You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
व्हॉट्स अॅप-भाजपचं साटलोटं असल्याचा काँग्रेसचा आरोप, झुकरबर्गना लिहिलं पत्र
भारतातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं प्रतिष्ठित 'टाइम' या मासिकात छापून आलेल्या एका लेखाच्या अनुषंगानं फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात काँग्रेसनं काही आक्षेप घेतले आहेत.
27 ऑगस्टला टाइम मासिकामध्ये 'फेसबुक टाइज टू इंडियाज रुलिंग पार्टी कॉम्प्लिकेट इट्स फाइट अगेन्स्ट हेट स्पीच' या नावाचा एक लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखात फेसबुकचं मेसेंजिंग अॅप व्हॉट्स अॅप आणि सत्तारुढ भाजपदरम्यान साटलोटं असल्याचा आरोप करण्यात आला होता.
या आधी अशाच आशयाचा एक लेख अमेरिकन वर्तमानपत्र वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये छापण्यात आला होता. या लेखाचं शीर्षक होतं- 'फेसबुक हेट स्पीच रुल्स कोलाइड विथ इंडियन पॉलिटिक्स.' या लेखात फेसबुकची भारतीय टीम पक्षपात करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांच्या वादग्रस्त पोस्टबद्दल नियमांचं काटेकोर पालन होत नसल्याचं वॉल स्ट्रीट जर्नलच्या लेखात म्हटलं होतं.
हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतरही काँग्रेसनं फेसबुकच्या संस्थापकांना 17 ऑगस्टला पत्र लिहून आरोपांची पडताळणी करण्याची विनंती केली होती. भारतात आपली कंपनी योग्यपद्धतीनं काम कसं करेल, हे पाहावं असंही काँग्रेसनं आपल्या पत्रात म्हटलं होतं.
'व्हॉट्स अॅपवर भाजपचं नियंत्रण'
काँग्रेसनं आता 'टाइम' मासिकामधील लेखाच्या हवाल्यानं फेसबुकला पत्र लिहून म्हटलं आहे, की इतक्या कमी कालावधीत दुसऱ्यांदा पत्र लिहावं लागलं, कारण एका प्रतिष्ठित अमेरिकन प्रकाशनानं त्यांच्या लेखात पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित केला आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
टाइममधील लेखातील तीन मुद्दे महत्त्वाचे असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. या मुद्द्यांवरून हे स्पष्ट होत आहे, की भारतात परदेशी कंपन्यांच्या व्यवहारांशी संबंधित कायद्याचं उल्लंघन होत असल्याचं समोर येत आहे.
यातला पहिला मुद्दा म्हणजे व्हॉट्स अॅपनं भारतात पेमेंट ऑपरेशसाठी आवश्यक असलेलं लायसन्स मिळविण्याच्या मोबदल्यात भाजपकडे व्हॉट्स अॅप इंडियाचं नियंत्रण दिलं आहे.
दुसऱ्या मुद्द्यामध्ये म्हटलं आहे की, तुमच्या कंपनीतील एकाहून अधिक व्यक्ती सत्ताधारी भाजपला अनुकूल काम करत आहेत. 'आधी जेवढं वाटत होतं, त्यापेक्षा ही समस्या अधिक गंभीर आहे.'
तिसऱ्या मुद्द्यामध्ये म्हटलं आहे, की 40 कोटी लोक व्हॉट्स अॅपचा वापर करतात आणि तुमची टीम या व्यासपीठाच्या माध्यमातून द्वेष पसरविणाऱ्या पोस्ट्सनाही परवानगी देते. त्यामुळे भारताच्या सामाजिक सद्भावनेच्या वातावरणाला तडा जात आहे.
पत्रात लिहिलं आहे की, प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आम्ही तुम्हाला आवाहन करतो की, तुमची कंपनी या प्रकरणी कोणती पावलं उचलत आहेत याची माहिती आम्हाला देण्यात यावी. भारतातील आपल्या कारभारामध्ये सुधारणा करण्यासाठी कंपनीनं कृती आराखडा बनवावा, असंही काँग्रेसनं आपल्या पत्रात म्हटलं आहे.
कोणत्याही परदेशी कंपनीला आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी देशात सामाजिक वैमनस्य पसरविता येऊ नये म्हणून आपण कायदेशीर आणि न्यायालयीन उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू, असंही काँग्रेसनं म्हटलं आहे.
या मुद्द्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्वीट केलं आहे.
काय आहे कंपनीचं म्हणणं?
वॉल स्ट्रीट जनरलमधील लेखानंतरच फेसबुकनं स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं, की कंपनी कोणत्याही राजकीय प्रभावाचा विचार न करता आपली धोरणं राबवते.
फेसबुकच्या एका प्रवक्त्यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं होतं, "आम्ही द्वेष पसरविणाऱी भाषणं तसंच पोस्ट्स प्रसिद्ध करत नाही. जगभरात कोणत्याही राजकीय दबावाशिवाय तसंच राजकीय पक्षाच्या संपर्कयंत्रणेचा विचार न करता आम्ही आमची धोरणं राबवतो. याविषयी अजून प्रयत्न करायला हवेत, हे आम्हालाही मान्य आहे. त्यादिशेने आम्ही प्रयत्नही करत आहोत."
भाजपने फेटाळले होते आरोप
वॉल स्ट्रीट जर्नलच्या लेखानंतर जेव्हा राहुल गांधींनी टीका केली होती, तेव्हा भाजप नेते आणि माहिती व प्रसारण मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींच्या आरोपांना कडक शब्दांत प्रत्युत्तर दिलं होतं.
पराभूत मनोवृत्तीचे लोक संपूर्ण जगावरच भाजप आणि RSS चा कंट्रोल असल्याचं वक्तव्य करत आहेत असा टोमणा रविशंकर प्रसाद यांनी लगावला होता.
रविशंकर प्रसाद ट्वीट करून म्हटलं होतं, "पराभूत व्यक्ती आपल्या पक्षातील लोकांवरसुद्धा प्रभाव पाडू शकत नाहीत. ते जगावर भाजप आणि RSS चं नियंत्रण असल्याचं बोलत असतात."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)