Kaun Banega Crorepati : 'कौन बनेगा करोडपती'मधल्या आवाजाचा खरा 'नायक' कोण?

अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मधु पाल
    • Role, बीबीसीसाठी, मुंबईहून
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

'नमस्कार, आदाब, सतश्री अकाल, देवीयो और सज्जनों, कौन बनेगा करोडपती मे आपका स्वागत है...'

अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम सुरू केल्यानंतर कानी पडणारं हे पहिलं वाक्य. अमिताभ यांच्या आवाजात हे वाक्य आणखीनच दमदार वाटतं. यासाठी त्यांचं बरंच कौतुकही होताना दिसतं.

पण या शोच्या यशात अमिताभ बच्चन यांच्या कठोर परिश्रमांसह आणखी एका व्यक्तीचा वाटा आहे. ते म्हणजे लेखक आर. डी. तेलंग. शोमध्ये बोलले जाणारे हिंदी आणि उर्दूतील उत्तमोत्तम शब्द त्यांच्याच लेखणीतून येतात.

आर डी तेलंग

फोटो स्रोत, MADHU PAL/ BBC

तेलंग यांनीच 2000 पासून आतापर्यंत कौन बनेगा करोडपती शोची स्क्रिप्ट लिहिली आहे.

इतक्या वर्षात फक्त अमिताभ बच्चनच नव्हे तर तिसऱ्या सिझनवेळी शाहरूख खान यांच्यासाठीही तेलंग यांनीच स्क्रिप्ट लिहिली.

कौन बनेगा करोडपतीमध्ये कसे सहभागी झाले?

आर. डी. तेलंग मूळचे मध्य प्रदेशचे आहेत. पण मुंबई आपली कर्मभूमी बनेल, असा त्यांनी कधीच विचार केला नव्हता.

खरंतर, फक्त एका नातेवाईकाला सोडण्यासाठी तेलंग मुंबईला आले होते, असं त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

ते सांगतात, "मी इथं आलो तेव्हा मला हे शहर खूप आवडलं. या गर्दीत माझं काही होऊ शकेल का, हा प्रश्न मी स्वतःला आणि या शहराला विचारला. हे शहर जनतेचा आवाज ऐकतं, मुंबईने माझंही म्हणणं ऐकलं."

"मुंबईने मला स्वीकारलं. मी एका लहान वृत्तपत्रात पत्रकार म्हणून सुरुवात केली. 1995 दरम्यान इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये शिकत-शिकतच आम्ही नव्या मीडियासोबत पुढे निघालो."

आर डी तेलंग

फोटो स्रोत, MADHU PAL/BBC

"पहिल्यांदा असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं, तेव्हा मी लेखनात काहीतरी करून दाखवू शकतो, असं मला वाटलं. शिवाय, लोक लेखकांचा खूप आदर करतात, हेसुद्धा मी पाहिलं. त्यामुळे लेखच बनायचं असं मी त्यावेळी ठरवलं."

"हळूहळू थोडं-फार लिहिणं सुरू केलं. मूव्हर्स अँड शेकर्सपासून सुरुवात केली. त्यानंतर 2000 साली कौन बनेगा करोडपती शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आता KBC आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करत 20 वर्ष पूर्ण झाली.

एक यशस्वी लेखक बनण्याच्या मागे पत्रकारितेचा खूप मोठा वाटा आहे, असं तेलंग सांगतात.

शब्द आणि आवाजाचा अनोखा संगम

कौन बनेगा करोडपती हा शो देशात हजारो घरांमध्ये पाहिला जातो. तसंच या शोमध्ये काम करणं हा एक सन्मान असल्याचं मानलं जातं.

शो यशस्वी होण्यासाठी यांतील डायलॉग्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शोमधील डायलॉग आणि कविता सहभागी स्पर्धकांचं मनोबल वाढवण्यासाठी तसंच प्रेक्षकांना शोसोबत बांधून ठेवण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात.

अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, RUBINA A. KHAN

तेलंग यांचे शब्द आणि अमिताभ यांचा आवाज यांच्या संगमाला शो लोकप्रिय होण्याचं श्रेय देण्यात येतं.

याबाबत बोलताना तेलंग सांगतात, "आम्ही जे काही लिहितो, ते होस्ट वाचून दाखवतोय, असं वाटता कामा नये, हे काम अत्यंत आव्हानात्मक असतं. हे सगळं होस्ट स्वतः बोलत आहे, हे त्याचे स्वतःचे विचार आहेत, असं वाटण्यासाठी लेखक प्रयत्न करतो."

अमिताभ यांच्यासमोर गेलं की घाम फुटतो

अमिताभ बच्चन यांच्यासोबत 20 वर्षांपासून काम करत असूनसुद्धा तेलंग यांना थोडीफार धाकधूक वाटते.

विशेषतः तेलंग यांनी लिहिलेल्या कविता आणि डायलॉग अमिताभ बच्चन वाचत असतील, तेव्हा यांच्या छातीतली धडधड वाढते. यावर लोकांची प्रतिक्रिया कशी येईल, याची धाकधूक तेलंग यांना असते.

अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, MADHU PAL/BBC

ते सांगतात, "पहिल्या दिवसापासून असं होतं. KBC शिवाय बच्चन यांच्या एका कार्यक्रमासाठी मी कविता लिहिली होती. त्यालासुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. एक प्रकारे आमची एक जोडी बनली आहे. बच्चन यांना काय हवं, हे मला माहिती आहे. शक्य असेल तर भविष्यात बच्चन यांच्यासाठी चित्रपटाचं लेखनही करण्याची माझी इच्छा आहे."

हिंदीने यशस्वी बनवलं

कौन बनेगा करोडपतीमध्ये अनेक अनोख्या आणि रंजक शब्दांचा वापर करण्यात येतो.

कंप्यूटरजी, कंप्यूटर महाशय, कंप्यूटर महोदय, घडियाल बाबू, श्रीमती टिकटिकी, चोटी की कोटी, ताला लगा दे, पंचकोटी महामणी, सुईमुई, मिस चलपडी इत्यादी.

तसंच तेलंग यांनी कार्यक्रमासाठी अनेक लोकप्रिय टॅगलाईन लिहिल्या आहेत.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"कोणताही व्यक्ती लहान नसतो, ज्ञानच तुम्हाला तुमचं हक्क मिळवून देतो. विश्वास असेल तर ठाम रहा. यावर्षी प्रत्येक गोष्टीला ब्रेक लागू शकतो, स्वप्नांना नाही."

आपल्या लेखणीतून ही जादू कशी करतात?

याचं उत्तर देताना तेलंग यांनी सांगितलं, "शब्दांचा विचार केल्यास सुरुवातीच्या काळात मी ज्या नैराश्य आणि दुःखाला सामोरं गेलो, तेच आता माझ्या लेखणीतून बाहेर येत आहे. मी Mटीव्ही म्यूझिक चॅनलसारख्या खासगी चॅनेलसाठी लिहिण्याचा प्रयत्न केला. पण मी हिंदी लिहिणारा असल्यामुळे मला सुरुवातीला कुणीच स्वीकारलं नाही.

"हिंदी आणि इंग्रजी मिसळून लिही, असं मला सांगण्यात आलं. पण मला अशी मिश्र भाषा लिहिणं जमायचं नाही. अनेक ठिकाणी मला नकार मिळाला. इंग्रजीचा वापर करण्याची ही पद्धत बदलावी असं मला वाटलं. मला जे पाहिजे होतं, तेच मी करत राहिलो. आज अनेक कार्यक्रम आदाब आणि नमस्कार यांनीच सुरू होतात."

तांत्रिक गोष्टींचं मानवीकरण

तांत्रिक गोष्टींच्या चित्रविचित्र नावांबाबत बोलताना तेलंग सांगतात, "KBC हा एक प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आहे. होस्ट प्रश्न विचारतो, स्पर्धक उत्तरं देतात. तिथं लेखनाची कुठेच संधी नाही. इथं जे काही बोललं जातं, ते सगळं खरंखुरं आहे.

आर डी तेलंग

फोटो स्रोत, MADHU PAL/BBC

त्यामुळे यामध्ये लेखक काय योगदान देऊ शकतो, याचा मी विचार केला. आम्ही शोला आणखी रंजक बनवण्यासाठी तांत्रिक गोष्टींचं मानवीकरण करण्याबाबत ठरवलं. म्हणजे कंप्यूटरला कंप्यूटरजी, घड्याळाला घडियाल बाबू, किंवा मिस चलपडी वगैरे. याचा चांगला उपयोग झाला."

लेखकांचं दुःख

अनेकवेळा लेखकांना त्यांच्या कामाचं श्रेय मिळत नाही. त्यांनी लिहिलेले डायलॉग अभिनेत्याचे स्वतःचेच डायलॉग आहेत, असं लोकांना वाटतं.

हेच लेखकाचं दुःख असल्याचं तेलंग सांगतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)