You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पोलीस दलातील 'शार्पशूटर' अधिकारी बेघर अवस्थेत सापडला तेव्हा..
मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरमधल्या स्वर्ग सदन आश्रमात आजकाल मनीष मिश्रा नामक एका व्यक्तीला भेटायला पोलीस अधिकाऱ्यांची ये-जा चालू आहे.
मनिष मिश्रा अनेक वर्षांपासून रस्त्यावरच राहात होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना या आश्रमात आणलं गेलं आहे. त्यांना भेटायला येणारे पोलीस अधिकारी कधी काळी त्यांचे बॅचमेट होते.
स्वर्ग सदन आश्रमाचे संचालक पवन सूर्यवंशींनी सांगितलं की, "मनीष मिश्रा इथे नीट राहात आहेत, आश्रमात त्यांची चांगली देखभाल केली जातेय आणि त्यांना बरं वाटतंय. त्यांना भेटायला सतत त्यांचे बॅचमेट येत आहेत आणि त्यांच्या जुन्या दिवसांच्या आठवणी जाग्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचा प्रयत्न आहे की त्यांना कमीत कमी 4-5 महिने इथे ठेवावं म्हणजे ते पूर्णपणे बरे होतील."
मनीष मिश्रांची कहाणी जाणून घ्यायची असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल. 10 नोव्हेंबरला ग्वाल्हेर विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी चालू होती. त्याच रात्री जवळपास 1.30 वाजता पोलीस खात्याचे दोन डीएसपी गस्त घालत होते. याच सुमारास त्यांना ग्वाल्हेरच्या झाशीरोड भागात एक व्यक्ती थंडीत कुडकुडताना दिसला.
त्या व्यक्तीची अवस्था पाहून एका अधिकाऱ्याने आपले बुट तर दुसऱ्याने आपलं जॅकेट त्या भिकाऱ्याला दिलं. यानंतर ते दोन्ही अधिकारी तिथून जायला लागले इतक्यात त्या व्यक्तीने दोन्ही अधिकाऱ्यांना नावानिशी हाक मारली.
दोन्ही अधिकाऱ्यांना आश्चर्य वाटलं की आपलं नाव या व्यक्तीला कसं माहिती? त्याच्याशी बोलल्यावर कळालं की ते त्यांच्याच बॅचचे पोलीस सब-इन्स्पेक्टर मनीष मिश्रा होते. मिळालेल्या माहितीनुसार मिश्रा गेल्या दहा वर्षांपासून असंच रस्त्यावर राहून जगत आहेत.
मनीष मिश्रा मध्य प्रदेश पोलिसांच्या 1999 च्या बॅचचे अधिकारी होते. त्यांच्याविषयी म्हटलं जातं की ते उत्तम नेमबाज होते. ज्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना ते मतमोजणीच्या दिवशी थंडीने कुडकुडत रस्त्यात बसलेले आढळले त्यांची नाव डीएसपी रत्नेश सिंह तोमर आणि विजय भदौरिया आहेत.
बिघडलेलं मानसिक संतुलन
रत्नेश सिंह तोमर यांनी सांगितलं की, "मानसिक संतुलन बिघडल्यामुळे त्यांची अशी परिस्थिती झाली. आधी ते आपल्या कुटुंबासोबत राहायचे पण घरातून पळून जायचे. त्यामुळे कुटुंबाने त्यांची खबरबात घेणं बंद केलं."
मनीष यांना आपल्या सोबत घेऊन जाण्याची या दोन्ही अधिकाऱ्यांची इच्छा होती पण त्यांनी जायला नकार दिला.
त्यानंतर या अधिकाऱ्यांनी मनीष यांना स्वयंसेवी संस्थेमार्फत आश्रमात पाठवून दिलं जिथे आता त्यांची काळजी घेतली जात आहे. मनीष मिश्रा मध्य प्रदेशातल्या शिवपुरीचे आहेत. त्यांचे आई-वडील अजूनही तिथेच असतात पण त्यांचं आता खूप वय झालंय. मनीष मिश्रांची चुलत बहीण चीनमध्ये परराष्ट्र सेवेत अधिकारी आहे.
सर्वसामान्य जीवन
आश्रमाचे संचालक पवन सूर्यवंशींनी सांगितलं की चीनमधल्या त्यांच्या बहिणीने फोन करून त्यांची ख्यालीखुशाली विचारली. "त्या म्हणाल्या की त्या लवकरच येतील आणि मनीष मिश्रांची काय मदत करता येते हे पाहातील."
त्यांच्या शिवपुरीत राहाणाऱ्या कुटुंबाशी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही. मनीष मिश्रांनी 2005 ला नोकरी केली. त्या सुमारास त्यांची नेमणूक दातिया जिल्ह्यात झालेली होती. यानंतर त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं.
सुरुवातीला 5 वर्ष ते घरी राहिले. त्यांच्याबद्दल जी माहिती मिळाली त्यावरून असं कळतं की त्यांना ज्या ज्या मानसिक आरोग्य केंद्रात किंवा आश्रमात दाखल केलं तिथून ते पळून गेले. त्यांच्या कुटुंबालाही माहिती नव्हतं की ते कुठे आहेत.
दुसरीकडे मनीष मिश्रांचे जे बॅचमेट त्यांना भेटायला येत आहेत त्यांनी मनीष मिश्रांना शक्य होईल ती सगळी मदत करू असं म्हटलं आहे. पवन सूर्यवंशींनी सांगितलं की, "त्यांचे सहकारी त्यांची मदत करू इच्छितात आणि त्यांची इच्छा आहे की मनीष मिश्रांनी बरं होऊन सामान्य जीवन जगावं."
ग्वाल्हेरच्या लोकांनी सांगितलं की मनीष मिश्रा गेली अनेक वर्ष रस्त्यांवर भीक मागून आपली गुजराण करत होते. अनेकांनी त्यांना रस्त्यावर फिरताना पाहिलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)