एकनाथ खडसे म्हणतात राष्ट्रवादीकडे आमदारकी खासदारकी मागितली नाही #5 मोठ्या बातम्या

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

1. राष्ट्रवादीकडे आमदारकी-खासदारकी मागितली नाही - खडसे

"आपण कोणत्याही पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसून, आमदारकी किंवा खासदारकी मागितली नाही, पण मिळाली तर त्याचा आनंद असेल," असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय.

टीव्ही 9 मराठीने याविषयीची बातमी दिली आहे.

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं. यावर उत्तर देताना "पक्षातील कार्यकर्ते सोडून जाऊ नयेत म्हणून असं विधान करावं लागतं," असं खडसेंनी म्हटलंय.

"कुणाच्या मागे कोण आहे आणि कोण सक्षम आहे येत्या काळात कळेल," असंही खडसे म्हणाले आहेत.

2. काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 3 भाजप पदाधिकारी ठार

काश्मीरमधल्या कुलगाव जिल्ह्यात अतिरेक्यांनी भाजपच्या 3 पदाधिकाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केली.

फिदा हुसैन याटू, उमर रशीद बेग आणि उमर रमजान हजम अशी या तिघांची नावं आहेत. कुलगाममधल्या वाय. के. पोरा भागात हा हल्ला झाला.

हिंदुस्तान टाईम्सने याविषयीची बातमी दिलेली आहे.

हल्ला झालेले तिघेही भाजपच्या युवा मोर्चाचे काश्मीरमधले पदाधिकारी होते. गोळीबार झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

3. संपूर्ण गुजरात काँग्रेस 25 कोटींना खरेदी केली जाऊ शकते - विजय रुपाणी

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी बुधवारी विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार केला.

"सध्याच्या काँग्रेसकडे महात्मा गांधींचे गुण नाहीत संपूर्ण गुजरात काँग्रेस 25 कोटी रुपयांत खरेदी केली जाऊ शकते," असं रुपाणी यांनी म्हटलंय.

लोकमतने ही बातमी दिली आहे.

काँग्रेसच्या माजी आमदाराला 25 कोटींना खरेदी करत तिकीट देण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने भाजपवर केला होता.

4. लार्सन अँड टुब्रोला बुलेट ट्रेनचं कंत्राट

मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठीचं कंत्राट लार्सन अँड टुब्रो कंपनीला मिळालंय. 50 किलोमीटर्स लांबीच्या या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पामध्ये यासाठीची व्हायाडक्ट्स, स्थानकं, नद्यांवरचे पूल, डेपो आणि इतर पूरक गोष्टी उभारण्याचं काम लार्सन अँड टुब्रो करेल.

महाराष्ट्र टाईम्सने याविषयीची माहिती दिली आहे.

ताशी 320 किमीच्या वेगाने धावणारी ही ट्रेन मुंबई ते अहमदाबाद हे अंतर न थांबता 2 तासांत, तर सर्व थांबे घेऊन 3 तासांत कापेल.

5. मारहाण झाली त्याच ठिकाणी कॉन्स्टेबलचा सत्कार

मुंबईतल्या वाहतूक पोलिसाने कारवाई केली म्हणून मारहाण करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हे पोलिस कॉन्स्टेबल एकनाथ पारठे यांचा त्याच स्थळी सत्कार करण्यात आला. ही महिला मारहाण करत असतानाही कॉन्स्टेबल पारठे संयम बाळगून होते.

मुंबई पोलिसांनी पारठेच्या सत्काराचा व्हिडिओ ट्वीट केलाय.

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या हस्तेही कॉन्स्टेबल एकनाथ पारठेंचा 10 हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. लोकसत्ताने याविषयीची बातमी दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)