You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राजेश टोपे यांच्या आईचं निधन #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1) महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या आईचं निधन
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचं प्रदीर्घ आजारानं काल (1 ऑगस्ट) निधन झालं. त्या 74 वर्षांच्या होत्या.
गेल्या महिन्याभरापासून शारदाताईंवर मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच शारदाताईंनी अखेरचा श्वास घेतला.
राज्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाची परिस्थिती हाताळत असताना, आरोग्यमंत्री राजेश टोपे वेळ काढून हॉस्पिटलमध्ये जाऊन आईला पाहत असत.
आईला श्रद्धांजली अर्पण करताना टोपे म्हणाले, "माझी आई अजातशत्रू होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावलीसारखी राहिली. चार वर्षांपूर्वी वडील गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आशीर्वाद दिला. तो आशीर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील."
जालन्यातील अंबड तालुक्यात असणाऱ्या मूळगावीच आज (2 ऑगस्ट) संध्याकाळी 4 वाजता शारदाताईंवर अंत्यसंस्कार होतील. कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीनुसारच अंत्यसंस्कार केले जातील, असं राजेश टोपेंनी सांगितलं. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
2) राजू शेट्टी सरकारी आंदोलक - देवेंद्र फडणवीस
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे सरकारी आंदोलक असल्याची टीका महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
राजू शेट्टींची लुटूपुटूची लढाई ही सरकार वाचवण्यासाठी आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भाजपचं आंदोलन म्हणजे पुतना-मावशीचं प्रेम आहे, अशी टीका राजू शेट्टींनी भाजपच्या दूध दरवाढीच्या आंदोलनावर केली होती. या टीकेला फडणवीसांनी उत्तर दिलं.
"सध्याचा काळ हा अडचणीचा काळ आहे. दूध उत्पादक शेतकरी हा दुधाच्या उत्पन्नावर जगतोय. ज्यावेळी दुधाचे दर कमी होतात, त्यावेळी दर स्थिर करण्यासाठी सरकार अनुदान देतं. सध्या दुधाला मिळणाऱ्या दरात गायीच्या चाऱ्याचा खर्चही निघत नाही. असं असतानाही सरकारकडून कुठलेही अनुदान मिळत नाही हे दुर्दैवी आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
3) मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर पालकमंत्र्याच्या सल्ल्यानेच प्रशासक निवडणार
महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर पालकमंत्र्यांच्या सल्ल्यानेच प्रशासक निवडला जाणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र, अण्णांच्या नाराजीला केराची टोपली दाखवत, प्रशासकाची नियुक्ती पालकमंत्रांच्या सल्ल्यानेच होणार असल्याचं राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलंय. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.
पालकमंत्री हा विशिष्ट पक्षाचा असतो आणि त्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर त्याच्या सल्ल्याने प्रशासक नेमल्यास राजकारण आणि घोडेबाजार होईल, असं म्हणणं अण्णा हजारे यांचं आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी तसं कळवलंही होतं.
त्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अण्णा हजारे यांची राळेगणमध्ये जाऊन भेट घेतली होती आणि चर्चा केली होती. मात्र, या चर्चेतून काहीच निष्फळ झालं नसल्याचं अधिसूचनेवरून दिसून येतंय.
राज्य सरकारने नुकत्याच काढलेल्या अधिसूचनेवर अण्णा हजारेंनी नाराजी व्यक्त केली असून, कोर्टातील याचिकांचा निर्णय झाल्यावरच बोलू, अशी भूमिका अण्णांनी घेतलीय.
4) कंगना रनौतच्या घराबाहेर गोळीबार?
अभिनेत्री कंगना रनौतच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. स्वत: कंगना रनौतने असा दावा केलाय. हिमाचल प्रदेशातील मनाली इथे कंगनाचं निवासस्थान आहे. इंडियन एक्सप्रेसनं ही बातमी दिलीय.
या घटनेनंतर कंगनानं पोलिसांना कळवलं. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत तपास केला. मात्र, गोळीबार झाल्याचे कोणतेही पुरावे तिथे सापडले नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र, पुढेही तपास सुरू ठेवला जाणार आहे.
"रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घरात झोपली असताना, गोळीबार झाल्याचा आवाज ऐकला. सुरुवातीला फटाके असतील, असं वाटलं. पण तो आवाज गोळीबाराचाच होता. बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवर भाष्य करत असल्यानं मला घाबरवण्यासाठी हा गोळीबार झाला असावा," असा दावा कंगनानं केला आहे.
5) दिल्ली दंगलींप्रकरणी उमर खालिदची चौकशी
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील माजी विद्यार्थी उमर खालिद याची दिल्लीतील हिंसक दंगलींप्रकरणी चौकशी करण्यात आली. उमरचे फोनही जप्त करण्यात आले आहेत. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिलीय.
फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या दिल्लीतल्या दंगली 'मोठ्या कटाचा भाग' असल्याच्या दिशेने दिल्ली पोलीस तपास करत आहेत.
दिल्लीतल्या दंगलीप्रकरणी उमर खालिदची पहिल्यांदाच चौकशी करण्यात आली.
या दंगलीत एकूण 53 जणांचा मृत्यू, तर 400 हून अधिक जण जखमी झाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)