नारायण राणेंची टीका, 'शिवसेनेकडे संख्याबळ नसल्याने उद्धव ठाकरे पिंजऱ्यात बसतात.'

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. 'शिवसेनेकडे संख्याबळ नसल्याने उद्धव ठाकरे पिंजऱ्यात बसतात' - नारायण राणे

भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. "उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदारांचे पुरेसे संख्याबळ नसल्याने ते पिंजऱ्यातून बाहेर पडत नाहीत," अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. टिव्ही 9 ने हे वृत्त दिले आहे.

"आगामी विधानसभा निवडणुकीत कोकणातील शिवसेनेच्या सर्व 11 आमदारांना घरी बसवू," असंही नारायण राणे म्हणाले आहेत.

"कोकणासाठी जाहीर केलेला निधी सरकार देत नाही तसंच शिवसेनेचे आमदार कोकणातील विकासासाठी बोलत नाहीत," असा आरोप नारायण राणे यांनी केला. तसंच भाजप कोकणाच्या विकासासाठी आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

"महसूलमंत्री काँग्रेसचा असताना शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना कोण विचारतं? अब्दूल सत्तार यांना कोकणाची काय माहिती आहे? पूर्वी ते अशोक चव्हाणांच्या मागेमागे फिरायचे," अशी टीकाही राणेंनी केली आहे.

2. '…तर मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही,' नवनीत राणांचा उद्धव मुख्यमंत्र्यांना इशारा

"दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावी अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही," असा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे. लोकमतने हे वृत्त दिले आहे.

अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांकडून बोंडअळीग्रस्त कापसाचे झाड जाळून सरकारचा निषेध करण्यात आला.

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली मदत पुरेशी नसून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्यावे अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.

3. एकनाथ खडसेंचे 'टार्गेट' गिरीश महाजन, 250 भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

एकनाथ खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर उत्तर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांनी जळगाव येथे घेतलेल्या कार्यक्रमात भाजपच्या जवळपास 250 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दिले आहे.

जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून त्यांनी भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्या गडाला सुरुंग लावला आहे. खडसे यांच्या उपस्थितीत गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले.

खडसेंचा मतदारसंघ मुक्ताईनगर येथे दोन बस भरून कार्यकर्ते आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षांतर केल्याने भाजपसाठी स्थानिक पातळीवर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

4. 'केंद्र सरकार देशात हळूहळू आणीबाणी आणत असल्याचे चित्र आहे' - सुप्रिया सुळे

केंद्र सरकार देशात हळूहळू आणीबाणी आणत असल्याचे चित्र आहे असी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मुंबईत मेट्रोकारशेडच्या जागेवरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा वाद निर्माण झाला आहे. असं वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिलं आहे.

कांजूरमार्ग येथील 102 एकर जमीनीवर मेट्रोकारशेडसाठीचे काम सुरू झाले असताना डीपीआयआयटीनं राज्य सरकारला पत्र पाठवून काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ही जागा नेमकी कुणाची? केंद्राची की राज्य सरकारची असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

यासंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "राज्याचे सर्व अधिकार काढून घेण्याचे पाप केंद्र सरकार करत असून हे दुर्देवी आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या विकासात हस्तक्षेप करत आहे. ही जमीन महाराष्ट्राची आहे. त्यामुळे पहिला अधिकार राज्याचा आहे. भाजपचे नेते कोणत्या आधारावर टीका करत आहेत?" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

5. KBC दरम्यान विचारलेल्या प्रश्नावरून अमिताभ बच्चन यांच्याविरोधात पोलीस तक्रार

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि ते सूत्रसंचालन करत असलेला टिव्ही शो 'कौन बनेगा करोडपती' विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी ही तक्रार केली आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिले आहे.

अभिमन्यू पवार यांनी ट्वीट करून यासंदर्भातील माहिती दिली. ते म्हणाले, "30 ऑक्टोबरला प्रसारित झालेल्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात "25 डिसेंबर 1925 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांसोबत कोणत्या धर्मग्रथांच्या प्रती जाळल्या?" असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर अभिमन्यू पवार यांनी आक्षेप घेतला आहे.

"या प्रश्नाखालील देण्यात आलेले उत्तरांसाठीचे सर्व पर्याय हिंदू धर्माशी निगडित असून हिंदू धर्मग्रंथ जाळण्यायोग्यच असल्याचा संदेश दिला गेला," असा आरोप अभिमन्यू पवार यांनी केला आहे.

यावर अद्याप वाहिनीकडून किंवा अमिताभ बच्चन यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ती आल्यावर इथे अपडेट करण्यात येईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)