मराठा आरक्षण: उदयनराजे म्हणतात, 'आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा' #5मोठ्याबातम्या

उदयनराजे भोसले

फोटो स्रोत, facebook

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. मराठा आरक्षण देता येत नसेल, तर सगळेच आरक्षण रद्द करा - उदयनराजे

"मराठा समाजातील विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले तरी त्यांना अॅडमिशन मिळत नाही. उलट कमी गुण मिळालेल्यांना अॅडमिशन मिळतं. प्रत्येक विद्यार्थ्याला बुद्धी दिलेली आहे. त्यामुळे मराठा आरक्षण देता येत नसेल, तर सगळेच आरक्षण रद्द करा आणि मेरिटवर निवड करा, हे मी अनेकदा सांगितलं आहे," असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.

मराठा आरक्षण प्रश्नावर पुण्यात 3 ऑक्टोबर रोजी विचारमंथन बैठक होणार आहे. या बैठकीस निमंत्रण देण्यासाठी आमदार विनायक मेटे यांच्यासह इतर नेत्यांनी साताऱ्यातील जलमंदिर पॅलेसमध्ये उदयनराजे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी आरक्षण प्रश्नावर चर्चा केली.

"मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर समाजात प्रचंड संताप आहे. प्रत्येकाला ज्या पद्धतीने आरक्षण मिळालं. त्याच पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं. मराठा समाजाची आर्थिक स्थिती बिकट आहे. विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनसुद्धा अॅडमिशन मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा. मेरिटवर सर्वांची निवड करा, असं उदयनराजे म्हणाले. ही बातमी ई-सकाळने दिली आहे.

कोरोना
लाईन

2. पश्चिम बंगालमध्ये चित्रपटगृह उघडण्यास परवानगी

कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे बंद असलेले चित्रपटगृह तसंच ओपन थिएटर सुरू करण्याची परवानगी पश्चिम बंगालमध्ये देण्यात आली आहे.

1 ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृह कमी लोकांना प्रवेश देऊन अटी व शर्थींसह सुरू करता येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली.

ममता बॅनर्जी

फोटो स्रोत, Pti

कोरोना व्हायरस लॉकडाऊननंतर देशभरातील चित्रपटगृह आणि खुले थिएटर बंद होते. अनलॉकच्या विविध टप्प्यांनंतरही ही ठिकाणं सुरू झालेली नाहीत. राज्यांनी परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घ्यावा, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली होती. त्यात पश्चिम बंगालने बाजी मारली असून चित्रपटगृह आणि ओपन थिएटर सुरू करण्याचा निर्णय सर्वप्रथम याच राज्यात घेण्यात आला आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"नॉर्मल आयुष्याकडे परतण्यासाठी जत्रा, नाटकं, सिनेमा, संगीत तसंच जादुच्या प्रयोगांसारखे कार्यक्रम 1 ऑक्टोबरपासून सुरू करता येतील. यामध्ये 50 लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी मिळेल. यादरम्यान, सोशल डिस्टन्सिंग, मास्क व इतर खबरदारी घेणं बंधनकारक असेल," असं ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करून सांगितलं. टाईम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

3. महाराष्ट्राला सर्वाधित आरोग्य साक्षर राज्य बनवणार - उद्धव ठाकरे

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राज्यात नाविन्यपूर्ण मार्गाचा वापर करण्यात येत आहे. या मदतीने राज्याला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षर राज्य बनवणार, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती विभागातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते.

सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांच्या टास्क फोर्समधील डॉक्टरांसोबत संवाद साधून वैद्यकीय उपचार आणि इतर उपायांबाबत चर्चा करावी. पालक सचिव यांनीदेखील पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासन यांना संपर्कात राहावे, असं मुख्यमंत्री म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

4. बॉलिवूडमधील ड्रग्ज घेणाऱ्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही - आठवले

बॉलिवूडमधील कलाकार प्रेक्षकांचे आदर्श असतात. त्यामुळे अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या अभिनेत्यांना निर्मात्यांनी काम देऊ नये. ड्रग्ज घेणाऱ्या अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं.

रामदास आठवले

अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या कलाकारांच्या चित्रपटाचं चित्रीकरणही बंद पाडण्यात येईल, असा इशारा देत सुशांतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी, अनुराग कश्यपला अटक करावी, अशी मागणी आठवले यांनी केली. ही बातमी दैनिक लोकमतने दिली.

दरम्यान, बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनच्या चौकशीची मागणी संसदेत करणारे खासदार रवि किशन यांनी आपल्याला धमकी मिळत असल्याचं सांगितलं आहे. मी कोणत्याही धमक्यांना भीत नाही, देशासाठी गोळ्या झेलण्यासही मी तयार आहे, असं रवि किशन म्हणाले.

5. सुशांत सिंह मुद्द्यामागे केवळ निवडणूक - सचिन सावंत

देशातील सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील फोकस वळवून सुशांतसिंह प्रकरणाला सर्वाधिक महत्त्व दिलं जात आहे. यामागे बिहारमधील विधानसभा निवडणुकीतील राजकारण कारणीभूत आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिव सावंत यांनी शनिवारी केली.

सुशांतसिंह प्रकरण माध्यमांमध्ये नेहमी चर्चेत राहील याची तजवीज केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी केली. ड्रग आणि बॉलिवूड यांच्यातील कथित सुरस संबंधाच्या माहितीचा रतीब लोकांना पुरवण्यात येत आहे, असं सावंत म्हणाले. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)