'भारतीय मुस्लीम रेजिमेंटने पाकिस्तानविरुद्ध लढण्यास नकार दिला' या व्हायरल मेसेजमागचे सत्य काय?

    • Author, मोहम्मद शाहीद
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

भारतीय लष्करातील मुस्लीम रेजिमेंटने पाकिस्तानविरुद्ध लढण्यास नकार दिला असे मेसेज फिरत आहेत. काय आहे सत्य?

सैनिकांची संख्या या निकषाच्या मुद्यावर भारतीय लष्कराचा जगात दुसरा क्रमांक लागतो. भारतीय लष्करात बारा लाखाहून अधिक सैनिक कार्यरत आहेत आणि दहा लाख राखीव दलासाठी काम करतात.

भारतीय लष्करात आर्म्स अँड सर्व्हिसेसच्या व्यतिरिक्त शेकडो रेजिमेंट्स आहेत. या रेजिमेंट्सपैकी इन्फॅन्ट्री रेजिमेंट्सना आपण प्रजासत्ताक दिनी राजपथावर पाहतो.

हत्यारबंद पायदळासाठी इन्फॅन्ट्री हा शब्द वापरला जातो. भारतीय लष्कराच्या इन्फॅन्ट्रीत शीख, गढवाल, कुमाऊँ, जाट, महार, गोरखा, राजपूतसह ... रेजिमेंट आहेत.

या सगळ्याची आता चर्चा होण्याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर एका रेजिमेंटची जोरदार चर्चा सुरू आहे.

प्रकरण नक्की काय आहे?

फेसबुक आणि ट्वीटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक मेसेज सातत्याने फिरतो आहे. भारतीय सैन्यातील मुस्लीम रेजिमेंटने 1965च्या युद्धात पाकिस्तानशी युद्ध करायला नकार दिला होता. असा हा मेसेज आहे.

काही युझर्सनी असं लिहिलं आहे की मुस्लीम सैनिकांकडून शस्त्रं काढून घेण्यात आली आणि त्यानंतर ही रेजिमेंटच रद्द करण्यात आली.

खरं काय आहे?

मेजर जनरल (निवृत्त) शशी अस्थाना यांनी मुस्लीम रेजिमेंटचा दावा फेटाळून लावताना सांगितलं की भारतीय लष्करात अशी रेजिमेंटच नव्हती.

जात आणि वंशाच्या आधारे रेजिमेंट ब्रिटिश काळात तयार करण्यात आल्या होत्या. तत्कालीन राज्यांचं सैन्य म्हणून कार्यरत होत्या. उदाहरणार्थ जम्मू काश्मीर लाइड इन्फॅन्ट्री रेजिमेंट. जम्मू काश्मीर राज्यासाठी काम करणारी रेजिमेंट होती.

अस्थाना पुढे सांगतात की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रेजिमेंटची नावं तशीच ठेवण्यात आली. पण याचा अर्थ भारतीय लष्कर जातीवादाला, वंशवादाला प्रोत्साहन देतं. इतिहासाचा वारसा म्हणून ही नावं कायम ठेवण्यात आली आहेत.

रेजिमेंटचा स्वत:चा असा इतिहास आहे. मद्रास रेजिमेंटला दोनशेहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. कुमाऊँ रेजिमेंटचे सैनिक दोन जागतिक महायुद्धांमध्ये सहभागी झाले होते.

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन सांगतात की, मुस्लीम रेजिमेंटसंदर्भातील मेसेज हा प्रपोगंडाचा भाग आहे. भारतीय लष्करात गेल्या दोनशे वर्षात अशी रेजिमेंटच झालेली नाही.

ब्रिटिश इंडियन आर्मीत शीख, पंजाब, गढवाल यासारख्या रेजिमेंट आहेत. बलोच आणि फ्रंटियर फोर्स रेजिमेंट आहेत. फाळणीनंतर या दोन्ही रेजिमेंट पाकिस्तानला रवाना झाल्या. पंजाब रेजिमेंट भारतातही आहे आणि पाकिस्तानातही.

सैन्यात मुसलमान?

भारतीय लष्करात मुस्लीमधर्मीय सैनिकांची संख्या किती यासंदर्भात अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. 2014 मध्ये द डिप्लोमॅट मासिकाने एका अहवालाच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय लष्करात मुस्लीमधर्मीय सैनिकांचं प्रमाण तीन टक्के आहे. जम्मू काश्मीर अँड लाइट इन्फॅन्ट्रीत 50 टक्क्यांहून अधिक मुसलमान आहेत.

मेजर जनरल (निवृत्त) अस्थाना सांगतात की लष्करात जाती-धर्माच्या आधारावर निवड होत नाही. तुमचा फिटनेस महत्त्वाचा मानला जातो.

लष्करात कोणतंही आरक्षण नाही. तुमची भरती उत्तर प्रदेशातून होणार असेल तर तुम्ही गढवाली असा, कुमाऊँ, मुसलमान किंवा आणखी काही. कोणीही गुणकौशल्यांच्या बळावर प्रवेश मिळवू शकतो. रेजिमेंट कुठलीही असो. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट असणं फार आवश्यक असतं.

भारतीय लष्कराच्या अनेक रेजिमेंटमध्ये मुस्लीमधर्मीय सैनिक आहेत. प्रत्येक लढाईत मुस्लीम सैनिकांनी शौर्य गाजवलं आहे.

1965च्या युद्धात भारत-पाकिस्तान युद्धात मुस्लीम सैनिकांनी शस्त्रं टाकली अशा अफवा पसरवल्या जात आहेत. त्याच युद्धात हवालदार अब्दुल हमीद यांनी पाकिस्तानचे चार टँक एकट्याने निकामी केले होते. त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

बीबीसी हिंदीच्या फॅक्ट चेक टीमने मुस्लीम रेजिमेंटसंदर्भात पडताळणी केली. भारतीय लष्करात मुस्लीम रेजिमेंट नसल्याचं त्यांच्या पाहणीतून स्पष्ट झालं. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणारे मेसेज खोटे असल्याचं स्पष्ट झालं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)