You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : हाताची स्वच्छता करताना हँड सॅनिटायझर वापरणं घातक ठरतंय का?
कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी हाताची स्वच्छता अनिवार्य आहे. यासाठी आपण सगळेच जण हँड सॅनिटायझर्सचा वापर करतो आहोत. मात्र, अल्कोहोलचं प्रमाण असलेल्या या सॅनिटायझर्सचा वापर मानवासाठी घातक आहे का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या चार ते पाच महिन्यात कोरोना संकटामुळे प्रत्येकालाच हातांच्या स्वच्छतेचं महत्त्व कळलेलं आहे. कोरोना व्हायरस असलेल्या कोणत्याही वस्तूला किंवा पृष्ठभागाला हातांचा स्पर्श झाला आणि हात तोंडाला, नाकाला, डोळ्याला लागला तर आपल्याला कोरोनाची लागण होऊ शकते.
कोरोनाची लागण होऊ नये म्हणून अल्कोहोल असलेल्या हँड सॅनिटायझर्सचा वापर हातांच्या स्वच्छतेसाठी करण्याचा पुरस्कार WHO, अमेरिकेचं सेंटर फॉर डिसीझ कंट्रोल आणि भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही केला आहे.
'सॅनिटायझरचा अतिवापर टाळा'
साबण आणि पाण्याने 20 सेकंद हात धुतले तर हातावरचे किटाणू नष्ट होतात. परंतु, प्रत्येक ठिकाणी पाण्याची उपलब्धता नसल्याने साबणाने हात धुताच येतात असं नाही. अशावेळी कुठेही नेण्यास सोपं असलेल्या हँड सॅनिटायझर्सचा वापर करण्याच्या सूचना विविध आरोग्य यंत्रणांनी दिल्या आहेत.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
मात्र, आता भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला हँड सॅनिटायझरचा अतिवापर करणं टाळा असं सांगावं लागतंय.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयातले अतिरिक्त डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिस पदावर असलेले डॉ. आर. के. वर्मा यांनी म्हटलंय की, हँड सॅनिटायझर्सचा अतिवापर टाळा. ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलंय.
चार-पाच महिने सलग सॅनिटायझर्सचा वापर करून हातावर रॅशेस उठतील का?, सॅनिटायझर्सच्या वासाने डोकंदुखी होईल का? असे प्रश्न आता लोकांच्या मनातही उपस्थित होत आहेत. या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊयात.
सॅनिटायझरमुळे आग
सॅनिटायझर्समध्ये असलेला अल्कोहोल हा ज्वलनशील द्रव पदार्थ असतो. त्यामुळे त्याचा आगीशी संपर्क आला तर तो पेट घेऊ शकतो. नाशिकमध्ये रझियाबी शेख या 24 वर्षीय महिलेचा सॅनिटायझरमुळे लागलेल्या आगीत 27 जुलैला मृत्यू झाल्याची घटना घडली.
या महिलेकडील सॅनिटायझरचा मेणबत्तीशी संपर्क आल्याने घरात आग लागल्याचं स्पष्ट झालंय.
हात कोरडे होतात
हँड सॅनिटायझर्सच्या अतिवापराने हाताची त्वचा कोरडी पडत असल्याच्या तक्रारी सध्या येत आहेत. मुंबईतल्या त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अंजली घाटगे यांच्याशी आम्ही याबद्दल चर्चा केली.
डॉ. घाटगे सांगतात की, "अल्कोहोल हा हातावरची त्वचा पूर्णतः कोरडी करून टाकतो. यामुळे हाताला खाज सुटणे, त्वचा लाल होणे यासारखी लक्षणं दिसून येतात. तसंच, एक्झिमासारखे त्वचेचे आजार सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे होऊ शकतात. अशावेळी आम्ही लोकांना प्रथम हाताला मॉश्चरायझर लावण्याचा सल्ला देतो. तसंच, अल्कोहोल मुक्त सॅनिटायझर वापरायला सांगतो."
त्या पुढे सांगतात, "मुंबईत असे रुग्ण आमच्याकडे येत आहेत. केवळ सॅनिटायझरच नव्हे तर मास्क आणि ग्लोव्ह्जमुळे हातावर रॅशेस उठलेले रुग्ण येण्याचं प्रमाण वाढलं आहे."
सगळेच विषाणू सॅनिटायझर्सने मरत नाहीत
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीझ कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, हात स्वच्छ आणि विषाणू मुक्त करण्यासाठी साबण आणि पाण्याचा वापर हा अधिक योग्य आहे. कारण, साबणामुळे सर्व प्रकारचे विषाणू, जिवाणू मरतात.
मात्र, सॅनिटायझर सगळ्या जिवाणूंना हातावरून घालवतंच असं नाही. त्यामुळे वारंवार हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरऐवजी साबणाचा वापर करावा.
सुवासिक सॅनिटायझर्स टाळा
सेंटेड सॅनिटायझर हल्ली बाजारात मिळत आहेत. लोक अशा सॅनिटायझर्सकडे आकर्षित होत आहेत. त्याचा काही परिणाम मानवी त्वचेवर होतो का? हा प्रश्नही आम्ही डॉ. अंजली घाटगे यांना विचारला.
त्यावर त्या सांगतात की, "सुवास येणाऱ्या सॅनिटायझर्समध्ये रसायनांचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे आधीच अल्कोहोल आणि त्यात रसायनं यामुळे त्वचेवर परिणाम होऊ शकतो. अशावेळी अल्कोहोल मुक्त सॅनिटायझर वापरलेलाच चांगला."
फसवे सॅनिटायझर्स
WHO आणि अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीझ कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने सॅनिटायझर्समध्ये अल्कोहोलचं किती प्रमाण असावं याबद्दल माहिती दिलेली आहे. कोणत्याही सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचं कमीत-कमी प्रमाण 60 टक्के असावं तर जास्तीत-जास्त प्रमाण 60 ते 95 टक्के असावं.
60 टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात अल्कोहोल असलेले सॅनिटायझर्स हे परिणामकारक नसतात. त्यांचा वापराने हाताची स्वच्छता होऊ शकत नाही.
तसंच, अमेरिकन सरकारच्या FDA या संस्थेनं दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, मिथॅनोलचा वापर जर सॅनिटायझरमध्ये करण्यात आलेला असेल तर ते मानवी त्वचेसाठी, शरीरासाठी घातक आहे.
मिथॅनोल हा विषारी घटक असून याचा वापर असलेले सॅनिटायझर्स वापरल्यास मळमळ होणे, उलट्या होणे, डोकेदुखी, फिट येणे, काहीप्रसंगी कोमात जाणे यांसारखे गंभीर लक्षणं उद्धवू शकतात. अमेरिकेत यामुळे काहींचे मृत्यू देखील झाले आहेत.
जखमेला लागल्यास जळजळ
जर हाताला जखम झाली असेल तर सॅनिटायझरने हात स्वच्छ करणं टाळावं. कारण, हातावरच्या जखमेवर सॅनिटायझर लागलं तर हाताची चटकन जळजळ होते. कारण, त्यातला अल्कोहोल जखमेतून आत जातो. यावेळी अभिक्रिया झाल्याने जळजळ होते.
सॅनिटायझर पिऊ नये
सॅनिटायझर ही पिण्याची वस्तू नसली तरी ते पिण्याच्या घटना घडलेल्या आहेत. अल्कोहोल हा थेट पोटात गेल्यास तो शरीराला विषकारक ठरतो. त्यामुळे सॅनिटायझर्स केव्हाही लहान मुलांपासून लांब ठेवावेत.
लोकमतमध्ये आलेल्या वृत्तानुसार, नागपूरमध्ये गौतम बिस्वेन गोस्वामी या 45 वर्षीय व्यक्तीने दारुऐवजी सॅनिटायझर पिण्याची घटना घडली होती. काहीवेळानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
डॉ. अंजली घाटगे याबद्दल एकंदरच सांगतात की, "हँड सॅनिटायझरचा वापर हा साबण आणि पाण्याचा पर्याय उपलब्ध नसताना करणं अपेक्षित आहे. वारंवार सॅनिटायझर वापरणं टाळावं. साबणानेच हात धुवावेत किंवा अल्कोहोल मुक्त सॅनिटायझर वापरावा."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)