You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आशुतोष भाकरे: खुलता खळी खुलेना फेम अभिनेत्री मयुरी देशमुखच्या नवऱ्याची आत्महत्या
खुलता कळी खुलेना या मालिकेतून मराठी माणसाच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख हिच्या नवऱ्याने आत्महत्या केली आहे. आशुतोष भाकरे हा स्वतः एक उदयोन्मुख अभिनेता होता.
32 वर्षांचा आशुतोष मूळचा नांदेडचा. त्याने बुधवारी (29 जुलै) नांदेडमधल्याच गणेशनगर भागातल्या आपल्या राहत्या घरी दुपारी 12 ते 1च्या सुमाराला आत्महत्या केली.
आत्महत्येचं कारण अजून समजू शकलेलं नाही. मात्र, प्राथमिक तपासात आशुतोष तणावाखाली असल्याचं समोर येत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
सकाळ वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार आशुतोष गेल्या काही दिवसांपासून बेचैन होता. बुधवारी सकाळी त्याने सर्वांसोबत नाश्ता केला.
थोड्या गप्पा-गोष्टी करून तो स्वतःच्या खोलीत गेला. त्यानंतर तो खोलीबाहेर आलाच नाही. बराच वेळ झाला तरी आशुतोष खोलीतून बाहेर आला नाही म्हणून कुटुंबीयांनी हाका मारल्या तर त्यालाही उत्तर मिळालं नाही. शेवटी दार उघडून आत जाताच आशुतोषने गळफास घेतल्याचं लक्षात आलं. या घटनेने आशुतोषचं कुटुंब हादरलं आहे.
आशुतोषने काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून लोक आत्महत्या का करतात? असा एक व्हिडियो शेअर केला होता आणि या विषयावर आपल्या चाहत्यांशी संवादही साधला होता. मात्र, त्यावरून आशुतोषला काही त्रास आहे, असा अंदाज कुणालाही आला नव्हता.
आशुतोषचं आई-वडील नांदेडमधील ख्यातनाम डॉक्टर आहे. तर त्याची पत्नी आणि अभिनेत्री मयुरी देशमुखही डेंटिस्ट आहे. 21 जानेवारी 2016 रोजी आशुतोष आणि मयुरी यांचं लग्न झालं होतं. लॉकडाऊनमुळे आशुतोष आणि मयुरी नांदेडमधल्या घरीच राहत होते. आशुतोष आणि मयुरी यांच्यात कसल्याही प्रकारचे मतभेद नसल्याचं त्यांच्या जवळच्या व्यक्तींचं म्हणणं असल्याचं लोकसत्ताने म्हटलं आहे.
आशुतोष उदयोन्मुख कलाकार होता. 'भाकर' आणि 'इचार ठरला पक्का' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. महाविद्यालयात असतानाही त्याने नाटकांमधून काम केलं. एकांकिका आणि राज्य नाट्य स्पर्धांमधूनही भाग घेतला होता. मात्र, दोन-तीन चित्रपट वगळता त्याला फारसं व्यावसायिक यश मिळालं नव्हतं. त्यामुळे करियरचं नैराश्य येऊन त्याने आत्महत्या केली का, याचाही पोलीस तपास करत आहे.
तर मयुरी देशमुखही अभिनेत्री आहे. खुलता कळी खुलेना या झी मराठी वाहिनीवरच्या कार्यक्रमातून ती लोकप्रिय झाली. यानंतर तिने एक-दोन सिनेमांमध्येही काम केलं आहे.
व्यावसायिक रंगभूमीवरही तिने उत्तम नाटकांमधून काम केलं. 'डिअर आजो' हे तिची मुख्य भूमिका असणारं नाटक चांगलंच गाजलं होतं. या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शनही तिनेच केलं होतं. तर 'तिसरे बादशाह हम' या नाटकात ती ज्येष्ठ अभिनेते सुनील बर्वे यांच्यासोबत काम करत होती. डॉ. प्रकाश बाबा आमटे, 31 दिवस आणि ग्रे या सिनेमांमधूनही तिने अभिनय केला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)