भारत-चीन तणाव : मायक्रोवेव्ह शस्त्र नेमकी काय असतात?

फोटो स्रोत, US NAVY
- Author, प्रवीण शर्मा
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
भारतीय सैन्याने चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) ने लडाखमध्ये मायक्रोव्हेव शस्त्रांचा वापर केल्याच्या बातमीचं खंडन केलं आहे. काही ऑनलाइन मीडिया रिपोर्ट्समध्ये चीनी सैन्याने मायक्रोवेव्ह शस्त्रांचा वापर केल्याचा दावा करणाऱ्या बातम्या प्रसारीत करण्यात आल्या होत्या.
भारतीय सैन्याकडून मात्र हा दावा फेटाळून लावण्यात आला आहे.
भारतीय सैन्याच्या माहिती आणि प्रसारण विभागाचे अतिरिक्त महासंचालक (एडीजीपीआय) यांच्या अधिकृत ट्विटरवर सांगण्यात आलंय की, "पूर्व लडाखमध्ये मायक्रोवेव्ह शस्त्रांचा वापर करण्यात आल्याचे मीडिया रिपोर्ट खरे नाहीत आणि पूर्णत: चुकीचे आहेत. ही बातमी खोटी आहे."
संरक्षणतज्ज्ञ आणि इंडियन डिफेन्स रिव्ह्यूचे असोसिएट एडिटर कर्नल दानवीर सिंह यांच्या माहितीप्रमाणे, चीनकडून करण्यात आलेला दावा पूर्णत: चुकीचा आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
सिंह म्हणतात, "अशा प्रकारची शस्त्र लाइन-ऑफ-साइट म्हणजे एका सरळ रेषेत काम करतात. डोंगराळ भागात यांचा वापर इतका सहज आणि सोपा नाही. या दाव्यामागे काहीच लॉजिक नाही. हा चीनकडून करण्यात आलेला एक प्रोपोगंडा आहे."
"ही एक बनावट आणि खोटी बातमी आहे. चीनतर्फे चालवण्यात आलेला एक अजेंडा आहे. या बातमीची विश्वासार्हता अजिबात नाही," असं मत डिफेन्स आणि सुरक्षा या मुद्यावर लिहिणारे ज्येष्ठ पत्रकार राहुल बेदी व्यक्त करतात.
भारत-चीन तणाव
भारत आणि चीन दरम्यान पूर्व लडाखमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सीमेवर तणावाचं वातावरण आहे. चीनमधील माध्यमांमध्ये दावा करण्यात आला होता की, "पीएलएकडून मायक्रोवेव्ह शस्त्रांचा वापर उंच टेकड्यांवरून भारतीय सैन्याला हुसकावून टाकण्यासाठी करण्यात आला होता."
काही बातम्यांमध्ये चीनच्या रेनमिन विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंधांच्या विषयातील तज्ज्ञ प्रो. जिन कॅनरॉन्ग यांच्या दाव्यानुसार, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने लडाखमधील दोन महत्त्वाच्या टेकड्या पुन्हा काबीज करण्यासाठी त्यांना 'मायक्रोव्हेव अवन' सारखं बनवलं होतं. या उंच डोंगरांवर तैनात असलेल्या भारतीय सैन्यावर 'डायरेक्टेड एनर्जी वेपन्स' (डीइडब्ल्यू) चा वापर करण्यात आला होता.
प्रो. जिन कॅनरॉन्ग यांच्या दाव्यानुसार, या शस्त्रांच्या वापरानंतर भारतीय जवानांना उलटी होणं सुरू झालं आणि 15 मिनिटांनी त्यांना उभं राहणं अशक्य झालं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्या दाव्यानुसार, "भारतीय सैन्याला आपली जागा सोडावी लागती. यानंतर चीनी सैन्याने हा भाग पुन्हा काबीज केला."
प्रो. जिन कॅनरॉन्ग यांचा दावा आहे की, "या शस्त्रांचा वापर केल्याने चीनी सैन्याला भारतीय जवानांवर गोळीबार करण्याची गरज पडली नाही. त्यामुळे भारत आणि चीन यांच्यात गोळीबार न करण्याच्या कराराचं उल्लंघन झालं नाही."
ही घटना 29 ऑगस्टला घडल्याचा प्रो. जिन कॅनरॉन्ग यांचा दावा आहे. चीन आणि भारत दोन्ही देशांनी विविध कारणांनी याचा प्रचार केला नसल्याचा त्यांचा दावा आहे.
मायक्रेवेव्ह शस्त्र म्हणजे काय?
मायक्रोवेव्ह शस्त्र, 'डायरेक्टेड एनर्जी वेपन्स' चा एक प्रकार आहेत. यात मायक्रोवेव्ह इलेक्ट्रोमॅग्नॅटिक रेडिएशनचा एक प्रकार असतो. ज्याची वेवलेंथ एक मिलीमीटर ते एक मीटर असते. यांची फ्रिक्वेन्सी 300 मेगाहर्ट्ज (100 सेंटीमीटर) आणि 300 गिगाहर्ट्ज (0.1 सेंटीमीटर) च्या दरम्यान असते.
याला हाय-एनर्जी रेडियो फ्रिक्वेन्सी असं देखील म्हटलं जातं.
सिंह पुढे म्हणतात, "घरी मायक्रोवेव्ह जसा काम करतो, त्याच पद्धतीने ही शस्त्र काम करतात. यामध्ये एक चुंबक असतं. ज्याच्या माध्यमातून मायक्रोवेव्ह तरंग तयार होतात. खाद्यपदार्थाच्या संपर्कात आल्यानंतर या तरंगांमुळे उष्णता निर्माण होते. ही शस्त्रसुद्धा याच पद्धतीने काम करतात."
चीनचा दावा फेटाळून लावताना ते पुढे म्हणतात, "आता जरा विचार करा. उंच डोंगरांवर तैनात सैनिकांना हुसकावून लावण्यासाठी किती मोठ्या आकाराचा मॅग्नेट्रॉन तयार करावा लागेल."

फोटो स्रोत, US ARMY
सिंह पुढे म्हणतात, "मायक्रोवेव्ह तरंगांमुळे आपलं नुकसान झालं तर आपण गप्प बसू का. आपल्याकडूनही उत्तर दिलं जाईल."
त्यांच्या माहितीप्रमाणे, "मोठ्या आकाराचा मॅग्नेट्रॉन बनवला तरी, त्याचा वापर फार दूरवरून करावा लागेल."
सिंह म्हणतात, "अत्यंत छोट्या प्रकरणात असं शक्य असेलही. पण, ज्याप्रकारे चीनकडून दावा करण्यात येतोय. हे निव्वळ अशक्य आहे."
'लेझर बेस' शस्त्र
राहुल बेदी सांगतात, "अशा प्रकारच्या शस्त्रांचा वापर शक्य आहे. "याला नॉन-कॉन्टॅक्ट वॉरफेअर म्हटलं जातं. ज्यात आपण दारुगोळा, बुलेट्स, रनगाड्यातील राउंडचा वापर करत नाही. यात अल्ट्राव्हायलेट किरणांचा वापर करण्यात येतो. मात्र, चीनचा दावा खोटा दिसतोय."
बेदी यांच्या माहितीनुसार, डीआरडीओ देखील अशा प्रकारच्या शस्त्रांवर काम करत आहे. "चीनमध्ये या शस्त्रांची निर्मिती आणि विकास कोणत्या टप्प्यात आहे याची माहिती नाही. मात्र, ही शस्त्र भविष्यात जरूर पाहायला मिळतील."
सिंह पुढे म्हणातात, "लेझर बेस शस्त्र सद्यस्थितीतही आहेत. दंगल थांबवण्यासाठी किंवा जमावावर नियंत्रणासारख्या गोष्टींमध्ये याचा वापर केला जातो. मात्र, इतक्या मोठ्या घटनेत या शस्त्रांचा वापर व्यवहार्य नाही."
19व्या शकताच्या अखेरीस, 'डायरेक्टेड एनर्जी वेपन्स' (डीइडब्ल्यू) शस्त्रांवर संशोधनास सुरूवात झाली. 1930 मध्ये रडारचा शोध लावण्यात आल्यामुळे यात खूप प्रगती झाली.

फोटो स्रोत, Getty Images
इलीन एम. विलिंग यांचं पुस्तक हाय पावर मायक्रोव्हेव्स: स्ट्रॅटेजिक अॅन्ड ऑपरेशनल इंप्लीकेशन्स फॉर वॉरफेयरमध्ये याबाबत विस्ताराने माहिती देण्यात आली आहे.
वायरलेस आणि रडार टेक्नॉलॉजीचा वापर सैन्यात मोठ्या प्रमाणावर करण्यात येतोय. अॅडव्हान्स अर्ली वॉर्निंग, डिटेक्शन आणि वेपन फायर कंट्रोल यांचा त्यात समावेश आहे.
शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्स फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रमवर संशोधन करत आहेत. जेणेकरून त्याची शक्ती वाढवण्यात येईल. त्याचसोबत काही अप्लिकेशन्सचा विकासही केला जात आहे.
काही वर्षांपूर्वी 'डायरेक्टेड एनर्जी' कडे एक सायन्स फिक्शन म्हणजे काल्पनिक गोष्ट म्हणून पाहिलं जात होतं. मात्र, आता हे सत्यात उतरताना दिसून येत आहे. 'डायरेक्टेड एनर्जी' स्पेक्ट्रमच्या हाय पॉवर (शक्ती) मायक्रोवेव्ह तंत्रज्ञानावर अपेक्षेप्रमाणे काम अजूनही करण्यात आलेलं नाही.
भारतात डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत 'डायरेक्टेड एनर्जी' शस्त्रांवर संशोधन सुरू आहे.
'डायरेक्टेड एनर्जी' शस्त्र, लक्ष्यभेद करण्यासाठी फोकस एनर्जीवर काम करतात आणि टार्गेटला नष्ट करतात. या फोकस एनर्जीमध्ये लेझर, मायक्रोवेव्ह आणि पार्टिकल बीम यांचा समावेश केला जातो.

फोटो स्रोत, JOHN F WILLIAMS / US NAVY
पारंपारिक शस्त्रांच्या तुलनेत 'डायरेक्टेड एनर्जी' शस्त्र फार जास्त प्रभावी असू शकतात. या तंत्रज्ञानात अशी काही शस्त्र आहेत जी सैनिक, मिसाईल आणि ऑप्टिकल डिव्हाइसला टार्गेट करतात.
या शस्त्रांचा वापर गुपचुप पद्धतीने केला जातो. स्पेक्ट्रमच्या वर आणि खाली असलेले रेडिएशन अदृष्य असतात. ज्यामुळे यात आवाज निर्माण होत नाही.
प्रकाशावर गुरुत्वाकर्षणाचा फारसा परिणाम होत नसल्याने या शस्त्रांच्या वापरातून एक सरळ मार्गिका उपलब्ध होते. ज्यातून लेझर लाइट वेगाने जाते. त्यामुळे स्पेस वॉरफेअरमध्ये हे फार उपयुक्त आहेत.
लेझर किंवा मायक्रोवेव्ह तंत्रज्ञानावर असलेली ही शस्त्र शत्रूचे ड्रोन आणि मिसाईल यांना टार्गेट करतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























