You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अलिबाबा आणि जॅक मा यांना सेन्सॉरशिपबद्दल गुरुग्राम न्यायालयाकडून समन्स
गुरुग्रामच्या न्यायालयाने बलाढ्य जागतिक कंपनी अलिबाबा आणि त्याचे संस्थापक जॅक मा यांना समन्स बजावलं आहे. सेन्सॉरशिप आणि फेक न्यूज संदर्भात कंपनीच्या एका माजी भारतीय कर्मचाऱ्याने कंपनीवर आरोप केले.
कंपनीच्या अॅपवर सेन्सॉरशिप आणि फेक न्यूजला विरोध करण्याचं कारण दाखवत कंपनीने काढून टाकल्याप्रकरणी या कर्मचाऱ्याने कंपनीविरोधात न्यायालयात दाद मागितली.
गुरुग्राम जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश सोनिया शेकाँद यांनी अलिबाबा कंपनी, संस्थापक जॅक मा आणि कंपनीच्या डझनभर अधिकाऱ्यांना समन्स बजावलं आहे. या सगळ्यांना महिनाभरात लिखित स्वरुपात उत्तर देणे बंधनकारक आहे.
29 जुलै रोजी स्वत: किंवा वकिलाच्या माध्यमातून सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
चीनला अनुकूल नाही असा मजकूर युसी ब्राऊजर, युसी न्यूजकडून सेन्सॉर केला जात असे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात खळबळ उडावी यासाठी फेक न्यूज पसरवल्या जात असत, असा आरोप पुष्पेंद्र सिंग परमार यांनी केला.
परमार हे युसी वेब कंपनीच्या गुरुग्राम इथल्या कार्यालयात असोसिएट डिरेक्टर पदावर ऑक्टोबर 2017 पर्यंत कार्यरत होते. त्यांनी 268, 000 अमेरिकन डॉलर्सची नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
दरम्यान भारतीय बाजारपेठ आणि स्थानिक कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमचं धोरण स्थानिक कायद्याला अनुसरून आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणासंदर्भात आम्ही कोणतंही भाष्य करू इच्छित नाही, असं युसी इंडियाने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)