कोरोना: दिल्लीतल्या 40 लाख लोकांना कोरोना झाल्याची शक्यता

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

दिल्लीमध्ये कोरोनासंबंधी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. सरकारनं केलेल्या सर्वेक्षणानुसार रक्ताचे नमुने घेतलेल्या 21 हजार 367 जणांपैकी 23.48 टक्के लोकांना कोरोना होऊन गेल्याचं दिसून आलं.

या सर्व लोकांमध्ये कोव्हिड-19 च्या अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत.

दिल्लीमध्ये या अहवालात निदान झालेल्या रुग्ण संख्येपेक्षाही जास्त प्रमाणात रुग्ण संख्या असू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दिल्लीत आतापर्यंत 1 लाख 23 हजार 747 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हा आकडा दिल्लीच्या 1 कोटी 98 लाख लोकसंख्येच्या तुलनेत 1 टक्क्यापेक्षा कमी आहे.

टक्केवारीनुसार पाहायला गेलं तर 23.48 टक्क्यांनुसार दिल्लीतल्या कोरोनाबाधितांची संख्या 40 लाख 65 हजारांपर्यंत असायला हवी. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये लक्षणं नसलेल्यांची संख्या मोठी असल्यामुळे रुग्णसंख्येबाबत ही तफावत दिसत असल्याचं सरकारनं आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

दिल्लीतल्या अनेक भागांमधील दाटवस्ती पाहता 23.48 टक्क्यांचं प्रमाणही कमी असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. याचाच अर्थ कोरोनाबाधितांची संख्या अजून वाढू शकते. त्यामुळे अजूनही खबरदारीच्या उपायांची कठोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी असंही या अहवालात नमूद करण्यात आलंय.

तज्ज्ञांच्या मते भारतात अशा प्रकारचं सर्वेक्षण पहिल्यांदाच करण्यात आलं असून यामुळे कोरोनाचा फैलाव किती झालाय हे समजून घेण्यास प्रशासनाला मदत होणार आहे.

या सर्वेक्षणामुळे चाचण्यांसंबंधीच्या सुविधा उभारण्यास दिशा मिळणार असून विभागनिहाय कंटेन्मेंटबाबत धोरण ठरवण्यातही मोठी मदत होणार आहे.

दिल्ली हे देशातलं सर्वाधिक कोरोनाचा फैलाव झालेलं शहर ठरलं असून जूनच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयांमध्ये खाटांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता.

मात्र त्यानंतर रुग्णालयांच्या सुविधांमध्ये वाढ झाली असून बाधितांचा दैनंदिन आकडाही खाली आलाय.

गेल्या दोन आठवड्यांपासून दिल्लीत दररोज 1 हजार 200 ते एक हजार 600 कोरोनाबाधित आढळून येत आहेत. जून महिन्यातल्या अखेरच्या आठवड्याच्या तुलनेत हा आकडा निम्म्यावर आलाय.

सोमवारी (20 जुलै) ही संख्या हजाराच्या खाली म्हणजे 954 वर आली. वाढत्या चाचण्या, संपर्कातल्या लोकाचा शोध, कंटेन्मेंट आणि विलगीकरणाच्या धोरणामुळे रुग्णसंख्येत कमालीची घट झाल्याची शक्यता आहे. दिल्लीतला मृत्यूदरही कमी झाल्याचं निदर्शनास आलंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)