पाकिस्तान : इम्रान खान सरकारचे आरोप पूर्णत: खोटे - भारतीय परराष्ट्र मंत्रालय

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

पाकिस्तानात घडणाऱ्या 'दहशतवादी घटनां'मागे, भारतीय गुप्तचर यंत्रणांचा हात असल्याचा आरोप पाकिस्तान सरकारकडून करण्यात आला आहे.

एका 'डोसिअर'चा आधार घेऊन 'आमच्याकडे पाकिस्तानात घडणाऱ्या दहशतवादी कारवायांमागे भारतीय गुप्तचर यंत्रणा असल्याचा' दावा पाकिस्तान सरकारने केलाय.

गेल्या काही दिवसांपासून 'लाइन ऑफ कंट्रोल' वर भारत आणि पाकिस्तान यांच्यात गोळीबाराच्या घटना घडत आहेत. सीमेवर भारत आणि पाकिस्तानी सैन्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर, शनिवारी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा मेहमूद कुरेशी आणि पाकिस्तानी सैन्यदलाचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी हा आरोप केला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील या संदर्भात एक ट्विट करत भारतावर आरोप केलेत. इम्राम खान यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला या प्रकरणी भारतावर दबाव आणण्याची विनंती केली आहे.

पाकिस्तानकडून पत्रकार परिषदेत करण्यात आलेल्या आरोपांना भारत सरकारने प्रत्युत्तर दिलं आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या आरोपांबद्दल म्हणतात, "आम्हाला मीडिया रिपोर्टमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेबाबत माहिती मिळाली आहे. हा निरर्थक आणि भारताविरोधी प्रचार सुरू आहे."

अनुराग श्रीवास्तव यांच्या सांगण्यानुसार, "भारताविरोधात कथित पुरावे असल्याचे आरोप पूर्णत: खोटे आहेत. या आरोपात तथ्य नाही. मुद्दाम करण्यात आलेल्या त्यांच्या या आरोपांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही. याचं कारण, आंतरराष्ट्रीय समुदायाला त्यांची चाल माहिती आहे. दहशतवाद्यांना इस्लामाबादकडून प्रोत्साहन मिळतं, ही गोष्ट त्यांच्याच नेतृत्वाने स्वीकारली आहे."

"आतरराष्ट्रीय दहशतवादाचा चेहरा ओसामा बिन लादेन पाकिस्तानात रहात होता. ओसामाला पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधानांनी "शहीद" असा दर्जा दिला. त्यांनी स्वत: पाकिस्तानात 40 हजारपेक्षा जास्त दहशतवादी असल्याची गोष्ट मान्य केली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाची गोष्ट स्वीकारली होती. पुलवामा हल्ल्यात 40 भारतीय जवान मृत्यूमुखी पडले होते," असं अनुराग श्रीवास्तव पुढे म्हणाले.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव पुढे सांगतात, "शांती आणि स्थिरता कायम ठेवण्यासाठी 2003 मध्ये शस्त्रसंधी करण्यात आली. मात्र, पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात शिरकाव करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देत असतो. दहशतवादी कारवाया, भारतात दहशतवाद्यांचा शिरकाव आणि शस्त्रांची ने-आण कायम सुरू असते. 'एलओसी' वर तैनात पाकिस्तानी सैन्याच्या मदतीशिवाय हे शक्य नाही."

पाकिस्तानकडून आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद त्यांचं राजकीय आणि आर्थिक अपयश झाकण्याच्या हेतूने करण्यात आली होती, असं श्रीवास्तव म्हणाले.

पाकिस्तानकडून काय आरोप करण्यात आलेत?

पाकिस्तानकडून भारतावर असे आरोप पहिल्यांदा करण्यात आलेले नाहीत. याआधी देखील पाकिस्तानकडून असे आरोप करण्यात आले होते. भारताने पाकिस्तानचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

बीबीसी उर्दूचे प्रतिनिधी सहर बलोच यांच्या रिपोर्टनुसार, शुक्रवारी भारत आणि पाकिस्तानने एकमेकांवर सीमेवर शस्त्रसंधीच उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.

भारतीय सैन्याच्या माहितीनुसार, या गोळीबारात तीन भारतीय सैनिकांसह सहा लोकांचा मृत्यू झाला. भारतीय सैन्याचे तीन जवान यात जखमी झाले.

दरम्यान, पाकिस्तानची स्टेट डिजास्टर मॅनेजमेंट ऑथॉरीटी (मुजफ्फराबाद) यांच्या माहितीनुसार, भारताकडून करण्यात आलेल्या गोळीबारात चार पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झालाय आणि 23 सैनिक जखमी झाले आहेत.

पाकिस्तानचा दावा आहे की या गोळीबारात त्यांच्या चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

पाकिस्तानचे आरोप

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या एका तासाच्या पत्रकार परिषदेत परराष्ट्रमंत्री आणि सैन्याच्या प्रवक्त्यांनी विविध कागदपत्रांच्या आधारे हा दावा केला की, 'भारत पाकिस्तानच्या कोणत्या भागात आणि टोळ्यांच्या मदतीने कथित दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन' देत आहे.

यावेळी शाह महमूद कुरेशी म्हणाले, "आम्हाला नेहमीच पुरावे समोर ठेवण्यासाठी सांगण्यात येतं. आज आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरावे गोळा करून याकडे सर्वांच लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहोत."

त्यांनी पुढे म्हटलं की, यापुढे पाकिस्तान शांत बसणार नाही. या परिसरात शांती आणि स्थिरता कायम ठेवण्यासाठी आता तडजोड केली जाणार नाही.

पत्रकार परिषदेच्या सुरूवातीलाच शाह मेहमूद कुरैशी म्हणाले, "पाकिस्तानला दहशतवादामुळे मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. ज्याला (आंतरराष्ट्रीय स्त्ररावर) मान्य करण्यात आलं आहे."

2000 ते 2020 या काळात पाकिस्तानात 130 दहशतवादी हल्ले झाल्याचा त्यांनी दावा केला. ज्यात 83,000 पेक्षा जास्त मृत्यूमुखी पडले आणि 32,000 जखमी झाले.

त्यांच्या दावा आहे की, काही दिवसांपूर्वी पेशावर आणि क्वेट्टामध्ये घडलेल्या दहशतवादी कारवायांमागे भारताचा हात आहे. दरम्यान, या आरोपांवर भारताकडून अजूनही उत्तर देण्यात आलेलं नाही.

"भारतात त्यांची जमीन पाकिस्तान विरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी वापराया परवानगी दिली जाते," असा आरोप त्यांनी केला.

त्याचसोबत, आयएसपीआरचे संचालक मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांच्या आरोपांनुसार, पाकिस्तानने ज्या संघटनांची पाळंमुळं उखडून टाकली. त्या सर्व संघटनांना भारताने आपल्या जवळ केलं आहे.

ते पुढे म्हणाले, बलूचिस्तानात बलूच लिबरेशन आर्मी (बीएलए) च्या माध्यमातून विद्रोह करण्याचा प्रयत्न सतत होत असतो आणि याआधी देखील करण्यात आला आहे.

"कराचीमध्ये अल्ताफ हुसैन यांच्या संघटनेला शस्त्रास्त्र पुरवून भारत त्यांना आर्थिक मदत करतो," असं ते म्हणाले.

'भारताने दहशतवाद्यांना एकत्र केलं'

मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी आरोप केला की, "भारताकडून दहशतवादी संघटनांशी चर्चा करून, पाकिस्तानविरोधी दहशतवाद्यांची संघटना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे."

ते म्हणाले, "त्यात देशभक्त संघटनातून बाहेर पडलेल्या अनेक टोळ्यांचा सहभाग आहे. दुसरीकडे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानपासून ऑगस्ट 2020 मध्ये वेगळं झाल्यानंतर अलहरार आणि हरकत-उल-अन्सार बनल्यानंतर भारत याची एक मोठी संघटना बनवण्याचा प्रयत्न करतोय. ज्यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली बलूच लिबरेशन आर्मी, बलूचिस्तान लिबरेशन फ्रंट, बलूचिस्तान रिपब्लिकन आर्मी यांच्याशी जोडलेल्या दहशतवाद्यांचा सहभाग आहे."

त्यांच्या आरोपांनुसार, या संघटनांचं समर्थन करणारे आणि मास्टर प्लान तयार करणारे अफगाणिस्तान उच्चायुक्त कार्यालयात तैनात असलेले भारतीय गुप्तचर यंत्रणेचे एक कर्नल आहेत.

भारतीय सैन्याने या आरोपांवर अजूनही उत्तर दिलेलं नाही.

"पाकिस्तान नेहमीच मुद्दाम सामान्य नागरिकांच्या ठिकाणांना टार्गेट," करत असल्याची प्रतिक्रिया सीमेवर झालेल्या गोळीबारानंतर भारतीय सैन्याने दिली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)