You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे : कोरोनाचं संकट अजूनही गंभीर, जगात दुसरी लाट आल्याचं चित्र
"कोरोनाचं संकट हे अजूनही गेलेलं नाही. जगात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं चित्र आहे. त्यामुळे प्रत्येकानं खबरदारी घेणं आवश्यक आहे," असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
रविवारी (13 सप्टेंबर) दुपारी समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधत असताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं.
कोरोनाच्या परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं?
- कोरोनाचं संकट वाढतंय. मुंबईत रुग्णसंख्या वाढतेय. ग्रामीण भागात कोरोना पसरतोय. या दरम्यान विधानसभेचं अधिवेशन पार पडलं. दोन दिवसांत काम संपवावं लागलं. सगळ्यांना सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.
- सरकार 15 सप्टेंबरपासून 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम सुरू करत आहे. प्रतेयक लोकप्रतिनिधीनं महिन्यातून किमान दोन वेळा प्रत्येक घरातील आपापल्या वॉर्डतील कुटुंबीयांच्या आरोग्याची चौकशी करावी. काही लक्षणं आढळल्यास शासकीय यंत्रणेला कळवायचं आहे.
- मुंबईच नाही तर संपूर्ण राज्यात 'चेस द व्हायरस'चा प्रयत्न
- आता आपण एक एक गोष्ट उघड करत आहोत. पुन्हा लॉकडाऊन करायची वेळ येऊ नये, हीच अपेक्षा आहे. आज अनेक जण मास्क वापरताना दिसत नाही. हे चूक आहे.
- सार्वजनिक ठिकाणी मास्क घातला नसेल तर कडक दंड करावा लागणार आहे. गर्दी झाली तर कारवाई करावी लागणार आहे.
'शेतकऱ्यांसाठी आता हमी भाव नाही, हमखास भाव'
- साडे एकोणतीस लाख शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्तंची कर्जमुक्ती दिली आहे. ही अभिमानास्पद बाब आहे.
- साडे सहा लाख आदिवासी बालकांना वर्षभर मोफतस दूभ-भुकटी देत आहोत. गरोदर माता, स्तनदा मातांसाठी दूध-भुकटी देत आहोत.
- आदिवासी शेतकऱ्यांसाठी बंद पडलेली खावटी कर्ज योजना सुरू करत आहोत.
- पावणे दोन कोटी शिवभोजन थाळ्यांचं वितरण झालेलं आहे. 5 रुपयांत थाळी देत आहोत.
- कोरोना आला तेव्हा राज्यात साडे सात हजार बेड्स होते, आजघडीला राज्यात तीन लाख साठ हजार बेड्स आहेत.
- विकेल ते पिकेल, अशी योजना आणत आहोत. कृषी खातं कोणत्या पिकाला बाजारपेठ आहे, हे बघेल आणि त्यापद्धतीचं पीक घेतलं जाईल. जे विकणार असेल तेच आम्ही पिकवू. असंघटित शेतकऱ्यांना संघटित करत आहोत. आता हमीभाव नाही, आता हमखास भाव. पिकाला भाव मिळणार नसेल, तर कष्ट फुकट गेले. त्यामुळे हमखास भाव आता मागायचा. त्यामुळे आपण जे विकेल तेच पिकवणार आहोत.
कंगना राणावत वादावर मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं?
"मी राजकारणाविषयी बोलणार नाही. पण, काही मंडळी राजकारण करत आहे. महाराष्ट्राच्या बदनामीचा जो डाव आखला जातोय, त्याविषयी मी बोलणार आहे. मी बोलत नाही याची अर्थ माझ्याकडे उत्तर नाही, असं नाही. पण एक दिवस मुख्यमंत्रीपदाचा मास्क हटवून मी नक्की बोलणार आहे," असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
कंगना राणावत विरुद्ध शिवसेना वाद, निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांकडून मारहाण झाल्याचा आरोप या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)