कोरोना संसर्ग : 'कम्युनिटी ट्रान्समिशन' सुरू झाल्याचं सरकार मान्य का करत नाही?

    • Author, विकास पांडे
    • Role, बीबीसी न्यूज
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

देशातली कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढते आहे. कोरोना संसर्ग 'कम्युनिटी ट्रान्समिशन' टप्प्यात पोहोचलं आहे का? पण सरकार हे मान्य करायला तयार का तयार नाही?

45 वर्षीय राजेश कुमार यांना जून महिन्यात खोकल्याचा त्रास जाणवू लागला. काही दिवसातच त्यांना तापही येऊ लागला.

त्यांनी कोरोना चाचणी केली नाही. ताप येऊ नये यासाठी त्यांनी पाच दिवस औषध घेतलं. पण ताप येतच राहिला. काही दिवसात त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला.

त्यांच्या कुटुंबीयांना राजेश यांना कोरोना चाचणी करून घेण्यासाठी आग्रह धरला. परंतु त्यांनी नकार दिला. मी घराबाहेर पडलेलो नाही, मला कोरोना व्हायची शक्यताच नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता. कोरोना पॉझिटिव्ह किंवा कोरोना संशयित रुग्णाला मी भेटलेलो नाही. त्यामुळे मला कोरोना कसा होऊ शकतो असंही त्यांनी घरच्यांना सांगितलं.

कफ, ताप आणि त्यानंतर श्वास घ्यायला त्रासाची लक्षणं दिसू लागल्यानंतर आठ दिवसात त्यांची प्रकृती ढासळली. त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. चाचणीनुसार त्यांना कोरोना असल्याचं निष्पन्न झालं.

मी वाचलो, परंतु हॉस्पिटलमध्ये दाखल करायला थोडा उशीर जरी झाला असता तर माझा जीवच गेला असता असं राजेश सांगतात.

कोरोना नेमका कुणामुळे झाला हे राजेश यांना अद्याप समजू शकलेलं नाही. तज्ज्ञांच्या मते, कोरोना संसर्ग आता कम्युनिटी ट्रान्समिशन टप्प्यात पोहोचला असल्याचे पुरेसे पुरावे असल्याचे मिळत आहेत.

परंतु कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झालं आहे हे सरकार मान्य करायला तयार नाही. कम्युनिटी ट्रान्समिशन या संकल्पनेची ठोस व्याख्या नाही, प्रत्येक देश स्थानिक परिस्थिती, संसाधनं यानुसार व्याख्या ठरवतं असं सरकारचं म्हणणं आहे.

केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी कोरोना संसर्ग कम्युनिटी ट्रान्समिशन टप्प्यात गेल्याचं मान्य केलं आहे.

कम्युनिटी ट्रान्समिशन म्हणजे काय?

जागतिक स्तरावर कम्युनिटी ट्रान्समिशन या संकल्पनेची व्याख्या करण्यात आली आहे. रुग्णाला कोरोनाचा संसर्ग कोणाच्या माध्यमातून झाला हे समजू शकत नाही किंवा त्याचा माग काढता येत नाही त्या स्थितीला कम्युनिटी ट्रान्समिशन असं म्हटलं जातं.

जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावलीनुसारही अशीच व्याख्या केली जाते. ज्यावेळी रुग्णाला कोरोनाचा संसर्ग कसा झाला याचा शोध घेऊनही स्रोत समजत नाही तेव्हा कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झालं असं म्हटलं जातं. या टप्प्यात कोरोनाचा संसर्ग अक्षरक्ष: झपाट्याने होतो.

दिल्लीस्थित सर गंगाराम हॉस्पिटलमधील सेंटर फॉर चेस्ट सर्जरीचे चेअरमन डॉ. अरविंद कुमार यांच्या मते देशात कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झालं आहे.

संसर्गाचा स्रोत माहिती नाही अशा पेशंट्सची संख्या वाढते आहे असं त्यांनी सांगितलं. अशा केसेसची संख्या वाढणं हे कम्युनिटी ट्रान्समिशनचं लक्षण आहे असं ते म्हणाले.

देशात सद्यस्थितीला कोरोना रुग्णांची संख्या 1.2 दशलक्ष एवढी आहे आणि आतापर्यंत 29,000 जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.

ही आकडेवारी खोटं बोलत नाही. बहुतांश राज्यांमध्ये कोरोना पेशंट्सची संख्या दररोज वाढते आहे. जे तुमच्यासमोर आहे ते नाकारण्यात काहीच अर्थ नाही असं कुमार यांना वाटतं.

परंतु सरकार हे मान्य करायला तयार नाही. इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात IMA मधील एका वरिष्ठ डॉक्टरांनी देशात कोरोनाचा संसर्ग कम्युनिटी ट्रान्समिशन टप्प्यात गेल्याचं मान्य केलं. परंतु संघटनेने या भूमिकेपासून फारकत घेतली. हे त्या डॉक्टरांचं वैयक्तिक मत होतं असं असोसिएशनने म्हटलं आहे. हा युटर्न अनेकांना चक्रावून टाकणारा होता.

सरकारने डॉक्टर आणि तज्ज्ञ काय म्हणतात ते ऐकायला हवं. जे पुरावे आहेत ते मान्य करायला हवेत असं व्हायरालॉजिस्ट डॉ. शाहीद जमील यांना वाटतं.

विषाणुचा वेगानं प्रसार

महिनाभरापूर्वी विषाणूच्या प्रसाराचं स्वरुप आणि आताचं स्वरुप यात प्रचंड फरक आहे. आंध्र प्रदेश आणि बिहार अशी राज्यं आणि शहरातल्या दाटीवाटीच्या भागांच्या पल्याडही विषाणूने हातपाय पसरले आहेत.

सरकार, प्रशासन, आरोग्य व्यवस्था आणि माणसंही या सगळ्यासाठी तयार नाहीत कारण ते क्वारंटीन आणि टेस्टिंगवर अवलंबून आहेत. अन्य राज्यातून येणाऱ्या लोकांचे लोंढे कमी केले तर विषाणूचा प्रसार रोखता येईल असं त्यांचं तत्त्व आहे. मात्र स्थानिक पातळीवर विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठीच्या उपाययोजना होताना दिसत नाहीत.

राज्यांच्या सीमांवर माणसांची ये-जा रोखणं अवघड आहे. राज्याच्या सीमेवर अन्य राज्यातून येणाऱ्या प्रत्येक माणसाची चाचणी करणं, त्याचा माग ठेवणं अवघड आहे.

मोठ्या शहरात तसंच ठराविक हॉटस्पॉट परिसरात विषाणूचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. जेणेकरून हा विषाणू अन्य राज्यांमध्ये फैलावणार नाही, असं डॉ. जमील यांना वाटतं.

तसं घडलेलं नाही आणि आता कोरोना विषाणू बेबंद पद्धतीने फैलावला आहे असं ते सांगतात.

विषाणूच्या संसर्गाचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे एखाद्या माणसाला कोणाच्या माध्यमातून संसर्ग झाला हे शोधून काढणंही कठीण झालं आहे.

सरकारने स्वत: केलेल्या सर्वेक्षणानुसार, 40 टक्के लोकांना श्वसनाचा त्रास होता. त्यांना कोरोनाचा संसर्ग कसा झाला हे माहिती नाही याकडे डॉ. जमील लक्ष वेधू इच्छितात.

देशात कोरोनाचा संसर्ग कम्युनिटी ट्रान्समिशन टप्प्यात पोहोचला आहे याचे आपल्याकडे सबळ पुरावे आहेत असं डॉ. जमील सांगतात.

हे एका दिवसात घडलेलं नाही असं तज्ज्ञांना वाटतं. सरकार ही वस्तुस्थिती नाकारत असताना गेल्या काही आठवड्यांमध्ये हे घडलं आहे.

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात आपल्याकडे लोकल कम्युनिटी ट्रान्समिशन झालं होतं. मात्र आता ते संपूर्ण देशभर पसरलं आहे. हे सगळ्यांसमोर आहे असं डॉ. कुमार सांगतात.

हे वास्तव स्वीकारण्यास सरकार का तयार नाही?

सरकारने यासंदर्भात कुठलीही औपचारिक घोषणा केलेली नाही. कम्युनिटी ट्रान्समिशनची नेमकी व्याख्याही जनतेसमोर ठेवलेली नाही. तसं केलं असतं तर त्यांच्या म्हणण्याला ठाम आधार मिळाला असता.

देशात कोरोनाचा संसर्ग कम्युनिटी ट्रान्समिशन टप्प्यात पोहोचला आहे हे मान्य करणं म्हणजे राबवलेल्या योजना अपयशी ठरल्या असं चित्र निर्माण होईल म्हणून सरकार हे मान्य करायला तयार नाही असा पहिला कयास आहे.

कम्युनिटी ट्रान्समिशनसाठी सरकारला दोषी धरून चालणार नाही असं डॉ. जमील यांना वाटतं. माहितीच्या आधारे हे सत्य मांडायला हवं आणि शास्त्रानुसार ते सिद्ध व्हायला हवं.

भारतासारख्या प्रचंड लोकवस्तीच्या आणि दाटीवाटीने वसलेल्या देशात कोरोनासारख्या अतिशय संवेदनशील विषाणूचा प्रादुर्भाव कम्युनिटी ट्रान्समिशन टप्प्यात पोहोचणं स्वाभाविक आहे असं ते सांगतात.

हे मान्य न केल्याने व्यवस्थेवरचा ताण वाढतो आणि अनावश्यक चर्चांना खतपाणी घातलं जातं.

आता या विषयावर वाद घालण्यातही काही अर्थ नाही असं साथीच्या रोगांचे तज्ज्ञ डॉ. ललित कांत यांना वाटतं. त्यांनी सरकारचा भाग म्हणून कामही केलं आहे.

कम्युनिटी ट्रान्समिशन होतंय म्हणा किंवा नाही म्हणा, आपल्याला आपल्या योजना सतत सुधाराव्या लागतील असं त्यांना वाटतं.

भारत हा खंडप्राय देश आहे. एका राज्यात तुम्ही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखू शकता. पण दुसऱ्या राज्यात आकडे झपाट्याने वाढू शकतात. त्यामुळे मूलभूत पातळीवरचं वास्तव (ग्राऊंड रिअॅलिटी) समजून घेण्यासाठी आपल्याला या संकल्पनेच्या ठोस व्याख्येची आवश्यकता आहे.

कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढतो आहे आणि हे दुर्देवी आहे असं त्यांना वाटतं.

कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झालं आहे हे मान्य करण्यासाठी सरकारला योजनांमध्ये अमूलाग्र बदल करावे लागतील.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, कोरोनाचा प्रत्येक रुग्ण ओळखणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि क्वारंटीन हे मोठ्या प्रमाणावरील संसर्गाकरता अनिवार्य गोष्टी नाहीत.

याऐवजी आता देशांनी हा विषाणू भौगौलिकदृष्ट्या कसा पसरतो आहे हे डेटाच्या माध्यमातून टिपणं आणि त्यानुसार आरोग्यसेवा पुरवणं आवश्यक असल्याचं डॉ. कांत यांना वाटतं.

सरकारला याक्षणी धोरणात बदल दाखवायचा नाहीये असं डॉ. कांत यांना वाटतं.

कारण केंद्र आणि राज्यस्तरावर टेस्टिंग वाढवण्यासाठी अनेक महिने लागले. टेस्टिंगचे प्रोटोकॉल आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यासाठीही अनेक महिने गेले. देशाच्या विविध भागात कोरोनाचा प्रादुर्भाव विविध टप्प्यात आहे. त्यामुळे संपूर्ण देशासाठी एकच सर्वसमावेशक धोरण तयार करणं किंवा राबवणं अवघड आहे.

पण त्यामुळे कम्युनिटी ट्रान्समिशन झालेलं नाही असं म्हणत राहणं याचं समर्थन होऊ शकत नाही. प्रदीर्घकालीन धोरण काय आहे हे त्यांनी पक्कं करायला हवं. कम्युनिटी ट्रान्समिशनची व्याख्या काय हे स्पष्ट करायला हवं असं डॉ. पंत सांगतात.

जनतेला कोरोनाच्या स्थितीबद्दल जाणून घेण्याचा अधिकार आहे आणि सरकारने याबाबत पारदर्शक असणं अत्यंत आवश्यक आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)