एकनाथ खडसे यांच्या निर्णयाचे उद्धव ठाकरेंकडून स्वागत, पण शिवसैनिकांची भावना काय?

एकनाथ खडसे

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले असले तरी उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे आमदार मात्र नाराज आहेत.

"एकनाथ खडसे यांच्या मुलीला मी निवडणुकीत पराभूत केले आहे. माझा आणि खडसेंचा जुना राजकीय संघर्ष आहे. त्यामुळे आता ते महाविकास आघाडीमधल्या एका पक्षात आले तरी संघर्ष अटळ आहे. याची कल्पना मी आधीच वरिष्ठांना दिली होती," अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांचा मतदारसंघ मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

यासंदर्भात आपण गुरुवारी (22 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही सांगितले.

ते म्हणाले, "आज दिवसभर मी शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण ते व्यस्त होते. त्यांनी मला भेटीसाठी उद्याची वेळ दिली आहे. तसेच उद्धव ठाकरेंशीही पुन्हा एकदा चर्चा करणार आहे."

ते पुढे सांगतात, "खडसेंचं राजकारण वर्चस्वाचं आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजेच सत्ताधारी पक्षात येत असल्याने आमदार म्हणून माझे अधिकार आणि निर्णयांमध्ये हस्तक्षेप करणार."

उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ खडसे विरुद्ध शिवसेना हा जुना संघर्ष आहे. हा संघर्ष 2014 मध्ये टोकाला गेला. शिवसेनेसोबतची युती तोडण्याची घोषणा करण्यासाठी एकनाथ खडसेंनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पुढाकार घेतला होता.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, facebook

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेत असल्याने उत्तर महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणात उलथापालथ होणार आहे.

शिवसेनेच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्याने आणि स्थानिक आमदाराने नाव न घेण्याच्या अटीवर बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, " आम्हाला तर खडसेंनी कायम त्रास दिला आहे. यापुढेही देतील हे आम्ही गृहीत धरले आहे. त्यामुळे आतापर्यंत नडलो तसेच पुढेही नडू."

खानदेशात राष्ट्रवादी काँग्रेसचा सध्या एकच आमदार आहे. साधारण 2009 पर्यंत जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 पैकी 5 आमदार होते. पण कालांतराने ही संख्या घटत गेली. शिवसेनेने मात्र आपले पाच आमदार कायम राखण्यात यश मिळवलं.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेसोबत संबध बिघडणार? खडसेंना मंत्रिमंडळात जागा देण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत मतभेद आहेत का? एकनाथ खडसेंच्या पक्षांतराचे परिणाम महाविकास आघाडीत कसे होऊ शकतात? या सर्व प्रश्नांचा आढावा आपण या बातमीमध्ये घेणार आहोत.

शिवसेना आणि एकनाथ खडसे यांच्या संबंधात तणाव का?

सहा वर्षांपूर्वी म्हणजे 2014 सालच्या घटस्थापनेच्या काही दिवस आधी भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप-शिवसेना युती तुटल्याची घोषणा केली होती. पत्रकार परिषदेत 25 वर्षांची भाजप आणि शिवसेनेची मैत्री संपुष्टात आल्याचे खडसेंनी जाहीर केले.

2014 विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेच्या घटस्फोटाचे कारण शिवसेनेच्या अवास्तव मागण्या असल्याचे सांगितले.

शिवसेना आणि एकनाथ खडसेंमधले अंतर यामुळे आणखी वाढत गेले. उत्तर महाराष्ट्रात भाजपचे प्रबळ नेते म्हणून एकनाथ खडसे यांची ओळख आहे. पण शिवसेना आणि भाजपची युती असूनही स्थानिक पातळीवर मात्र खडसे आणि सेनेच्या नेत्यांमध्ये उघड वैर आहे.

युतीच्या उमेदवारांना संपूर्ण जिल्ह्यात मदत करू पण खडसेंच्या मुक्ताईनगर मतदारसंघात मदत करणार नाही, अशी उघड भूमिका यापूर्वी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी घेतली आहे.

संजय राऊत आणि उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, FACEBOOK

उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व आणि खडसे एकमेकांचे कायम विरोधक राहिले आहेत. शिवसेनेचे जळगावचे नेते माजी आमदार सुरेश जैन हे एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक समजले जातात.

शिवसेना आणि भाजप दोन्ही हिंदुत्ववादी पक्ष आहेत. एकनाथ खडसे साधारण चार दशकांपासून भाजपमध्ये सक्रीय आहेत. एक लोकनेता आणि भाजपचा बहुजन चेहरा अशी खडसेंची ओळख आहे.

उत्तर महाराष्ट्रात युतीच्या काळातही एकनाथ खडसेंनी शिवसेनेला सहकार्य केले नाही, अशी तिथल्या स्थानिक नेत्यांची भावना आहे.

जळगावमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही शिवसेना आणि एकनाथ खडसे आमने-सामने राहिले आहेत. जिल्हा परिषदेत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि काँग्रेस एकत्र सत्तेत आहेत, तर जळगाव महानगरपालिकेत भाजपची सत्ता असून शिवसेना विरोधकाच्या भूमिकेत आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांनी निवडणूक लढवली. त्यावेळी युती असूनही शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मुक्ताईनगरमध्ये प्रचारासाठी मदत करणार नसल्याची जाहीर भूमिका घेतली होती.

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनीही भाजपला अनेकदा उघड आव्हान दिले आहे. शिवसेनेला मदत करण्याची वेळ येते तेव्हा एकनाथ खडसे फारकत घेतात असा आरोपही त्यांनी केला होता.

खडसेंच्या प्रवेशावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत मतभेद?

एकनाथ खडसे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी जवळचे संबंध आहेत.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार

फोटो स्रोत, PTI

उत्तर महाराष्ट्रातील स्थानिक शिवसेनेच्या आमदारांमध्ये खडसेंच्या प्रवेशावरून अस्वस्थता आहे. यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा नवा संघर्ष उभा राहू शकतो.

"आतापर्यंत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसोबत काम करत होतो. आमच्यात कधीही टोकाचा संघर्ष नव्हता. पण एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तरी संघर्ष अटळ आहे," अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या एका आमदाराने बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

जळगाव पुण्यनगरीचे संपादक विकास भदाणे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "जळगावमध्ये शिवसेना आणि खडसे यांच्यात कायम वाद होतात. 2014 मध्ये शिवसेना आणि भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी खडसेंचा मतदारसंघ मुक्ताईनगरमध्ये प्रचारसभा घेतली होती."

"खडसेंचे विरोधक समजले जाणारे शिवसेनेचे माजी आमदार सुरेश जैन हे पक्षातले ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचेही मत शिवसेना पक्षश्रेष्ठी विचारात घेऊ शकते," असंही विकास भदाणे सांगतात.

एका बाजूला सत्ता टिकवण्याचे आव्हान आणि दुसऱ्या बाजूला स्थानिक नेत्यांची नाराजी वेळीच दूर करण्याचे आव्हान अशा दोन्ही पातळ्यांवर शिवसेनेला संघटनात्मक काम करावे लागणार आहे.

ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले,"शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही प्रादेशिक पक्ष आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष वर्चस्वाच्या लढाईत समोरासमोर येत राहणार. राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक ठिकाणी काहीतरी मिळवताना दिसत आहे.

शरद पवार, उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

"खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याने त्यानिमित्त स्थानिक खदखद बाहेर पडतानाही दिसू शकते. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष सत्ता स्थापनेसाठी एकत्र आलेत. पण हे तीन पक्ष एकत्र येणं राज्यात विविध ठिकाणी स्थानिक राजकारणाला धरून नाही. तेव्हा स्थानिक नाराजी बाहेर येण्याची ही सुरुवात असू शकते."

महाविकास आघाडीत हे दोन्ही पक्ष एकत्र असले तरी पक्षांनी स्वतंत्र वाढीचा मार्ग मोकळा ठेवला आहे. पारनेरमध्ये जेव्हा नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला असला तरी खडसेंच्या बाबतीत असे काही होण्याची शक्यता कमी आहे.

"एकनाथ खडसेंसारखा बडा नेता जर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याने ते शिवसेनेचे ऐकतील असे वाटत नाही." असे मत मृणालिनी नानिवडेकर यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा हा संघटनात्मक निर्णय असला तरी त्याचा फटका महाविकास आघाडीला इतर ठिकाणीही बसू शकतो. सहकारी पक्षाला डावलून असे प्रवेश होऊ लागले तर महाविकास आघाडीसाठी घातक ठरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण यामुळे स्थानिक अस्वस्थता वाढू शकते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)