You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार यांच्या विधानामुळे पार्थ पवार नाराज नाहीत: जयंत पाटील #5मोठ्याबातम्या
वेबसाईट आणि विविध वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या महत्त्वाच्या बातम्या
1. पार्थ पवार नाराज नाहीत : जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थला सुनावल्यामुळे पार्थ पवार नाराज असल्याची चर्चा होती. पण पार्थ पवार नाराज नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलंय.
महाराष्ट्र टाईम्सने याविषयीची बातमी दिली आहे.
पार्थ आणि अजित पवार नाराज नाहीत, शरद पवार हे आजोबा आहेत. आजोबांना बोलायचा अधिकार असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय. शरद पवारांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन गुरुवारी पार्थ यांनी त्यांची भेट घेतली. सुप्रिया सुळेही गुरुवारी अजित पवारांना भेटल्या होत्या.
2. नवनीत राणांना श्वास घ्यायला त्रास, मुंबईकडे रवाना
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोव्हिड 19 वरच्या उपचारांसाठी मुंबईला हलवण्यात येतंय. गेले 7 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काल (14 ऑगस्ट) त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. महाराष्ट्र टाईम्सने याविषयीची बातमी दिली आहे.
नवनीत राणा यांच्यावर सुरुवातीला घरीच क्वारंटाईन करून उपचार करण्यात येत होते. पण त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथेच त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.
मुंबईला आणण्यासाठी विमानाची व्यवस्था न झाल्याने त्या रस्तामार्गे मुंबईला येत आहेत. राणा कुटुंबातल्या 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
3. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना टोल माफ : एकनाथ शिंदे
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोल माफ करण्यात आलाय. गणेशोत्सव सुरू होण्याच्या 2 दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात 2 दिवस टोलमधून प्रवाशांना सवलत मिळणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी याविषयीची माहिती दिली. झी न्यूजने याविषयीची बातमी दिली आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी टोल सवलतीसाठी स्थानिक पोलिस स्टेशनला वाहन क्रमांक, वाहन मालकाचं नाव आणि प्रवासाची तारीख नोंदवल्यानंतर त्यांना तात्काळ टोल माफीचा स्टिकर मिळेल. पण या प्रवासासाठी राज्य शासनाच्या नियमांनुसार कोरोना चाचणी आणि ई पास बंधनकारक असेल.
4. मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार आणि नाशिकमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. लोकसत्ताने याविषयीची बातमी दिलेली आहे. कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्य़ांत घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो.
5. ठाकरे कुटुंबीयांच्या मागे महाराष्ट्र उभा आहे : उदय सामंत
पद्म पुरस्कारांसाठी राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र सरकारने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची निवड केली आहे. ही निवड योग्य असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. लोकमतने ही बातमी दिली आहे.
आदित्य ठाकरे राजकारणात किती वर्षं आहेत, यापेक्षा त्यांच्यात गुणवत्ता किती आहे हे पहायला हवं, असं उदय सामंत यांनी सांगितलं. सोबतच एखाद्या प्रकरणात जर कुणी आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल, तर जनता त्याला प्रत्युत्तर देईल, ठाकरे कुटुंबियांच्या मागे महाराष्ट्र उभा आहे, असंही उदय सामंत यांनी म्हटलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)