You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे: 'लस आपल्या हातात येत नाही, तोपर्यंत कोरोनावर विजय मिळवणं अशक्य' #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. लस येईपर्यंत कोरोनावर विजय अशक्य - उद्धव ठाकरे
सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे कुणीही गाफील न राहता आवश्यक ती काळजी घ्यावी. लस आपल्या हातात येत नाही, तोपर्यंत कोरोनावर विजय मिळवणं अशक्य असल्याचं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नोंदवलं.
उस्मानाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र परिसरात उभारण्यात आलेल्या कोव्हिड-19 तपासणी केंद्राचं लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं. याप्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्राला कोरोनासंदर्भात सर्वोत्तम आरोग्य सुविधा देणारं राज्य बनवण्याचे आपले स्वप्न आहेत. सध्याच्या काळात आपण कितीही कोरोना तपासणी प्रयोगशाळा उघडल्या तरी त्या अपुऱ्या ठरू शकतील. त्यामुळे सध्यातरी कोरोनावरची लस येईपर्यंत सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे, मास्कचा वापर हे नियम आपल्याला कठोरपणे पाळावे लागतील, असं ठाकरे म्हणाले. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.
2. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको - अमित देशमुख
राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांचं वेळापत्रक विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलं आहे, पण सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा घेऊ नयेत. अनुकूल वातावरण निर्माण होताच या परीक्षा घेण्यात याव्यात, अशी सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना केली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रथम, द्वितीय तसेच तृतीय वर्षांच्या परीक्षा पुढील सूचने पर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात, या विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा, अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाला बाधा निर्माण होणार नाही यादृष्टीने अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची इंटर्नशिप सुरू करण्यात यावी, कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव कमी होताच या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात, याबाबत केंद्रीय मंडळाला कळवण्यात यावे, अशा सूचना अमित देशमुख यांनी केल्या आहेत. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
3. लष्करी सेवेत महिलांना पर्मनंट कमिशन
भारतीय लष्करात काम करत असलेल्या महिला अधिकाऱ्यांना पुरुषांच्या बरोबरीने पर्मनंट कमिशन देण्यात यावे, असा औपचारिक आदेश केंद्र सरकारने काढला आहे. त्यामुळे सैन्यदलातील महिलांच्या दृष्टीकोनातून हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचं सांगण्यात येत आहे.
महिलांना लष्करात पर्मनंट कमिशन देण्याचा आदेश सर्वप्रथम दिल्ली उच्च न्यायालयाने व नंतर सर्वोच्च न्यायालयानेही दिला होता. पण केंद्र सरकारने याबाबत सहा महिन्यांची वेळ मागितली. पण न्यायालयाने याचा आदेश काढण्यासाठी एका महिन्याची मुदत दिली होती.
- वाचा - युरेका! कोरोनावर प्रभावी औषध सापडलं, डेक्सामेथासोनकडून WHO ला पण आशा
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
या आदेशामुळे लष्कराच्या सर्व 10 शाखांमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनवर सेवेत दाखल होणाऱ्या महिलांना पर्मनंट कमिशन मिळू शकेल. आता त्यांना कमांड पद तसंच पेन्शन यांचाही लाभ मिळू शकतो, असा या आदेशाचा अर्थ आहे. ही बातमी लोकमतने दिली आहे.
4. RBI कर्ज घेऊन मोदी सरकारला किती दिवस उधार देणार - रघुराम राजन
नोटाबंदीसह कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला जबर फटका बसला आहे, अशा स्थितीत RBI मोदी सरकारला किती दिवस पैसे पुरवणार, असा सवाल RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केला आहे. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.
सिंगापूर येथील एका कार्यक्रमात रघुराम राजन बोलत होते. रेपो रेट कमी करुन कर्ज स्वस्त करण्यात येत आहे. परंतु सध्या नोकरी आणि कंपन्यांची परिस्थिती वाईट आहे. कोणाही रिस्क घेऊन कर्ज काढणार नाही. अशा परिस्थितीत बँका त्यांचे पैसे रिझर्व्ह बँकेत जमा करीत आहेत. त्यांना जे व्याज मिळतं त्यालाच रिव्हर्स रेपो रेट म्हटलं जातं. रिझर्व्ह बँक हे पैसे सरकारला उधार म्हणून देत आहेत, असं राजन यांचं मत आहे.
दरम्यान, 2019-20 या आर्थिक वर्षात देशातल्या 18 सरकारी बँकांची 1 लाख 48 हजार कोटींची फसवणूक झाल्याची माहिती RBI ने दिली आहे. यात सर्वाधिक फटका स्टेट बँक ऑफ इंडियाला बसला असून त्यांची 44 हजार 612 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. ही बातमी ई-सकाळने दिली.
5. झारखंडमध्ये मास्क न वापरल्यास एक लाखांचा दंड
कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे झारखंडमध्ये कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. झारखंडच्या मंत्रिमंडळाने बुधवारी झारखंड संसर्गजन्य रोग अध्यादेशाला मंजुरी दिली. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणे, थुंकणे, कोव्हिड-19 च्या प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन न करणे, या प्रकरणी 1 लाख रुपयांपर्यंतचा दंड व 2 वर्षांपर्यंतची कैद अशा शिक्षेची तरतूद आहे.
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, झारखंडमध्ये बुधवारी कोव्हिड-19 ची 439 नवी प्रकरणे आढळली आणि आणखी 3 लोकांचा या रोगामुळे मृत्यू ओढवला. राज्यात आतापर्यंत 64 लोक करोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत, तर करोनाबाधितांची संख्या 6682 पर्यंत पोहचली आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)