You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे: 'काहीजण पराभवाचे वर्ष साजरे करायलाच बीडमध्ये येतात' #5मोठ्याबातम्या
आज सकाळी विविधं वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. काहीजण पराभवाचे वर्ष साजरे करायलाच बीडमध्ये येतात- धनंजय मुंडे
"काही जण पराभवाचे वर्ष साजरे करायलाच बीडमध्ये येतात. वर्षभरात या मातीतल्या माणसांची कुणाला आठवण होत नाही," अशी टीका धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केली.
पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. धनंजय मुंडे यांनी त्या टीकेला उत्तर दिलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
पंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणावरही धनंजय मुंडे यांनी टीका केली.
"कोरोनाच्या संकटात घरामध्ये बसले. संकटातच्या काळात मदतीला आले नाहीत," असं म्हणत नाव न घेता धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना टोला लगावला.
आम्ही सुद्धा 2014 मध्ये पराभूत झालो पण जनतेला वाऱ्यावर सोडलं नव्हतं असंही धनंजय मुंडेंनी म्हटलं.
दरम्यान, दसरा मेळाव्यानंतर पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकर, भागवत कराड यांच्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2. खुर्चीसाठी सोयीनुसार हिंदुत्व वापरणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये- चंद्रकांत पाटील
"बाळासाहेबांच्या नावाने अजून किती दिवस पोळ्या भाजणार? खुर्चीसाठी हिंदुत्वाला आपल्या सोयीनुसार चालवणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये," असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीये.
शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासह विविध मुद्यांवरून भाजपावर टीका केली. यानंतर आता भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर दिलं जात आहे.
"राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात आपली अर्वाच्य भाषा एका अभ्यासशून्य व भाषणातून सादर केली. राज्यप्रमुख असूनही आपल्या भाषणात एकही सेकंद शेतकऱ्यांसाठी दिला नाही, मग त्या पदाचा काय उपयोग?" असं ट्वीट करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
या ट्वीटसोबत त्यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक पत्र देखील लिहिलं आहे.
3. खाजगी प्रयोगशाळेत आता कोरोनाची चाचणी 980 रुपयांत- राजेश टोपे
राज्यात खाजगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर बदलण्यात आले आहेत. झी 24 तासनं ही बातमी दिली आहे.
आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी 980, 1400 आणि 1800 रुपये असा कमाल दर आकारण्यास खाजगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खाजगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही.
4500 रुपयांवरुन 980 रुपयांपर्यंत इतके कमी दर निश्चित करुन सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं.
कोरोना चाचण्यांचे दर निश्चित करताना तीन टप्पे करण्यात आले आहेत. राज्यात कोरोना नियंत्रणासाठी चाचण्यांवर भर देण्यात असून प्रति दहा लाख लोकसंख्येमागे 70 हजार चाचण्या केल्या जात असून त्या वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
4. मेहबूबा मुफ्तींच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत पीडीपीच्या तीन नेत्यांचे राजीनामे
जम्मू आणि काश्मीरमधील पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीच्या तीन नेत्यांनी मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्यांवर नाराजी दाखवत राजीनामे दिले आहेत. राजीनामा देणाऱ्या नेत्यांमध्ये टीएस बाजवा, वेद महाजन आणि हुसेन-ए-वफा यांच्या नावांचा समावेश आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
त्यांनी मेहबुबा मुफ्ती यांना पत्र लिहून आपल्या राजीनाम्याची कारणं सांगितली.
या नेत्यांनी मेहबुबा मुफ्ती यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की "आम्ही तुमच्या काही कामांवर, वक्तव्यांवर नाराज आहोत. विशेष करुन देशभक्तीच्या भावनेचा अनादर केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आम्हाला असहज वाटत आहे."
दरम्यान, मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं होतं की, "जोपर्यंत जम्मू काश्मीरचा झेंडा मिळत नाही, तोपर्यंत अन्य ध्वज फडकवणार नाही."
5. पत्रकारिता जबाबदारीनं करावी- सर्वोच्च न्यायालय
रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांची पत्रकारितेची शैली आणि वक्तव्ये यांच्या संदर्भात सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सोमवारी (26 ऑक्टोबर) नापसंती व्यक्त केली. इंडियन एक्सप्रेसनं ही बातमी दिली आहे.
पत्रकारिता हे जबाबदारचे काम आहे आणि याबाबत आपल्या अशिलाला जाणीव करून द्यावी, असे सरन्यायाधीशांनी गोस्वामी यांचे वकील हरिश साळवे यांना बजावले.
''जनहिताच्या नावाखाली याआधी कधीही या स्तरावरून वक्तव्ये करण्यात आली नव्हती'', असे निरीक्षण नोंदवत, समाजात शांतता आणि सौहार्द कायम ठेवणे ही आमची जबाबदारी आहे, असं नमूद केले.
कथितरीत्या प्रक्षोभक वक्तव्ये केल्याबद्दल रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेल्या दोन एफआयआरच्या तपासाला स्थगिती देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध महाराष्ट्र सरकारने केलेल्या अपिलाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे मत व्यक्त केले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)