मोनिका मोरे म्हणते, 'नव्या हातांनी काम करून कुटुंबाला सांभाळेन, हे पाहायला आज पप्पा हवे होते'

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

"अखेर माझ्या पप्पांचं स्वप्न पूर्ण झालं. ते माझ्यासोबत नाहीत. पण जिथे असतील तिथून मला पहात असतील. माझे नवे हात पहात असतील. खूप खुश झाले असतील पप्पा आज. त्यांच्या मुलीला नवे हात मिळालेत. आता त्यांची मोनिका जॉब करेल. घरच्यांची काळजी घेईल. कुटुंबाचा सांभाळ करेल"

हे शब्द आहेत मुंबईच्या मोनिका मोरेचे. 24 वर्षांची मोनिका आता घरी चालली आहे. मोनिकावर ऑगस्ट महिन्यात हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. जवळपास एक महिना रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर मोनिका आता घरी जाणार आहे.

बीबीसीशी बोलताना मोनिका म्हणते, "मी पुन्हा माझ्या हातांनी काम करावं. हे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. आता त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय. मला हात मिळावेत यासाठी त्यांनी खूप कष्ट केले. रुग्णालयात धावाधाव केली. पप्पा माझ्यासोबत कायम होते आणि राहतील. आज मी त्यांनी दिलेल्या हिमतीमुळे उभी आहे. मला नवजीवन मिळालंय. पण ते पाहण्यासाठी आज पप्पा नाहीत. ते आज हवे होते."

मोनिकाचे वडील तिचा आधारस्तंभ होते. जानेवारी महिन्यात किडनीच्या आजारामुळे मोनिकाच्या वडिलांचा मृत्यू झाला.

वडिलांच्या आठवणीने बीबीसीशी बोलताना मोनिका आपले अश्रू रोखू शकली नाही. प्रत्येक शब्दागणिक तिचा हुंदका वडिलांवर तिची असलेली श्रद्धा आणि प्रेम याची प्रचिती देत होता.

"आज मी त्यांच्यामुळेच आहे.." असं म्हणत मोनिकाने आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. एकीकडे नवीन हात मिळाल्याचा आनंद, तर, दुसरीकडे ज्यांच्यामुळे हे शक्य झालं. ते बाबा नसण्याचं दुःख मोनिकाच्या बोलण्यात स्पष्ट दिसत होतं.

मोनिका पुढे म्हणते, "खरंतर, मला कधीच वाटलं नव्हतं. मला नवीन हात मिळतील म्हणून. पप्पांनी खूप धावाधाव केली होती माझ्यासाठी. त्यामुळे कधीतरी मला हात मिळतील ही आशा होती. प्रत्यारोपणासाठी हात मिळणार आहे. तू तयार आहेस का? हे डॉक्टरांचे शब्द अजूनही कानात ऐकू येतात. डॉक्टरांनी विचारल्यावर दोन मिनिटे मला काहीच सूचलं नाही. पण, माझं स्वप्न पूर्ण होणार होतं."

मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात मोनिकावर हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. ग्लोबल रुग्णालयाचे प्लॅस्टिक सर्जन डॉ. नीतेश सातभाई म्हणतात, "येत्या काही दिवसात तिला कोपर हलवण्यास सांगितलं जाईल. 3-4 महिन्यांपूर्वी हात आणि बोटांची हालचाल होणं अपेक्षित आहे. तोपर्यंत तिच्या हाताचे टिश्यू आणि स्नायू बळकट होतील. तोपर्यंत तिला आपल्या दैनंदिन कामासाठी मदत घ्यावी लागेल. मोनिकाच्या हातांच्या रिकव्हरीसाठी एक ते दिड वर्ष लागेल"

"मोनिकावर हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होऊन आता चार आठवडे झालेत. त्यामुळे तिला घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मैत्र घरी गेल्यानंतर तिला फिजिओथेरपी घ्यावी लागेल. त्याचसोबत कोणत्याही संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी तिला काही दिवस घरी वेगळं ठेवणं गरजेचं आहे, "असं डॉ. सातभाई पुढे म्हणाले.

वडिलांच्या आठवणीने भारावलेली मोनिका पुन्हा स्वत:ला सावरत म्हणाली, "या दिवसासाठी मी खूप वाट पाहिली आहे. मला लवकरात लवकर माझ्या हातांनी काम सुरू करायचं आहे. पण, नव्या हातांनी काम करण्यासाठी दीड वर्ष लागेल. 3 ते 6 महिन्यांनी हळूहळू हातांचा वापर करता येतील. खूप छान वाटतंय. माझ्याकडे शब्द नाहीत."

मोनिका पुढे म्हणते, "हात नसल्याने कोणाच्याही लग्नात मेहेंदी काढता येत नसे. आता मी मेहेंदी माझ्या हातांवर मेहेंदी काढू शकते. चित्र काढू शकते, स्वयंपाक करू शकते."

रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावल्यानंतर मोनिकाचं आयुष्य उध्वस्त झालं. मात्र, तिने धीर सोडला नाही.

"मला वडील नाहीत. त्यामुळे डॉक्टर माझे वडील बनले. नर्स, मावशी हा माझं कुटुंब आहे. त्यांच्यामुळे हे शक्य झालं. "

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात यशस्वी झालेली ही पहिली हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. मोनिकाने 2018 साली ग्लोबल रुग्णालयात हात प्रत्यारोपणासाठी नोंदणी केली होती.

महाराष्ट्रातील पहिली हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

चेन्नईला ब्रेन-डेड मुलाच्या कुटुंबीयांनी हात दान करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, डॉक्टरांनी मोनिकाला रुग्णालयात दाखल करून घेतलं. शुक्रवारी 28 ऑगस्टला सकाळी मोनिकावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सुरू केली.

ग्लोबल रूग्णालयाच्या माहितीनुसार, ''अपघातात हात गमावलेल्या मोनिका मोरेच्या दोन्ही हातांवर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 27 ऑगस्टला रात्री उशिरा चार्टर्ड विमानाने ते हात मुंबईला आणण्यात आले. त्यानंतर लगेचच तिच्या हातांवर शस्त्रक्रियेला सुरूवात करण्यात आली.''

कन्सल्टंट प्लॅस्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉ. नीलेश सातभाई यांच्या नेतृत्वाखाली 12 डॉक्टरांच्या टीमनं मोनिकावर ही शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर रूग्णाला इटेन्सिव केअर युनिटमध्ये हलविण्यात आले आहे.

याबाबत बोलताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले, "हात प्रत्यारोपण झाल्याने मोनिकाच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळणार आहे. अपघातामुळे तिने दोन्ही हात गमावले होते. मोनिका ग्रॅज्युएट झाल्यानंतर आता नोकरी करतेय. आता मोनिका आपल्या हाताने काम करेल."

मोनिकाला हात देणारा दाता

डॉक्टरांच्या माहितीनुसार, चेन्नईच्या ग्लोबल रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 32 वर्षीय मुलला डॉक्टरांनी ब्रेन-डेड घोषीत केलं होतं. ब्रेन-डेड मुलाच्या कुटुंबीयांच्या परवानगीनंतर या मुलाचे हात दान करण्यात आले. शुक्रवारी सकाळी या ब्रेन-डेड रुग्णाचे हात चेन्नईवरून मुंबईला आणण्यात आले.

मुंबई पोलिसांनी तयार केलेल्या ग्रीन कॉरिडोरच्या मदतीने 15 मिनिटांत हात ग्लोबल रुग्णालयात पाठवण्यात आले.

कोणी केली शस्त्रक्रिया?

ग्लोबल रुग्णालयातील कन्सल्टंट प्लॅस्टिक सर्जन आणि रिकन्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉ. नीलेश सातभाई यांच्या नेतृत्वाखाली 12 डॉक्टरांच्या टीमने ही अत्यंत गुतंगुंतीची शस्त्रक्रिया केली.

रेल्वे अपघातात हात गमावले

2014 साली मुंबई रेल्वे अपघातात मोनिका मोरेला आपले हात गमवाले लागले होते. सेंट्रेल रेल्वेच्या घाटकोपर स्थानकात धावती ट्रेन पकडताना मोनिका प्लॅटफॉर्मच्या पुढे असलेल्या खड्यात पडली होती. त्यानंतर मोनिकाचे दोन्ही हात कोपरापासून कापून टाकावे लागले होते.

2014 साली मोनिका बारावीत होती. त्यानंतर काही सामाजित कार्यकर्त्यांच्या मदतीने मोनिकाला कृत्रिम हात लावण्यात आले होते. मात्र, मोनिकाच्या वडिलांनी जिद्द सोडली नाही. मोनिकाला नवे हात परत मिळवून देण्यासाठी अशोक मोरे यांनी खूप प्रयत्न केले.

मुलीच्या उपचारासाठी 25 लाख रूपयांची जमवाजमव करण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. पण दुर्दैवाने किडनीच्या आजारामुळे त्यांचा दीड वर्षापूर्वी मृत्यू झाला.

भारतातील हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

2015 साली कोच्चीच्या अम्रिता इंन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायंन्सेसमध्ये ट्रेन अपघातात हात गमावलेल्या 30 वर्षाच्या मुलावर हात प्रत्यारोपण करण्यात आलं होतं. 2017 साली कोच्चीतील अम्रिता इंन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायंन्सेसमध्ये दोन्ही हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

ही शस्त्रक्रिया पुण्याच्या श्रेया सिद्धगावकर या मुलीवर करण्यात आली होती. 2018 साली पुण्याच्या कमांड हॉस्पिटलमध्ये एका जवानावर हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण काही कारणांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकली नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)