देवेंद्र फडणवीस यांचा एकनाथ खडसेंना टोला, 'मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही'

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राजीनामा आणि त्यांनी केलेल्या आरोपांवर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

"माझ्यामध्ये फार संयम आहे. मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ते आज (11 सप्टेंबर) दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

"आमचे मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का आहे," असा प्रश्न खडसेंनी विचारला होता. खडसे यांच्यावर लिहिण्यात आलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी त्यांनी हा प्रश्न विचारला होता.

खडसेंच्या याच प्रश्नावर प्रतिक्रिया विचारली असता देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंना राजीनामा नेमका का द्यावा लागला याचंही स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

एकनाथ खडसे यांनी त्यावर लिहिण्यात आलेल्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यावर आरोप केले आहेत की त्यांना मुख्यमंत्रिपद का मिळाले नाही? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता.

त्यावर फडणवीस म्हणाले, "माझ्यामध्ये फार संयम आहे. मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही. खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे मी त्यांच्यावर टीका करणार नाही."

"पण मी एक गोष्ट निश्चित सांगतो की ते जे सातत्याने मनीष भंगाळेंचं प्रकरण सांगतात त्या प्रकरणात त्यांना राजिनामा द्यावा लागला नाही. याउलट भंगाळेने त्यांच्यावर आरोप केल्यानंतर मी कमिटीला बारा तासांत अहवालात द्यायला लावला. खडसेंना त्यात क्लीन चीट मिळाली. भंगाळेला जेलमध्ये टाकलं. तो कित्येक दिवस जेलमध्ये होता. त्यामुळे याप्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला नाही. या क्लीन चीटला ते ड्राय क्लिनर वैगरे म्हणत असतील तर माहिती नाही."

'खडसेंना राजिनामा द्यावा लागला कारण...'

जून 2016 मध्ये एकनाथ खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. एमआयडीसी जमीन खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते.

या प्रकरणी त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच आपले मौन सोडलं आहे.

फडणवीस म्हणाले, "खडसेंना राजीनामा द्यावा लागला कारण एमआयडीसीच्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबांने एमआयडीसीची जमीन घेतली. त्यांनी स्वत: त्यासाठी बैठक घेतली असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. या आरोपामुळे खडसेंना राजिनामा द्यावा लागला."

"खडसेंनी मागणी केल्यावर मी या प्रकरणात न्यायाधीशांची कमिटी नेमली. पण कमिटीचा अहवाल येण्याआधीच काही लोक हाय कोर्टात गेले. हाय कोर्टाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यास सांगितलं. त्यामुळे गुन्हा दाखल झाला. तो मी दाखल केलेला नाही. या संदर्भातही खडसेंनी विनंती केल्यानंतर दोन महिन्यात आम्ही अहवाल तयार केला. पण हाय कोर्टाने तो स्वीकारला नाही. हे प्रकरण प्रलंबित आहे."

शिवाय, कुणीही यासंदर्भात गैरसमज पसरवू नये असा टोलाही फडणवीसांनी खडसेंना लगावला आहे.

खडसेंवर आरोप झालेलं प्रकरण काय आहे?

पुण्याजवळच्या भोसरीमध्ये एमआयडीसीची जमीन खडसेंच्या पत्नी आणि जावयाने खरेदी केली असून त्यासंबंधी झालेल्या बैठकीत एकनाथ खडसे स्वत: उपस्थित होते असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

या जागेच्या मालकी हक्कावरूनही वाद समोर आला होता. ही जमीन खासगी मालकीची नसून यावर एमआयडीसीने दावा सांगितला आहे.

हे जमीन व्यवहार प्रकरण वादाच्या भोवऱ्यात अडकलं आणि तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

या जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून 2016 मध्ये निवृत्त न्या. झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.

या जमीन व्यवहाराशी आपला कोणताही संबंध नाही असं खडसेंनी या समितीच्या सुनावणी दरम्यान सांगितलं होतं.

हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)