियतीने दोघींनाही शारीरिकरीत्या कमकूवत केलं. पण, यशाचं शिखर गाठण्याची जिद्द आणि मानसिक शक्तीच्या बळावर या बहिणींनी वैद्यकीय शिक्षणाच्या 'नीट' या प्रवेश परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केलं आहे.
'डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार'
जुबैदाला जळगावच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात MBBS साठी प्रवेश मिळालाय.
बीबीसीशी बोलताना जुबैदा सांगते, "डॉक्टर होण्याचं स्वप्न पहिल्यापासूनच होतं. पण, घरची परिस्थिती पहाता शिक्षण घेता येईल? स्वप्न पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं. आता, माझं ध्येय माझ्या डोळ्यासमोर आहे. खूप मेहनत करायची आहे. मागे वळून पाहायचं नाही."
तर, हुमैरा मुंबई महापालिकेच्या टोपीवाला नायर मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार आहे.
"स्वत:वर विश्वास ठेवला तर यश नक्की मिळतं. अभ्यास आणि शारीरिक उंची यांचा काय संबंध? उंची अभ्यासात कधीच अडथळा बनू शकत नाही. खूप मेहनत आणि मनापासून प्रयत्न फार महत्त्वाचे आहेत," असं हुमैरा सांगते.
NEET परिक्षेचा खडतर प्रवास
वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परिक्षेला देशभरातून लाखो मुलं बसतात. ही परिक्षा तशी सोपी नाही.
जुबैदा सांगते, "आम्ही NEET परिक्षेसाठी Differently Abled म्हणजे 'वेगळ्या प्रकारे सक्षम' या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला होता."
दोन्ही बहिणींची शारीरिक स्थिती 'वेगळ्या प्रकारे सक्षम' या विभागाअंतर्गत मोडत होती. त्यामुळे आपलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी जुबैदा आणि हुमैराला मिळाली. आपल्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी या संधीच सोनं केलं.
पण, NEET पर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. हा प्रवास सुरू झाला एका डिस्पेन्सरीमधून.
जुबैदा आणि हुमैरा औषधं आणण्यासाठी नागपाड्यातील एका डिस्पेन्सरीमध्ये जायच्या. एक सामाजिक संस्था या ठिकाणी गरजूंना औषधं देण्याचं काम करते. याच ठिकाणी त्यांची भेट अश्फाक मूसा यांच्याशी झाली. अश्फाक यांनी या दोन बहिणींना पुढच्या शिक्षणासाठी मदत केली.
अश्फाक सांगतात या मुली पहिल्यांदा मला भेटल्या तेव्हा "सहा फुटाच्या व्यक्तीला नीटमध्ये 600 मार्क लागतील. तुम्ही 3 फुटाच्या आहात 300 मार्क मिळवा," असं मी थट्टेत म्हणालो.
पण, या मुलींना शिकण्याची इच्छा होती, असं ते सांगतात.
अश्फाक पुढे सांगतात, "औषध हवं असेल तर पुढे अभ्यास करावा लागेल. अभ्यास केला तरच औषध मिळेल अशी अट आम्ही त्यांच्यासमोर ठेवली."
जुबैदा आणि हुमैराने महाराष्ट्र कॉलेजमधून 12 वीचं शिक्षण पूर्ण केलंय.
मूसा म्हणतात "अशा मुलांना समाजात हिणवलं जातं. त्यांची उंची छोटी, दिसायला वेगळ्या यामुळे चिडवलं जातं. नाउमेद केलं जातं. या मुलांना थोडी हिंमत देण्याची गरज आहे. मी या मुलींना फक्त धीर दिला. शिकू शकता, पुढे जाऊ शकता असा आधार दिला."
खरंतर Differently Abled म्हणजे 'वेगळ्या प्रकारे सक्षम' या कॅटेगरीमध्ये सीट राखीव आहेत. मात्र, याबद्दल कोणालाच जास्त माहिती नाही. लोकांमध्ये याबाबत जनजागृती करण्यात आली पाहिजे, असं ते सांगतात.
जुबैदा म्हणते, "नीटच्या अभ्यासासाठी घाटकोपरच्या क्लासमध्ये आमचं अॅडमिशन करण्यात आलं. यासाठी रझा सरांनी खूप मदत केली."
घरची परिस्थिती हालाकीची असल्याने नागपाडा परिसरातील खिदमत ट्रस्टने या बहिणींची वैद्यकीय शिक्षणाची फी भरली आहे.
आई-वडीलांचा पाठिंबा
जुबैदा आणि हुमैरा आपल्या यशात आई-वडीलांची मोलाची भूमिका असल्याचं सांगतात.
"आम्ही शिक्षण अर्धवट सोडू नये. पुढे शिकावं, पायावर उभं रहावं, स्वावलंबी बनावं हे आई-वडीलांचं स्वप्न होतं. शिकण्यापासून त्यांनी आम्हाला कधीच रोखलं नाही. त्यांच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला शिकण्याची हिंमत मिळाली. त्यांच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य होऊ शकलं," असं जुबैदा म्हणते.
जुबैदा आणि हुमैराच्या आईचं नाव रुक्साना आणि वडीलांच नाव एहसानउल्ला आहे.
या दोघींचे वडील टेलर आहेत. मुंबईच्या नागपाडा परिसरात 7 बाय 13 फूटाच्या घरात या बहिणी आई-वडील, आजी, आणि 3 भावांसोबत रहातात. याच घरात राहून त्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे.
मग अभ्यास कसा केला? हुमैरा म्हणते, "घर छोटं असलं तर काय झालं. आम्ही मन लाऊन अभ्यास करायचो. आई म्हणायची, तुम्ही फक्त अभ्यास करा. काम अजिबात करायचं नाही."
जुबैदा आणि हुमैरा पाच वर्षांच्या असताना, त्यांची वाढ खुंटली होती.
'उंचीवरून कोणीच चिडवलं नाही'
एखाद्या व्यक्तीत शारिरिक व्यंग असेल किंवा ती व्यक्ती शारीरिकरित्या कमकूवत असेल तर तिच्याकडे पाहण्याची लोकांची मानसिकता वेगळी असते. अशी अनेक उदाहरण आपल्याला समाजात दिसून येतात.
"पण, आम्हाला आमच्या उंचीवरून कधीच कुणी चिडवलं नाही," असं जुबैदा म्हणते. "उलट लोक आम्हाला मदत करायचे. यामुळे धीर मिळाला. सकारात्मक प्रतिसादामुळेच शिकण्याची हिंमत वाढली."
"आम्ही इतक्या क्यूट आहोत की लोकांना आमच्याशी बोलल्याशिवाय रहावत नाही," असं ती पुढे म्हणते.
'सेलिब्रिटी झालोय, पण भीती वाटते'
मुंबईचा नागपाडा परिसर दाटिवाटीचा आहे. जुबैदा आणि हुमैराचं यश त्यांच्या मोहल्ल्यापूरतं मर्यादित राहिलेलं नाही. नीट परीक्षेत यश संपादन करून MBBS ला प्रवेश मिळाल्यानंतर दोघी आता सेलिब्रिटी झाल्यात.
"खरं सांगू आम्ही खूप वैतागलोय या सर्वांमुळे," असं बोलताना जुबैदा काहीशी नाराज दिसत होती.
"सतत फोन येतात,यलोक भेटायला, अभिनंदन करायला येतात. MBBS झाल्यानंतर असं झालं असतं तर वेगळी गोष्ट होती. पण, आता भीती वाटतेय. आम्हाला अभ्यास करायचा आहे. MBBS साठी प्रवेश हा फक्त पहिला टप्पा आहे. अजून खूप गोष्टी साध्य करायच्या आहेत." असं ती पुढे म्हणते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)