You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे सरकार मराठा समाजाला उल्लू बनवतंय - चंद्रकांत पाटील : #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वेगवेगळ्या वेबसाइट्स आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1) ठाकरे सरकार मराठा समाजाला उल्लू बनवतंय - चंद्रकांत पाटील
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलीय. याच मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.
"महाराष्ट्रातील महाभकास आघाडीतील तीन पक्षांत काडीमात्र सुसूत्रता नाही, त्यामुळेच मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात टिकला नाही, तरीही सरकार या समाजाला उल्लू बनवत आहे," अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी टीका केलीय.
"राज्य सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात इच्छाशक्तीच नाही. काँग्रेसला या प्रश्नात जराही रस नाही. अध्यादेश काढून मराठा समाजाला उल्लू बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अध्यादेश हे या प्रश्नाचं उत्तर नाही," असं सांगून ते म्हणाले, "अध्यादेश काढल्यास याचिकाकर्ते स्वस्थ बसणार नाहीत. अशाने हक्क गमावून बसाल."
दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टात तात्पुरती स्थगिती मिळालीय.
"मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण महाविकास आघाडी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही," असं मुश्रीफ म्हणालेत. सकाळनं ही बातमी दिलीय.
2) नाथाभाऊ, आता पक्की कुस्ती खेळा - गुलाबराव पाटील
नाथाभाऊ, आता पक्की कुस्ती खेळा, असं आवाहन जळगावचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना केलं आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.
"एकनाथ खडसे यांच्यासारख्या मातब्बर ओबीसी नेत्यांना संपवण्याचं कारस्थान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने रचलं आहे. मात्र एकनाथ खडसे आरोप करतात आणि गप्प बसतात, असं व्हायला नको. नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा," असं आवाहन गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
"मला महाराष्ट्रात एकाच व्यक्तीने छळले, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीच," असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. या आरोपानंतर गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना आवाहन केलं.
3) अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर देशद्रोहाच्या गुन्ह्याच्या माध्यमातून गदा - न्या. लोकूर
"अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर देशद्रोहाच्या गुन्ह्याच्या माध्यमातून गदा आणली जाते आहे. या कायद्याचा वापर भाषण स्वातंत्र्याविरोधातही एखाद्या गदेप्रमाणे केला जातोय," असं मत न्या. मदन बी. लोकूर यांनी व्यक्त केलंय. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
न्या. मदन बी. लोकूर हे 'फ्रिडम ऑफ स्पीच अँड ज्युडिशरी' या विषयावर व्हर्च्युअल चर्चासत्रात बोलत होते.
यावेळी न्या. लोकूर यांनी प्रशांत भूषण यांना पाठिंबा दिला. ते म्हणाले, "प्रशांत भूषण प्रकरणात जे काही घडले ते म्हणजे त्यांच्या विधानांचा काढण्यात आलेला चुकीचा अर्थ आहे. प्रशांत भूषण यांचा न्याय व्यवस्थेचं उल्लंघन करण्याचा कोणताही हेतू नव्हता."
"देशद्रोहाची बरीच प्रकरणं नोंदवली जात आहेत. सामान्य नागरिकही काही बोलले तर त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा आरोप केला जातो. देशद्रोहाची 70 प्रकरणं या वर्षात आधीच समोर आली आहेत," असंही न्या. लोकूर म्हणाले.
4) लोकांनाच अर्थव्यवस्थेची काळजी नाही, मग राजकारणी का करतील - चेतन भगत
देशातील आर्थिक संकटं, लोक आणि माध्यमं यांच्यातील चर्चेचे विषय यावर प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी सडेतोड मत मांडलंय. इंडिया टुडेच्या मुलाखतीत चेतन भगत यांनी म्हटलं, लोकांनाच अर्थव्यवस्थेची काळजी नाहीय, मग राजकारणी का करतील?
चेतन भगत पुढे म्हणाले, "देशातील जनतेला अर्थव्यवस्थेची काळजी नाही. आपले तरुण तर अर्थव्यवस्थेच्या स्थितीकडे दुर्लक्ष करुन बॉलिवूडमधील कोडी सोडवत बसले आहेत. कुठलंही सरकार असू द्या त्यांना माहिती आहे की लोकांना अर्थव्यवस्थेची फिकीर नाही. त्यामुळेच ते देखील अर्थव्यवस्थेतील संकटं दूर करण्यासाठी वेळ खर्च करत नाहीत."
"पुढील वर्षी पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या किती मुलांना सुरक्षित नोकऱ्या मिळणार आहेत? एकतर त्यांना बॉलिवूडच्या केसेस सोडवत बसावं लागेल किंवा आपल्याला नोकरी कशी मिळेल?" असे प्रश्नही चेतन भगत यांनी उपस्थित केले आहेत.
5) यूपीतल्या निर्माणाधीन संग्रहालयाला छ. शिवाजी महाराजांचे नाव
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी आग्र्यातील निर्माणाधीन मुघल संग्रहालयाचं नाव बदलण्याची घोषणा केली. हे संग्रहलालय आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं ओळखलं जाईल, असं त्यांनी सांगितलं. लोकमतनं ही बातमी दिलीय.
ताजमहालाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ हे संग्रहालय बांधलं जात आहे. सुमारे 150 कोटी रुपयांचा हा संग्रहालयाचा प्रकल्प आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव संग्रहालयाला देण्यात येत असल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवरून दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)