संभाजीराजे छत्रपती : उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांची मदत करणं शक्य नसेल, तर राज्यपालांकडे जातो - #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. मुख्यमंत्र्यांना शक्य नसेल तर राज्यपालांकडे जातो - संभाजीराजे छत्रपती

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची मदत करण्याची प्राथमिक जबाबदारी राज्य सरकारची आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून होत नसेल, तर मी राज्यपालांना विनंती करू शकतो, असं वक्तव्य राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत संभाजीराजे बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.

राज्यात फक्त दौरे करून काहीही होणार नाही. मंत्रिमंडळाची बैठक लवकरात लवकर बोलावून पुरग्रस्तांना तातडीची मदत मिळाली पाहिजे. हे काम मुख्यमंत्र्यांकडून होत नसेल तर मी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे जाईन, तुम्ही या विषयात लक्ष घाला, असं मी राज्यपालांना बोलू शकतो, असंही संभाजीराजे म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

2. पंकजा मुंडे आमच्या भगिनी, त्यांनी शिवसेनेत यावं - गुलाबराव पाटील

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं आहे. याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"भाजपमध्ये अनेक नेत्यांवर अन्याय होतोय, त्यात पंकजा मुंडेही आहेत. त्या आमच्या भगिनी आहेत, त्यामुळे त्यांनी शिवसेनेत यावं, अशी विनंती गुलाबराव पाटील यांनी केली.

पंकजा मुंडे या जमिनीवरील नेत्या आहेत. त्यांनी पक्ष वाढवण्याचं काम केलं. त्यांच्यासारखे नेते पक्षात आले तर स्वागतच आहे.

त्यांना बाळासाहेबांबाबत प्रेम आहे. पंकजा आणि त्यांच्या भगिनी निवडणुकीत उभ्या असताना त्यांच्याविरुद्ध शिवसेना उमेदवार देत नाही, त्यामुळे त्या पक्षात आल्यास स्वागतच आहे, असं पाटील म्हणाले. ही बातमी एबीपी माझाने दिली.

3. मुंबई वीज खंडितप्रकरणी सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश

मुंबईत वीज पुरवठा खंडीत झाल्याप्रकरणी विशेष समितीची स्थापन करून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत.

"मुंबई आणि परिसरातील वीजपुरवठा खंडीत घटनेची चौकशी तसंच तांत्रिक लेखापरीक्षण करून उपाययोजना सुचविण्यासाठी तांत्रिक, लेखापरीक्षण समिती नेमण्यात येणार असून याबाबत शासन निर्णयही जाहीर झाला आहे. तसंच सात दिवसात याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश या समितीला देण्यात आले आहेत," असं ऊर्जामंत्र्यांनी ट्वीट करून सांगितलं.

मुंबईत 12 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे असं झाल्याचं 'बेस्ट'ने म्हटलं होतं. ही बातमी दैनिक लोकसत्ताने दिली आहे.

4. अकाली दल, लोकजनशक्ती पार्टीनंतर गोरखा जनमुक्ती मोर्चा NDA तून बाहेर

लोकसभा निवडणुकीच्या दीड वर्षानंतर NDA मधील पक्ष एक-एक करून भाजपची साथ सोडताना दिसत आहेत.

शिवसेना, अकाली दल, लोकजनशक्ती पार्टी यांच्यानंतर आता ईशान्य भारतातील गोरखा जनमुक्ती मोर्चा हा पक्ष NDA मधून बाहेर पडला आहे. पक्षाचे अध्यक्ष बिमल गुरुंग यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.

केंद्र सरकारने गोरखालँडसाठी दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे आम्ही बाहेर पडत असल्याचं गुरुंग यांनी सांगितलं. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आश्वासने पूर्ण केली असून विधानसभा निवडणुका तृणमूलसोबत युती करून लढविण्याची घोषणाही गुरुंग यांनी केली. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.

5. संजय दत्त यांची कॅन्सरवर मात

गेल्या अनेक दिवसांपासून फुफ्फुसांच्या कर्करोगावर उपचार घेत असलेले बॉलीवूड अभिनेते संजय दत्त आता त्यातून बरे झाले आहेत. संजय दत्त यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली.

"आज तुम्हा सर्वांसोबत ही बातमी शेअर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. माझं मन कृतज्ञतेने भरलं आहे. गेले काही महिने माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. देव बलवान सैनिकाचीच सर्वांत कठीण परीक्षा घेतो, असं म्हणतात. आज, माझ्या मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी ही लढाई जिंकून परत आलो, हे सांगायला आनंद होत आहे. मी माझ्या मुलांना आणि कुटुंबाला याहून चांगलं गिफ्ट दुसरं काही देऊ शकलो नसतो. तुमचा विश्वास आणि पाठबळाशिवाय हे सर्व शक्य झालं नसतं," असं संजय दत्त म्हणाले. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)