अर्णब गोस्वामी अटक : 'अन्वय नाईक आत्महत्येची चौकशी बंद करणाऱ्यांची चौकशी करा' : #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वेगवेगळी वृत्तपत्रं आणि बेवसाईट्वर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे आहेत.

1. 'अन्वय नाईक यांच्या आत्मत्येची चौकशी क्लोज करणाऱ्यांचीच चौकशी व्हावी'

अन्वय नाईक यांच्या आत्महत्येची चौकशी कशी बंद झाली? ती चौकशी क्लोज करणाऱ्यांचीही चौकशी झाली पाहिजे असं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. याविषयीची बातमी TV9 मराठीने दिली आहे.

ते रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्या अटकेविषयी बोलत होते. एखादी व्यक्ती पत्रकार असो किंवा अधिकारी असो किंवा आणखी कुणी सर्वांसाठी कायदा सारखा असतो, असं सावंत यांनी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसंदर्भात म्हटलं आहे. अन्वय नाईक यांच्या केसमध्ये आधीच्या अधिकऱ्यांनीही त्यांच्या परिवाराला मदत केली नाही. त्या अधिकाऱ्यांची चौकशी केली पाहिजे, म्हणजे यामागे कुणाचा दबाव होता हे समजेल, असंही सावंत म्हणालेत.

2. केंद्र सरकारमुळेच काश्मिरी तरूणांनी हाती घेतल्या बंदुका - मेहबुबा मुफ्ती

केंद्र सरकाराच्या धोरणामुळेच काश्मिरी तरूण बंदूक उचलत आहेत, असं विधान पीडीपी पक्षाच्या मेहबुबा मुफ्ती यांनी केलं आहे. ही बातमी सकाळने दिली आहे.

एका पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या की, "जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यामुळे इथे रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे. संपूर्ण जम्मू - काश्मीर आणि लडाखच्या लोकांचा रोजगार हिरावला गेला आहे. त्यांचा आपल्या जमिनीवरचा हक्कही काढून घेतला जात आहे. याला विरोध करणाऱ्या काश्मिरी तरूणांना जबरदस्तीने तुरुंगात पाठवलं जात आहे आणि म्हणूनच तुरुंगात जाण्यापेक्षा काश्मिरी तरूण बंदुका उचलत आहेत."

म्हणूनच भाजपच्या कार्यकाळात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली असा आरोपही त्यांनी केला.

3. ड्रग्जप्रकरणी अर्जुन रामपालला एनसीबीचं समन्स

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या घरी धाड टाकली. तब्बल 7 तासाच्या कारवाईनंतर एनसीबीनं अर्जुन रामपालला चौकशीसाठी 11 नोव्हेंबरला हजर राहण्याचं समन्सही दिलं आहे. तसंच त्याच्या घरातलं काही सामानं ही जप्त केलं. ज्यामध्ये भारतात बंदी असलेली काही औषधे आहेत. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.

याआधी बॉलिवूडमधील निर्माते आणि दिग्दर्शक फिरोज नाडियाडवाला यांच्या घरी कारवाई करत एनसीबीने फिरोज यांची पत्नी शबाना सईद यांना अटक केली. याआधी सुद्धा अर्जुन रामपालचं नाव ड्रग्स कनेक्शनमध्ये समोर आलं होतं.

4. पिंपरीतील 'त्या'कर्तव्यदक्ष वाहतूक पोलिसाच्या पाठीवर गृहमंत्र्यांची कौतुकाची थाप

विनामास्क वाहनचालकांवर कारवाई करताना एका वाहनचालकाने वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी घातली. तसेच गाडीच्या बोनेटवरून फिरवलं. जिवाला धोका असतानाही वाहतूक पोलिसाने धाडस दाखवून कर्तव्य पार पाडलं. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्कार करून या पोलिसाचे कौतुक केलं आहे. ही बातमी लोकमतने दिली आहे.

आबासाहेब विजयकुमार सावंत, असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. सावंत हे चिंचवड वाहतूक विभागात कार्यरत आहेत. चिंचवडच्या अहिंसा चौकात सावंत वाहतूक नियमन करून विनामास्क वाहनचालकांवर कारवाई करीत होते. त्यावेळी युवराज हनुवते हे चारचाकी वाहनचालक मास्कचा वापर न करता वाहन चालव असल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं आहे.

त्यामुळे पोलीस कर्मचारी सावंत यांनी वाहन थांबविण्यास सांगितलं. मात्र हनुवते यानं वाहन न थांबवता सावंत यांच्या अंगावर चारचाकी गाडी घातली. त्यावेळी सावंत यांनी प्रसंगावधान राखत चारचाकीच्या बोनेटवर झेप घेतली. त्यानंतरही वाहनचालक हनुवते याने गाडी न थांबविता सावंत यांना बोनेटवरून 800 मीटर घेऊन गेला. या वेळी सावंत यांनी धाडसाने स्वत:चा बचाव केला. त्यानंतर वाहनचालक हनुवते याच्यावर पोलिसांनी कारवाई केली.

5. चारचाकी वाहनांसाठी फास्टटॅग आता अनिवार्य

केंद्र सरकारने आता सर्व चारचाकी वाहनांसाठी 1 जानेवारी 2021 पासून 'फास्ट टॅग' अनिवार्य केलाय. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या संदर्भात एक परिपत्रक काढले आहे. ज्यामध्ये 1 जानेवारीपासून सर्व चार चाकी वाहनांसाठी 'फास्ट टॅग' अनिवार्य करण्यात आलाय.

विशेष म्हणजे हा नियम 1 डिसेंबर 2017 च्या अगोदर खरेदी झालेल्या वाहनांसाह M आणि N कॅटेगिरीतील वाहनांना देखील लागू असणार आहे. ही बातमी झी 24 तासने दिली आहे.

सुरुवातीला टोल नाक्यांवरील 75 टक्के हायवेंवरच ही योजना असेल, तर उर्वरित रस्त्यांवर टोल भरण्यासाठी रोख रक्कमेची सुविधा असणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.' रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीचे कोरोना पॉडकास्ट तुम्ही फेसबुकवर पाहू शकता..)