कोरोना व्हायरस चाचणी: प्रेग्नन्सी टेस्टप्रमाणे तातडीने होणारी कोरोनाची नवीन चाचणी 'गेम चेंजर' ठरेल?

    • Author, सौतिक बिस्वास आणि कृतिका पाथी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

कोरोनाच्या चाचण्यांचं प्रमाण हा देशात सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय आहे. चाचण्या वेगानं आणि अधिक प्रमाणात कशा होतील यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.

चाचण्यांचा वेग वाढविण्याच्या दृष्टीनं शास्त्रज्ञांच्या एका टीमनं महत्त्वाची आणि स्वस्तात होऊ शकणारी चाचणी विकसित केली आहे. प्रेग्नन्सी टेस्टप्रमाणेच या चाचणीचा परिणामही तात्काळ पाहता येईल.

क्रिस्पर नावानं ओळखल्या जाणाऱ्या जनुकीय एडिटिंग तंत्रज्ञानावर ही नवीन कोरोना चाचणी आधारित आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या गुप्तहेर कथांच्या नायकाचंच नाव चाचणीच्या किटला देण्यात आलं आहे- 'फेलुदा.'

'फेलुदा'मुळे कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही हे तासाभरात कळू शकेल आणि त्यासाठी येणारा खर्च पाचशे रुपयांच्याच आसपास असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

टाटा कंपनीकडून फेलुदाची निर्मिती केली जात आहे. कागदाचा वापर करून केली जाणारी कोव्हिड-19 ची जगातील पहिली टेस्ट असेल.

"ही अतिशय सोपी, सुटसुटीत, विश्वासार्ह आणि रास्त दरात होणारी चाचणी आहे," असं भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रोफेसर के विजय राघवन यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं.

दिल्लीमधील इन्स्टिट्यूट ऑफ जेनोमिक्स आणि इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (IGIB) इथं 'फेलुदा' टेस्टवर काम सुरू आहे. काही खासगी लॅबमध्येही या टेस्ट केल्या जात आहेत. आतापर्यंत दोन हजार रुग्णांवर प्रायोगिक तत्त्वावर ही चाचणी घेण्यात आली आहे. यापैकी काही जणांची कोरोना चाचणी आधीच पॉझिटिव्ह आली होती.

या नवीन चाचणीची संवेदनशीलता 96 टक्के आणि विशिष्टता 98 टक्के असल्याचं आढळून आलं आहे. चाचणीची अचूकता या दोन प्रमाणांवर आधारित आहे. अत्यंत संवेदनशील असलेली चाचणी ज्यांना संसर्ग झाला आहे, याचं निदान होतं. विशिष्टतेच्या चाचणीमध्ये कोणाला कोरोना झाला नाहीये, हे कळतं.

याचाच अर्थ पहिल्या प्रमाणामुळे (संवेदनशीलता) 'फॉल्स निगेटिव्ह' निष्कर्ष येत नाही, तर दुसऱ्या प्रमाणामुळे (विशिष्टता) 'फॉल्स पॉझिटिव्ह' निष्कर्ष येत नाहीत. या चाचणीच्या व्यावसायिक वापराला ड्रग नियंत्रकांकडून मान्यता मिळाली आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या साठ लाखांहून अधिक झाली आहे. रुग्णसंख्येचा विचार करता भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. कोव्हिड-19 मुळे एक लाखाहून अधिक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.

सुरुवातीला चाचण्यांचा वेग कमी असला तरी आता देशभरात 1200 हून जास्त लॅबमधून दिवसाला एक लाखांहून अधिक चाचण्या होत आहे. या चाचण्या दोन प्रकारच्या आहेत.

यापैकी पहिल्या चाचणी ही पॉलिमरेज चेन अॅक्शन किंवा पीसीआर स्वॅब टेस्ट आहे. यामध्ये केमिकल्सचा वापर करून प्रयोगशाळेत विषाणुंमधील जेनेटिक मटेरियलचा अभ्यास केला जातो. या चाचणीचा निष्कर्ष यायला वेळ लागतो.

पॉझिटिव्ह आणि फॉल्स निगेटिव्ह निष्कर्ष येण्याचं प्रमाण तुलनेनं कमी आहे.

अँटीजेन टेस्ट ही पीसीआरच्या तुलनेत स्वस्त आहे. यामध्ये बोटावर टोचून रक्ताचा नमुना घेतला जातो आणि यापूर्वी झालेल्या संसर्गाची लक्षणं तपासली जातात. यामध्ये संसर्ग झालेल्यांचं म्हणजेच पॉझिटिव्ह निष्कर्षांचं प्रमाण तुलनेनं अचूक आहे. पण या चाचणीत 'फॉल्स निगेटिव्ह' निष्कर्षांचं प्रमाण पीसीआर टेस्टच्या तुलनेत अधिक आहे.

भारतात चाचण्यांचं प्रमाण वाढलं असलं, तरी ते अजूनही पुरेसं नसल्याचं मत जागतिक आरोग्य आणि आरोग्य धोरणांसंबंधी संशोधन करणारे डॉ. अनंत भान यांनी व्यक्त केलं.

"अजूनही लोकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे आणि टेस्ट किटची उपलब्धताही पुरेशी नाहीये," असं डॉ. भान यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं.

'फेलुदा' चाचणी ही अँटीजेन चाचणीला पर्याय ठरू शकते, असं डॉ. भान यांना वाटतं. कारण ती तुलनेनं स्वस्त आहे आणि अधिक अचूक आहे.

"नवीन चाचणी पीसीआरप्रमाणेच विश्वासार्ह आहे आणि कमी वेळेत होणारी आहे. अत्याधुनिक यंत्रणा नसलेल्या छोट्या लॅबमध्येसुद्धा ही चाचणी करता येईल," असं IGIB चे संचालक डॉ. अनुराग अगरवाल यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं.

'फेलुदा' चाचणीसाठीचं सँपल कलेक्शन हे पीसीआर चाचणीप्रमाणेच केलं जाईल. म्हणजेच या चाचणीसाठीही नाकातून स्वॅब घेतला जाईल. भारतात लाळेचा नमुना घेऊन कोव्हिड-19 ची चाचणी करायला अजूनही परवानगी नाहीये.

पीसीआर टेस्टमध्ये सँपल हे मान्यताप्राप्त प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात येते. तिथे वेगवेगळ्या प्रक्रिया होऊन विषाणूंचं प्रमाण किती आहे, हे पाहिलं जातं.

नवीन पद्धतीच्या फेलुदा चाचणीमध्ये 'क्रिस्पर'चा (Crispr) वापर केला जातो. Clustered Regularly Interspaced Short Palindromic Repeats चं हे लघुरूप आहे.

संशोधकांच्या मते जनुकीय एडिटिंग हे वर्ड फाइलमध्ये ज्याप्रमाणे काम होतं, त्याचप्रमाणे केलं जातं. म्हणजे आपण एखादा चुकीचा शब्द दुरुस्त करण्यासाठी तिथं कर्सर नेतो आणि मग चुकलेलं अक्षर काढून तिथे योग्य ते अक्षर टाइप करतो. जनुकीय एडिटिंगचं तंत्रंही काहीसं असंच आहे. याचा वापर हा मुख्यतः संसर्ग रोखण्यासाठी आणि सिकल सेलसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो.

जेव्हा 'फेलुदा'सारख्या संसर्गाचं निदान करण्याच्या चाचणीमध्ये क्रिस्पर तंत्रज्ञानाचा वापर होतो, तेव्हा हे तंत्रज्ञान नोव्हल कोरोना व्हायरसचं वहन करणाऱ्या जनुकांची ओळख पटवतो आणि त्याचा निष्कर्ष कागदावर उमटतो.

कागदावर जर दोन निळ्या रेषा उमटल्या तर टेस्ट पॉझिटिव्ह असते, तर एकच निळी रेषा आली तर टेस्ट निगेटिव्ह असते.

"चाचण्यांचं मर्यादित असलेलं प्रमाण वाढविण्यासाठी आपण शक्य ते प्रयत्न करायला हवेत. 'फेलुदा' हे त्या दिशेनं टाकलेलं महत्त्वाचं पाऊल आहे, असं डॉ. स्टीफन किसलेर यांनी म्हटलं, ते हार्वड मेडिकल स्कूलमध्ये रिसर्च फेलो आहेत.

टेस्टिंगच्या टप्प्यांचा विचार करता क्रिस्परवर आधारित चाचणी ही 'तिसरी लाट' असेल. पहिली लाट ही वेळखाऊ आणि अधिक मनुष्यबळ लागणारी पीसीआर चाचणी होती, तर दुसरा टप्पा हा अँटीजेन टेस्ट असल्याचं मत हार्वर्ड ग्लोबल हेल्थ इन्स्टिट्यूटच्या डॉ. थॉमस त्साई यांनी व्यक्त केलं.

"चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यादृष्टिनं 'फेलुदा' ही खूप महत्त्वाची पायरी आहे," असं मत हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये रिसर्च फेलो असलेल्या डॉ. स्टीफन किसलर यांनी व्यक्त केलं आहे.

अमेरिका आणि युकेमधील अनेक कंपन्या आणि संशोधन संस्था अशा पेपर स्ट्रीपचं उत्पादन घेत आहेत. त्यांपैकीच एक शेरलॉक बायोसायन्सनं विकसित केलेली पेपर स्ट्रीप आहे. युएस फूड आणि ड्रग अॅडमिनिस्ट्रेशननं (FDA) आणीबाणीच्या काळात या पेपर स्ट्रीपच्या वापराला मान्यता दिली आहे. "कोरोनासाठी स्ट्रीपचा वापर करून होणारी चाचणी ही अत्यंत योग्य आहे. कारण तुम्ही ती घरच्या घरी करू शकता," असं मत डॉ. त्साई यांनी व्यक्त केलं. अर्थात, या चाचणीवर काही बायोलॉजिकल आणि तांत्रिक मर्यादाही आहेत. लोकांनी घरीच RNA अॅम्पिलिफाय करावा, अशी अपेक्षा तुम्ही करू शकत नाही, असंही त्साई यांनी म्हटलं.फेलुदा ही चाचणी इथंच वेगळी ठरते. IGBMR मधील मॉलिक्युलर शास्त्रज्ञ आणि 'फेलुदा' चाचणी विकसित करणाऱ्या टीमचा भाग असलेले डॉ. देबोज्योती चक्रवर्ती यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "आम्ही प्रोटोटाइप टेस्टवर काम करत आहोत, ज्यामध्ये तुम्ही पीसीआरचा वापर करून घरीच RNA अॅम्पिलिफाय करू शकता."

"आम्ही मशीन आणि जास्तीत जास्त मनुष्यबळावर अवलंबून नसलेली चाचणी विकसित करायचा प्रयत्न करत आहोत. ही चाचणी सोपी, परवडणारी असेल," असं डॉ. चक्रवर्ती यांनी म्हटलं.

"ही टेस्ट किती महत्त्वाची ठरू शकते, हे दाखवून देण्याची भारताकडे संधी आहे. कारण भारताची लोकसंख्या अधिक आहे आणि जेव्हा चाचण्या वाढवण्याची गरज आहे, तेव्हाच ही चाचणी विकसित करण्यात आली आहे," असं डॉ. किस्लर यांनी म्हटलं आहे.

"जर ही चाचणी परिणामकारक ठरली, तर जगातील अनेक देशांसाठी फायद्याची ठरू शकते," असंही त्यांनी म्हटलं.

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लस ही महत्त्वाची आहेच, पण अचूक आणि विश्वासार्ह चाचण्या होणंही सगळं काही सुरळीत करण्यासाठी गरजेचं असल्याचं डॉ. किस्लर यांना वाटतं. या संसर्गामुळे भविष्यात अशाप्रकारच्या चाचण्या करणं हे रोज दात घासणं किंवा नाश्ता करण्याइतकं नॉर्मल असेल, असं त्यांचं मत आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)