नरेंद्र मोदींसाठीचं बोईंग 777 विमान भारतात दाखल, #5मोठ्या बातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठीचं बोईंग 777 विमान भारतात दाखल

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खरेदी केलेले 'एअर इंडिया वन' हे विमान अमेरिकेहून भारतात दाखल झालं आहे. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

अमेरिकेतल्या बोईंग या कंपनीनं हे विमान बनवलं आहे. भारतानं अशी दोन विमानं खरेदी केली असून दुसरे विमान लवकरच भारतात आणले जाणार आहे. भारताचे राष्ट्रपती. उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान या तीन व्यक्तींसाठी ही विमानं असणार आहेत.

दोन्ही विमानांची खरेदी आणि त्यातील सुधारणा यासाठी भारताला एकूण 8,400 कोटी रुपये खर्च आला आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज असलेल्या या विमानात मिसाईल डिफेन्स सिस्टिम आहे, यामुळे क्षेपणास्त्र हल्ल्याचा धोका ओळखण्यास मदत होते.

2. पार्थ आतला आवाज ऐकतात, त्यांचा प्रवास 'सत्यमेव जयते'च्या दिशने : चंद्रकांत पाटील

पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणावर केलेल्या ट्विटमुळे ते पुन्हा चर्चेत आले.

राज्य सरकारने याप्रश्नी लक्ष घातलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. पार्थ यांच्या याच भूमिकेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पार्थ पवार आतल्या आवाजाला जास्त महत्त्व देतात, असं वक्तव्य केलं. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

पाटील म्हणाले, "पार्थ त्यांच्यातल्या आतल्या आवाजाला जास्त महत्त्व देतात. त्यांचा प्रवास 'सत्यमेव जयते'च्या दिशने सुरु आहे. मात्र याचवेळी त्यांच्या भाजप प्रवेशाचा कोणताही प्रस्ताव अजून आला नाही".

मराठा आरक्षणावरून चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

ते म्हणाले, "मराठा आरक्षणाचा अध्यादेश केंद्र सरकार काढू शकत नाही. आरक्षण हा राज्याच्या अखत्यारितील विषय आहे. इतकी वर्ष राजकारणात घालवलेल्या पवारांना हे माहिती नाही की काय?"

3. महाराष्ट्रात बलात्काराचे सर्वाधिक गुन्हे

गेल्या वर्षी देशभरात 286 महिलांची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. त्यापैकी सर्वाधिक 47 महिला महाराष्ट्रातील होत्या. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी) बुधवारी जारी केलेल्या अहवालानुसार गेल्या वर्षी महाराष्ट्रात अशा प्रकारचे सर्वाधिक गुन्हे नोंद केले गेले. त्याखालोखाल 34 गुन्हे उत्तर प्रदेशात, तर 7 गुन्हे राजस्थानात नोंदवण्यात आले.

महाराष्ट्रात 2018च्या तुलनेत गेल्या वर्षी 30 गुन्हे वाढले, तर उत्तर प्रदेशात 7 गुन्हे कमी झाले.

एनसीआरबीच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी सर्वाधिक 59 हजार 853 गुन्हे (महिलांविरोधी) उत्तर प्रदेशात नोंदवण्यात आले. त्याखालोखाल राजस्थानात 41 हजार 550, तर महाराष्ट्रात 37 हजार 144 गुन्हे नोंद केले गेले.

बलात्कार-हत्येपाठोपाठ महिलांना विविध कारणांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्यातही महाराष्ट्र आघाडीवर आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात 808, उत्तर प्रदेशात 359 आणि राजस्थानात 186 महिलांना आत्महत्या करण्यासाठी भाग पाडण्यात आले. 2018 मध्ये महाराष्ट्रात 900 महिला-तरुणींनी दबावाला बळी पडून आत्महत्या केल्या होत्या.

4. कर्जमाफीनंतर महाराष्ट्रात 1568 शेतकरी आत्महत्या

महाराष्ट्रात यंदा 1568 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.

सर्वाधिक आत्महत्या 201 यवतमाळ जिल्ह्यात झाल्या असून त्याखालोखाल अमरावती 184, बुलडाणा 165 आत्महत्या झाल्या आहेत.

जानेवारी ते ऑगस्ट या काळात आत्महत्या केलेल्या 988 कुटुंबीयांना मदत मिळालेली नाही, त्यातील 504 प्रकरणांची चौकशीच झाली नसल्याचं बातमीत म्हटलं आहे.

5. अनुराग कश्यपची 7 तास चौकशी

लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाप्रकरणी दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची वर्सोवा पोलिसांनी 7 तास चौकशी केली. वर्सोवा पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते. सामनानं ही बातमी दिली आहे.

अभिनेत्री पायल घोषनं अनुराग कश्यप यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर वर्सोवा पोलिसांनी कश्यप यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते.

त्यानुसार ते गुरुवारी (01 ऑक्टोबर) चौकशीसाठी हजर राहिले. सात तास चौकशीनंतर संध्याकाळी 6च्या सुमारास ते तिथून निघून गेले.

हे वाचलंतच का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)