You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
देवेंद्र फडणवीसांचे सगळेच मुहूर्त चुकत आहेत - हसन मुश्रीफ #5मोठ्याबातम्या
आज सकाळी प्रसिद्ध झालेल्या वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवरील बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1) कोरोनाच्या काळात आंदोलनं करताना लाज वाटायला पाहिजे - हसन मुश्रीफ
"ज्याचा अनुभव नाही अशा आजाराशी राज्यातील महाविकास आघाडीपासून ते अगदी परिचारिका, ग्रामपंचायतीच्या शिपायापर्यंत सर्वजण जीवाची बाजी लावून सामना करत आहेत. अशावेळी फसवी आंदोलने करणाऱ्या विरोधकांना लाज वाटायला पाहिजे," अशा शब्दात महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपवर टीका केली. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस कुठले पंचांग वापरतात माहिती नाही, मात्र त्यांचे मुहूर्त चुकत असल्याचा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला.
स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत ग्रामस्थांना आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटपाची सुरुवात कोल्हापुरात करण्यात आली. त्यावेळी हसन मुश्रीफ यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
"विरोधकांनी जरा PPE किट घालून काम करून पाहावं आणि जरा बिळातून बाहेर यावं. लोकशाहीमध्ये आंदोलनं हवीत, पण ही ती वेळ नाही," असंही मुश्रीफ म्हणाले.
2) आंतरजिल्हा एसटी बससेवा आणि कोचिंग क्लास सुरु करण्याचे संकेत
महाराष्ट्रात आंतरजिल्हा एसटी बससेवा सुरू करण्याचे संकेत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात दिले. एबीपी माझानं ही बातमी दिली.
"राज्यात आंतरजिल्हा बसेस लवकरच सुरू करण्यात येणार असून याबाबत शासन निर्णय मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतर त्वरित काढण्यात येईल," अशी माहिती वडेट्टीवारांनी दिली. एसटी बससेवा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
विजय वडेट्टीवार यांनी काही अटी-शर्थींसह कोचिंग क्लासेसही सुरू करण्याचे संकेत दिले. राज्यातील कोचिंग क्लासेस आणि स्पर्धा परीक्षा केंद्र कोरोनाचे नियम पाळून सुरू करण्याची तयारी सरकारनं सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली.
3) संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यामुळे डॉक्टरांचा अपमान - भाजप
डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला जास्त कळतं, असं वक्तव्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना केलं होतं. या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाली असून, संजय राऊतांवर भाजपनं टीकाही केलीय. दैनिक प्रभातनं ही बातमी दिलीय.
"कोरोनाच्या संकटात डॉक्टर देवदूत म्हणून काम करत आहेत. त्यांच्याबद्दल संजय राऊत यांनी असं विधान करणं म्हणजे डॉक्टरांचा मोठा अपमान आहे. त्यामुळे संजय राऊतांनी राज्यासह देशातील सर्व डॉक्टरांची माफी मागावी," अशी मागणी भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली.
काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात म्हटलं होतं की, "WHO ला काय कळतं? ती सीबीआयसारखीच आहे. WHO म्हणजे इकडून तिकडून गोळा केलेल्या माणसांचा गट आहे. त्यांच्यामध्ये डॉक्टर असले म्हणून काय झालं? खरंतर डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला जास्त कळतं. मी कधीच डॉक्टरांकडून औषध घेत नही. कंपाऊंडरकडून घेतो. कारण त्यांना जास्त कळतं."
संजय राऊत यांच्या या विधानावरूनच आता वादाला सुरुवात झालीय. भाजपनं माफीची मागणी केली असली तरी डॉक्टरांच्या कुठल्याच संघटनेकडून अद्याप कुठलीच प्रतिक्रिया आली नाहीय.
4) आज देशात मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे?- सोनिया गांधी
स्वातंत्र्य दिनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशवासियांशी संवाद साधला. सध्याचा काळ हा लोकशाहीसाठी कसोटीचा काळ असल्याचं सोनिया गांधींनी म्हटलं. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.
"सध्याचं सरकार लोकशाही व्यवस्था, राज्यघटनेची मूल्य आणि परंपरा यांच्याशी विसंगत वागत आहे. हा काळ लोकशाहीसाठी कसोटीचा आहे," असं सोनिया गांधी म्हणाल्या.
स्वतंत्र भारताची लोकशाही व्यवस्था बळकट करणं आणि ती शाबूत ठेवणं ही विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी असल्याचं त्यांनी नमूद केलं.
"लिहिणं, बोलणं, प्रश्न विचारणं, असहमत होणं, मत व्यक्त करणं इत्यादी गोष्टींसाठी देशात आजच्या घडीला स्वातंत्र्य आहे का?" असा सवाल सोनिया गांधी यांनी उपस्थित केला.
5) संपूर्ण भारतीय बनावटीच्या विमानाची पहिली चाचणी यशस्वी
मराठमोळ्या कॅप्टन अमोल यादव यांनी तयार केलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या पहिल्या विमानाची चाचणी यशस्वी झालीय. या पहिल्या टप्प्यात विमानतळावरील वावर, उड्डाण यांची चाचणी यशस्वीपणे पार पडली. लोकसत्तानं ही बातमी दिलीये.
या विमानाच्या आणखी दोन चाचण्या घेतल्या जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात विमान उड्डाण करून आकाशात एक फेरी मारेल आणि त्याच विमानतळावर उतरवले जाईल. या टप्प्यात वैमानिकावर मोठी जबाबदारी असेल. त्यामुळे ही चाचणी करण्यासाठी स्वत: कॅप्टन अमोल यादव वैमानिकाच्या खुर्चीत बसतील.
तिसऱ्या चाचणीत हे विमान एका विमानतळावरून दुसऱ्या विमानतळावर नेण्यात येईल.
कॅप्टन अमोल यादव यांनी कोणत्याही सरकारी मदतीशिवाय स्वबळावर हे विमान तयार केले आहे. यासाठी प्रसंगी त्यांनी आपलं घरही गहाण ठेवलं. हे विमान तयार करण्यास आतापर्यंत सहा कोटींचा खर्च आला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)