आरोग्यसेतू अॅप कुणी बनवलं?, सरकारकडे उत्तर नाही

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

कोरोनासंदर्भात नागरिकांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेलं आरोग्यसेतू अॅप कोणी तयार केलं याविषयी सरकारकडे माहिती नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती मिळवण्याच्या दृष्टीकोनातून भारत सरकारने आरोग्य सेतू हे मोबाईल अॅप बनवलं होतं.

पण हे अॅप कुणी आणि कसं तयार केलं, या प्रश्नाचं उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी केंद्रीय माहिती आयोगाने भारत सरकारला नोटीस पाठवली आहे.

केंद्रीय माहिती आयोगाने नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरला याबाबत उत्तर मागितलं आहे. आरोग्य सेतू अॅपच्या वेबसाईटवर त्यांचं नाव आहे, तर मग त्यांच्याकडे अॅप बनवल्याबाबत माहिती कशी काय उपलब्ध नाही, असं आयोगाने म्हटलं आहे.

आयोगाने याविषयी नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हीजन, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व प्रसारण मंत्रालय तसंच नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरच्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

याप्रकरणी माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे त्यांच्यावर माहिती अधिकार कायद्यांतर्गत कारवाई का करण्यात येऊ नये, असं आयोगाने म्हटलं आहे.

कोट्यवधी लोकांकडून वापरल्या जाणाऱ्या या अॅपबाबत स्पष्टपणे उत्तर का देण्यात आलं नाही, याबाबत आयोगाने स्पष्टीकरण मागितलं आहे.

कोरोना व्हायरसच्या साथीच्या काळात आरोग्य सेतू अॅप अनेकांनी डाऊनलोड केलं आहे.

भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळोवेळी लोकांना हे अॅप डाऊनलोड करून घेण्याचं आवाहन करत होते.

सध्या प्रत्येक सार्वजनिक ठिकाणं, कार्यालयं, रेल्वे किंवा विमान प्रवासादरम्यान आरोग्य सेतू अॅप मोबाईलमध्ये असणं अनिवार्य आहे.

आरोग्य सेतू अॅपच्या वेबसाईटमधील माहितीनुसार हे अॅप नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने बनवलं आहे.

पण माहिती अधिकार कायद्यांतर्गत हे अॅप कुणी बनवलं याची माहिती मागितली असता त्याची माहिती आपल्याकडे नाही, असं दोन्ही विभागांनी म्हटलं आहे.

सौरव दास यांनी मुख्य माहिती आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती. आरोग्य सेतू अॅप बनवणाऱ्यांची माहिती मिळवण्यासाठी NIC, नॅशनल ई-गव्हर्नंन्स डिव्हिजन आणि मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्याशी संपर्क साधला होता, असा दावा सौरव दास यांनी केला आहे.

दास यांनी आरोग्य सेतू अॅपबाबत सुरुवातीचा प्रस्ताव, याला मिळालेली मंजुरी, या कामात सहभागी कंपन्या, व्यक्ती आणि सरकारी विभाग यांच्याबाबत माहिती मागितली होती.

अॅप बनवताना संबंधित व्यक्तींमध्ये झालेल्या माहितीच्या देवाण-घेवाणीबाबतसुद्धा सौरव दास यांनी माहिती मागितली होती. त्यांचा अर्ज दोन महिने वेगवेगळ्या सरकारी विभागांमध्ये फिरत राहिला.

NIC किंवा मंत्रालय, कुणीही याबाबत माहिती दिली नाही, असं दास यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

NICकडे आरोग्य सेतू अॅपबाबत माहिती उपलब्ध नसूनही त्यांच्या वेबसाईटवर आरोग्य सेतूचं नाव का लिहिलं आहे, याचं उत्तर केंद्रीय माहिती आयोगाने NIC कडे मागितलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)