अमर सिंह : अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेली 20 वर्षांची मैत्री अचानक का तुटली?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, वंदना
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं शनिवारी (1 ऑगस्ट) सिंगापूरमध्ये निधन झालं. राजकारण आणि बॉलिवूडची झगमगती दुनिया यांची सांगड एकेकाळी अमर सिंह यांनी घातली होती. त्यातही बच्चन कुटुंबीयांशी असलेले त्यांचे संबंध विशेष चर्चेचा विषय होते.
अमर सिंह यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन यांनी मस्तक झुकवलेला ब्लॅक अँड व्हाईट फोटो ट्वीट केला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
एक काळ होता जेव्हा अमर सिंह हे बच्चन कुटुंबीयांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. अमर सिंह आणि अमिताभ बच्चन यांची मैत्री जवळपास 20 वर्षं टिकली.
बोफोर्स प्रकरणातील आरोप आणि नव्वदीच्या दशकात ABCL या कंपनीतील आर्थिक अडचणींमुळे अमिताभ यांचा वाईट काळ सुरू होता. अमिताभ यांची कंपनी जवळपास दिवाळखोरीत गेली होती. बच्चन यांच्या या पडत्या काळातच दोघांमधील मैत्रीला सुरुवात झाली.
ही मैत्री किती घनिष्ट होती, हे अभिषेक बच्चन याच्या लग्न पत्रिकेवरून दिसून आलं. या लग्नपत्रिकेवर अमर सिंह आणि त्यांच्या पत्नीचा बच्चन कुटुंबातील सदस्य म्हणून उल्लेख केला होता.
अमर सिंह हे समाजवादी पक्षाचे नेते होते. सत्तेच्या तसंच बॉलीवूडच्या वर्तुळात त्यांचा चांगला दबदबा होता. कालांतरानं अमिताभ यांची पत्नी जया बच्चन यांनीही समाजवादी पक्षात प्रवेश केला.
अमर सिंह हे किडनीच्या आजारावरील उपचारासाठी पहिल्यांदा सिंगापूरला गेले होते, तेव्हा ते आणि बच्चन दोन महिने सोबत होते. हा त्यांच्या मैत्रीचा सुवर्णकाळ होता.
लंडनमध्ये असताना मी जया बच्चन, अमर सिंह आणि अंबानी परिवाराला एकत्र बघितलं होतं. पण, कालांतरानं या नात्यात दुरावा आला.
'अमिताभ बच्चन खऱ्या आयुष्यातही अभिनय करतात'
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत अमर सिंह यांनी रोखठोक मतं मांडली होती.
माझ्या वाईट काळात बच्चन कुटुंबीय माझ्यासोबत नव्हतं आणि अमिताभ बच्चन खऱ्या आयुष्यातही अभिनय करत असतात, असा आरोप त्यांनी केला होता.
अमर सिंह आणि जया बच्चन यांच्यातही राजकीयदृष्ट्या मतभेद निर्माण झाला आणि त्यांचं नातं संपलं.
अमर सिंह यांची समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. जया बच्चन यांना मात्र पक्षात कायम ठेवण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
या दोन्ही कुटुंबीयांमध्ये व्यावसायिक निर्णयांवरूनही मतभेद निर्माण झाले. यात सहारा बोर्डावरील सदस्यत्व मिळवण्याचा निर्णय महत्त्वाचा होता, असं अमर सिंह यांनी म्हटलं होतं.
या सगळ्या बाबींमुळे मग दोन्ही कुटुंबीयांचं नातं संपुष्टात आलं.
एकदा तर अमर सिंह यांनी अमिताभ बच्चन भित्रे असल्याचं आणि 'अँग्री यंग मॅन' प्रतिमेच्या एकदम विरुद्ध त्यांचं व्यक्तिमत्व असल्याचं म्हटलं होतं.
पण, अमिताभ यांनी नेहमीच याप्रकरणी शांतता बाळगली.
'किंग ऑफ नेटवर्किंग' अशी ओळख
अमर सिंह यांचं बॉलीवुड तसंच अंबानी, सहारा यांसारख्या उद्योग समुहांसोबतही उत्तम नातं होतं. त्यांना 'किंग ऑफ नेटवर्किंग' म्हणून ओळखलं जायचं आणि तीच त्यांची ताकद होती. ग्लॅमर कायम त्यांच्या मागोमाग आलं, किंवा ते कायमच ग्लॅमरच्या पाठीशी धावत राहिले, असंही तुम्ही म्हणू शकता.

फोटो स्रोत, PUNIT KHARE PR
'जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी बॉलीवूडच्या एखाद्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला बोलवायचं असेल, तर अमर सिंह यांना फोन करा,' असंही एकेकाळी म्हटलं जायचंय
अमर सिंह आणि वाद हे जणू समीकरणच बनलं होतं. बॉलिवुडमधल्या अभिनेत्रींसोबत अमर सिंह यांचं नाव जोडलेली एक वादग्रस्त सीडीही समोर आली होती. या सीडीमध्ये अमर सिंह आणि एका अभिनेत्रीमधलं संभाषण काहीसं अश्लाघ्य होतं.
त्यानंतर मात्र त्यांनी स्वत:ला बॉलीवुडपासून दूर केलं. मात्र जया प्रदा आणि इतर जण त्यांच्यासोबत दिसले.
गेल्या काही वर्षांत त्यांची तब्येत बरी नव्हती आणि ते सार्वजनिक आयुष्यातून बाजूला गेले.

फोटो स्रोत, PTI
अमिताभ यांच्याविषयीही त्यांनी मवाळ भूमिका घेतली आणि अमिताभ यांच्याबद्दल केलेल्या विधानांमध्ये मी अतिशयोक्ती केली, असं त्यांनी म्हटलं.
अमिताभ बच्चन कधीच माझ्या वडिलांचा स्मृतीदिन विसरत नाही, असं एका व्हीडिओत अमर सिंह यांनी म्हटलं होतं. त्यांना बरं नसताना त्यांनी सिंगापूरमधून हा व्हीडिओ पोस्ट केला होता.
एकेकाळी बॉलीवूड आणि सत्तेच्या वर्तुळात 'नेटवर्क किंग' म्हणून ओळख असलेल्या या माणसाची शेवटची वर्षं भकास गेली.
एकेकाळी ग्लॅमर आणि राजकारण यांना जोडणारा दुवा म्हणून अमरसिंह यांना ओळखलं जायचं...ते चांगल्या पद्धतीनं की वाईट हे मात्र माहीत नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























