अमित शाह : हैदराबादमधली 'निजाम संस्कृती' संपवणार #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. हैदराबादमधली 'निजाम संस्कृती' संपवणार - अमित शहा

हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठी सध्या प्रचार सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रविवारी (29 नोव्हेंबर) प्रचारासाठी मैदानात उतरले. सिकंदराबाद आणि हैदराबादमध्ये त्यांनी रोड शो करत भाजपला विजयी करण्याचं आवाहन केलं. हैदराबादमधली 'निजाम संस्कृती' संपवणार असल्याचंही ते म्हणाले. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.

रोड शो नंतर शाह यांनी पत्रकार परिषध घेत भाजपची भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, "हैदराबादसारखं मोठं शहर हे भ्रष्टाचाराच्या विळख्यात असून त्याला आधुनिक शहर बनवण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. हैदराबाद हे आयटीचं हब म्हणून उदयाला येऊ शकतं. त्यामुळे हजारो तरूणांना रोजगार मिळू शकतो मात्र सध्याचं राज्य सरकार त्यासाठी काहीही करत नाही."

दरम्यान हैदराबादमध्ये भाजपला विजय मिळाल्यास हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर करू, असं आश्वासन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलं आहे.

त्याला प्रत्युत्तर देताना असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलंय की, तुमची पिढी संपेल पण हैदराबादचं नाव भाग्यनगर होणार नाही.

2. महाविकास आघाडी सरकार बैलासारखे- नितीन गडकरी

राज्यातील महाविकास आघाडी सरकार बैलासारखे आहे. या सरकारल सतत टोचत राहावे लागते. त्याशिवाय ते पुढेच जात नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ पूर्व विदर्भाच्या पदवीधरांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

या वेळी गडकरी म्हणाले, "निवडणुकीत जातीपातीचे राजकारण केले जात आहे. माणूस हा जातीने मोठा होत नसतो तर कर्तृत्वाने मोठा असतो. निवडणूक आली की अमक्या जातीचा आहे म्हणून उमेदवारी मागितली जाते.

"विविध पक्षांमध्ये ज्या जातीनिहाय आघाडी करण्यात आल्या आहेत त्या बंद झाल्या पाहिजे. कार्यकर्त्यांत जात नसते. मात्र ज्याला उमेदवारी पाहिजे असते त्यांना जात आठवते. परंतु राज्यातील आघाडी सरकार व केंद्रातील विरोधक जातीचे राजकारण करीत आहेत. त्यांना धडा शिकवायला हवा," गडकरी म्हणाले.

3. 'नारायण राणेसारखा डराव डराव करणारा बेडूक नको'

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली.

"महाराष्ट्राचा रथ विकासाकडे घेऊन जाणारा ड्रायव्हर मुख्यमंत्री आम्हाला चालेल. मात्र नारायण राणे सारखा डराव डराव करणारा बेडूक आम्हाला नको," असं वक्तव्य विनायक राऊत यांनी केलं आहे. 'टीव्ही 9 मराठी'नं ही बातमी दिली आहे.

"नारायण राणे म्हणजे नेमकं रसायन काय हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. त्यामुळे राणेंच्या बकवासगिरीला उत्तर देण्याची आम्हाला गरज नाही," असंही त्यांनी म्हटलंय.

4. राज्यातील 8 जिल्ह्यांत बिबट्याची दहशत

सध्या राज्यातील अहमदनगर, बीड, औरंगाबाद, पुणे, नाशिक, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये बिबट्याची दहशत आहे. अॅग्रोवननं ही बातमी दिली आहे.

बीडमध्ये बिबट्यानं 3 दिवसांत 2 जणांचा बळी घेतला आहे, तर नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात तीन बालकांचा बिबट्यानं बळी घेतला आहे.

बिबट्याच्या भीतीनं शेतकामांना काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. शेतकऱ्यांनी रात्रपाळीला शेतात पाणी द्यायला जाणं थांबवलं आहे.

5. मराठा आरक्षणासाठी 1 डिसेंबरला निदर्शनं, तर 8 डिसेंबरला लाँग मार्च

मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न तसंच इतर मुद्द्यांवरुन मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. येत्या डिसेंबर महिन्यात मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहेत.

1 आणि 2 डिसेंबरला महावितरण कार्यालयांसमोर राज्यभर निदर्शनं तर 8 डिसेंबरला मुंबईत लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

रविवारी (29 नोव्हेंबर) पुण्यात मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)