40 वर्षांपूर्वी भारतातून चोरीला गेलेल्या राम-सीतेच्या मूर्ती इंग्लंडमध्ये कशा सापडल्या?

फोटो स्रोत, MET POLICE
- Author, योगिता लिमये
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
दक्षिण भारतातील एका मंदिरातून 40 वर्षांपूर्वी चोरीला गेलेल्या राम, सीता आणि लक्ष्मणाच्या यांच्यासह इतर तांब्याच्या मूर्ती इंग्लंडमध्ये सापडल्या आहेत.
या मूर्ती भारत सरकारला गेल्या आठवड्यात परत करण्यात आल्या.
40 वर्षांपूर्वी चोरीला गेलेल्या मूर्ती मिळणं ही मोठी गोष्ट आहे. या मूर्तींचा शोध कसा लागला, मूर्ती भारतात कशा परतल्या, याची माहिती बीबीसी प्रतिनिधी योगिता लिमये यांनी मिळवली आहे.
15 व्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधलेल्या मंदिरातील या मूर्ती आहेत. तामिळनाडूतील आनंदमंगलम गावात हे मंदीर आहे. इथूनच 1978 मध्ये या मूर्ती चोरीला गेल्या होत्या.
विजयनगर साम्राज्य भारतीय इतिहासात अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. त्या काळात विजयनगर हे मोठं व्यापारी केंद्र होतं.
चोरीला गेलेल्या मूर्ती परत मिळवण्यासाठी इतिहासकार, कलाकार, संशोधक तसंच पोलीस आणि युकेमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांचं योगदान महत्त्वाचं राहिलं.
चार वर्षांपूर्वी, या मूर्तींपैकी एक मूर्ती ब्रिटिश अँटीक डिलर्स असोसिएशनच्या वेबसाईटव आढळून आली. इंडिया प्राईड प्रोजेक्टमधील एका सदस्याने हा फोटो पाहताच त्याला याची ओळख पटली. तिथूनच या मूर्ती भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
इंडिया प्राईड प्रोजेक्टचे सहसंस्थापक एस. विजयकुमार सांगतात, "ही मूर्ती मुख्यतः विजयनगर साम्राज्यात वापरात आलेल्या तांब्याच्या धातूची असल्याचं आम्हाला लक्षात आलं. पण दोन्ही मूर्तींची बनावट एकसारखी असल्याने ही मूर्ती रामाची आहे की लक्ष्मणाची हे आम्हाला कळत नव्हतं."

फोटो स्रोत, HIGH COMMISSIONER OF INDIA, UK
दक्षिण भारतात अशा काही मंदिरांतील मूर्तींचे सेट गायब असल्याची माहिती या विजयकुमार यांच्या टीमला होती. त्यामध्ये लक्ष्मणाची मूर्तीही गायब होती. त्यांनी सदर फोटो त्या मूर्तींशी जुळवून पाहिले.
या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणच्या मंदिरांना त्यांनी भेट दिली. तिथं जाऊन अशा पद्धतीच्या मूर्तींची पाहणी केली. पण त्यांना फोटोतील मूर्तींसारख्या मूर्ती कुठेच आढळून आल्या नाहीत.
गेल्या वर्षी प्राईड इंडिया ग्रुपचा एक सदस्य लंडनमध्ये होता. तिथं त्यांनी पुरातन आणि दुर्मीळ वस्तूंच्या प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांना त्याच प्रकारचा दुसरा एक फोटो दिसला. या फोटोतील मूर्तीही ब्रांझचीच होती. पण या मूर्तीचं मुकूट थोडंसं वेगळं होतं.
तेव्हा त्यांना हे सगळी गोष्ट लक्षात आली. हे म्हणजे मूर्तींचा पूर्ण सेट चोरीला गेलेल्या प्रकरण होतं, हे त्यांना समजलं.
त्यांनी पुन्हा आपलं संशोधन सुरू केलं. हा शोद त्यांना पुदूच्चेरीच्या फ्रेंच इन्स्टीट्यूट या पुरातन वस्तू संग्रहालयापर्यंत घेऊन गेला. या संग्रहालयात त्यांना एक महत्त्वाचा दुवा सापडला.
या संग्रहालयात 15 जून 1958 रोजी काढलेला एक फोटो होता.
त्या फोटोत आनंदमंगलम गावातील श्री राजगोपाल स्वामी मंदिरातील मूर्तींचा पूर्ण सेट दिसत होता.
हे सगळे पुरावे घेऊन प्राईड इंडिया टीमने युकेतील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाशी संपर्क साधला.

फोटो स्रोत, NGA
पुरेसे पुरावे गोळा करण्याचं काम सुरू होतं. दरम्यान, या मूर्ती विकल्या जाऊ नयेत, यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले. सप्टेंबर 2019 मध्ये युकेतील भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ही माहिती स्थानिक पोलिसांना (मेट्रोपोलिटन पोलीस) दिली.
या मूर्तींची जाहिरात करणाऱ्या डीलरला पोलिसांनी संपर्क साधला. सदर व्यक्ती एक भला माणूस होता. त्याच्या नावावर कोणताच गुन्हा दाखल नाही, याची पोलिसांनी खात्री पटवली.
भारतात तामिळनाडू पोलिसांच्या मूर्ती विभागातील गुप्तहेरांचं एक पथक गावात पाठवण्यात आलं.
श्री राजगोपाल स्वामी मंदिरातील मूर्ती खरंच चोरीला गेल्या होत्या, याबाबत खात्रीशीर माहिती स्थानिकांकडून मिळवण्यात आली.
त्यासोबतच ठोस पुराव्यांसाठी पथकाने स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांच्या नोंदी तपासल्या.
यावर्षी जानेवारी महिन्यात पोलिसांना ज्या गोष्टीचा शोध होता, ती गोष्ट सापडली.
या मूर्ती चोरीला गेल्याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेली होती. दिनांक 24 नोव्हेंबर 1978 रोजी मध्यरात्री या मूर्ती मंदिरातून चोरीला गेल्याची ही फिर्याद होती.
याबाबतच्या काही नोंदी पोलिसांना न्यायालयातही सापडल्या. मूर्ती चोरी प्रकरणी न्यायालयाने 1988 मध्ये तिघांना शिक्षा दिल्याचं नोंदीत आढळून आलं.
सदर चोरट्यांना नऊ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. गुन्ह्याची कबुली देताना या मूर्ती अज्ञात व्यक्तींना विकल्याचं मुख्य आरोपीने सांगितलं होतं, अशी माहिती तामिळनाडू पोलिसांतील सूत्रांनी बीबीसीला दिली.
पण या मूर्तींची तस्करी होऊन भारतातून त्या इंग्लंडल्या कशा पोहोचल्या हे अद्याप गूढच आहे.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

मेट्रोपोलिटन पोलिसांच्या माहितीनुसार, मूर्ती भारतातून चोरून आणल्याची खात्री पटल्यानंतर डिलरला त्या भारताला परत करण्याचं मान्य केलं. विशेष बाब म्हणजे, इंडिया प्राईड ग्रुपला आढळलेल्या फोटोतील मूर्तींचा अख्खा सेटच त्याच्याकडे होता. त्या सेटमध्ये तीन मूर्ती होत्या.
कोरोना व्हाररस आणि लॉकडाऊनमुळे मूर्तींचं हस्तांतरण लांबलं होतं. पण अखेरीस 15 सप्टेंबरला या मूर्ती भारताच्या ताब्यात देण्यात आल्या.
या मूर्ती लवकरच भारतात पाठवण्यात येतील, असं युकेतील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने कळवलं आहे. अशा प्रकारे 40 वर्षांपूर्वी चोरीला गेलेल्या या तीन मूर्ती परत मिळवण्यात भारताला यश आलं.
पण अद्याप हा सेट अपूर्ण आहे. या मूर्तींच्या सेटमध्ये एक हनुमानाची मूर्तीही होती. तीसुद्धा चोरीला गेली होती. ही मूर्ती सिंगापूरच्या एका संग्रहालयात असल्याचा संशय भारतीय अधिकाऱ्यांना आहे.
चोरीला गेलेल्या या मूर्तींची विकल्यास त्यांना लाखो डॉलरची किंमत मिळू शकते.
विजयकुमार सांगतात, "माझ्यासाठी या मूर्ती अनमोल आहेत. ते कलाकुसरीच्या वस्तू म्हणून बनवण्यात आलेल्या नाहीत. त्यांची निर्मिती पूजेसाठी झाली आहे. ही मंदिरं अजूनही अस्त्वित्वात आहेत, ही बाब संग्राहकांनी समजून घ्यावी. आमच्या देवी-देवतांच्या मूर्तींना असं शो-पीस म्हणून ठेवलं जातं. हे पाहून प्रचंड दुःख होतं."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )
























