भारती सिंह कोण आहे?: कॉमेडी क्वीन ते ड्रग्ज प्रकरण, भारती सिंहचा आजवरचा प्रवास

फोटो स्रोत, FB/BHARTI
प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (एनसीबी) ड्रग्जप्रकरणी अटक केली आहे.
एनसीबीने काल (21 नोव्हेंबर) भारती सिंहच्या प्रॉडक्शन हाऊस आणि घरावर छापा टाकला होता आणि त्यात 86.5 ग्रॅम गांजा सापडला. त्यानंतर एकामागोमाग एक दोघांनाही एनसीबीनं अटक केली. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया या दोघांनीही गांजा सेवन करत असल्याची कबुली दिलीय.
भारती सिंह आता 36 वर्षांची आहे. पंजाबमधील अमृतसर इथं तिचा जन्म झाला. गेल्या 10 वर्षात भारतीनं मनोरंजन क्षेत्रात नाव कमावलं आहे. 'कॉमेडी क्वीन' अशी स्वत:ची ओळखही तिने निर्माण केलीय.

फोटो स्रोत, FB/BHARTI
भारती सिंहला सोशल मीडियावरही मोठा चाहता वर्ग आहे. फेसबुकवर 72 लाखांहून अधिक, तर इन्स्टाग्रामवर 36 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
भारतीनं तिच्या यशाबद्दल, आजवर केलेल्या खडतर प्रवासाबद्दल अनेकदा लिहिलंय. पण आता ड्रग्जप्रकरणात नाव आल्यानं ती वादाच्या भोवऱ्यातही अडकलीय.
खडतर आयुष्य
भारती सिंहचा जन्म 3 जुलै 1984 रोजी पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात झाला. भारती दोन वर्षाची होती, तेव्हा तिचं पितृछत्र हरपलं. तिची आई वयाच्या 22 व्या वर्षीच विधवा झाली.
आपण गरिबी अत्यंत जवळून पाहिली आहे, गरिबीचे चटके सोसले आहेत. असं तिने अनेकदा चाहत्यांना सांगितलं आहे.
एका मुलाखतीत भारती सिंहने सांगितलं, लोक तिच्या लठ्ठपणा आणि गरिबीची थट्टा करत असत.

फोटो स्रोत, FB/BHARTI
झी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या 'जज-बात'मध्ये भारती सिंहने सांगितलं होतं की, "तिची आई शिवणकाम करायची आणि त्या शिलाई मशीनचा आवाज आजही त्यावेळच्या वेदनादायी जगण्याची आठवण करून देतो."
"माझ्या आधी आईला एक मुलगा आणि एक मुलगी होती. त्यामुळे ती मला जन्म देऊ इच्छित नव्हती. मला गर्भातच मारण्याचा प्रयत्न केला. मात्र माझा जन्म होणं ठरलेलंच होतं," असं भारतीनं सांगते.
घरातील तेव्हाच्या स्थितीबाबत सांगताना भारती म्हणते, "मी दोन वर्षांची असताना वडिलांचं निधन झालं. माझी आई तेव्हा केवळ 22 वर्षांची होती. आम्ही प्रचंड दु:खात जगलो. आई तेव्हा ब्लँकेटच्या कारखान्यात काम करायची."
"सण असायचे, तेव्हा आम्ही रडायचो. कारण आमच्याकडे पैसे नसायचे. पैसे मागितल्यास आई ओरडायची. लहानपणीच मोठं झाल्यासारखं, पोक्त माणसासारखं राहायला लागायचं," असं ती सांगते.

फोटो स्रोत, FB/BHARTI
या सर्व खडतर आयुष्यातही भारतीच्या नशिबात काहीतरी वेगळं लिहिलं होतं. प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माची आणि भारतीची ओळख सुद्धा अमृतसरमध्ये असताना महाविद्यालयीन दिवसातच झाली होती. तेव्हा दोघेही स्ट्रगल करत होते. स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत होते.
यशाच्या शिखरावर
भारती 2008 पासून लोकप्रिय होऊ लागली. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'मध्ये भारती रनर-अप ठरली होती.
त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. एकामागोमाग एक कॉमेडी शो करत गेली. 'कॉमेडी सर्कस महासंग्राम', 'कॉमेडी सर्कस के सुपरस्टार्स', 'कॉमेडी सर्कस का जादू', 'कॉमेडी सर्कस के तानसेन' यांसारखे बरेच कार्यक्रम तिने केले.

फोटो स्रोत, FB/BHARTI
'झलक दिखला जा - सीझन 5' मध्ये भारतीनं तिच्यातील नृत्यगुणांचीही चुणूक दाखवली. त्यानंतर बिग बॉस आणि नच बलिए या कार्यक्रमात पाहुणे कलाकार म्हणूनही सहभागी झाली होती.
एवढ्या साऱ्या कार्यक्रमांनंतर कुणी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचणार नाही, असं कसं होईल! कॉमेडी म्हटल्यावर भारती सिंहचं नाव आवर्जून घेतलं जायला लागलं.

फोटो स्रोत, FB/BHARTI
'कॉमेडी दंगल'सारख्या कार्यक्रमात भारती परीक्षकाच्या भूमिकेत होती. 'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमाच्या अनेक सीझनमध्ये पाहुणी म्हणून सहभाग, तर 2020 मध्ये तिसरी रनर-अप सुद्धा ठरली.
'द कपिल शर्मा' शोमध्ये भारती सिंह विविध भूमिकेतून दिसली. तिच्या या भूमिकांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि कौतुकही झालं.

फोटो स्रोत, FB/BHARTI
आपल्या लठ्ठपणावर ती मनमोकळेपणाने विनोद करते. लोकांनीही तिच्या या गोष्टी केवळ हसण्यावारी नेल्या नाहीत, तर तिचं भरभरून कौतुकही केलं.
पुरुष कलाकारांची मक्तेदारी मानल्या गेलेल्या स्टँडअप कॉमेडीच्या जगतात भारती सिंहने तिची दखल घ्यायला लावली आणि आपला स्वतंत्र ठसाही उमटवला.
भारतीने काही हिंदी आणि पंजाबी सिनेमांमध्येही काम केले आहे.
हर्ष लिंबाचियासोबत विवाहबद्ध
3 डिसेंबर 2017 रोजी भारतीने हर्ष लिंबाचिया याच्याशी लग्न केलं. हर्ष भारतीपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे.

फोटो स्रोत, FB/BHARTI
हर्ष लिंबाचिया पटकथा लेखक, निर्माता आणि शो होस्ट आहे. कॉमेड सर्कस के तानसेन, कॉमेडी नाईट्स लाईव्ह इत्यादी कार्यक्रमांचं लेखन केलं आहे.
'पीएम नरेंद्र मोदी' आणि 'मलंग' यांसारख्या सिनेमाचं टायटल ट्रॅकही त्यांनी लिहिलंय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























