You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लॉकडाऊनचे फेज संपले, जिम-मॉल सुरू करण्याचा विचार - राजेश टोपे
महाराष्ट्रात पुन्हा जिम, शॉपिंग मॉल सुरु करण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. मात्र, लोकल ट्रेन सुरु करण्याचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा असेल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासंदर्भात केंद्र सरकारची भूमिकाही महत्त्वाची आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मिशन बिगिन अंतर्गत अनेक उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. जिम आणि शॉपिंग मॉल सुरू करण्यासंदर्भात सरकार विचार करत आहे. जिम हे जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेचं आहे. त्यामुळे यावर विचार केला जाईल, असं त्यांनी सांगितलं.
लॉकडाऊनचे फेजेस संपले. आता आपण हळूहळू सर्व नियम शिथिल करतोय. येणाऱ्या काळात मॉल सुरू करावे लागतील. पण धार्मिक कार्यक्रम, राजकीय मेळावे हे इतक्या लवकर सुरू होणार नाहीत.
ज्या गोष्टी सुरू करायच्यात त्याला सोशल डिस्टन्सिंग हा मंत्र लक्षात ठेवून सुरू करावं लागेल त्याच्या एसओपी जारी केल्या जातील.
- वाचा - युरेका! कोरोनावर प्रभावी औषध सापडलं, डेक्सामेथासोनकडून WHO ला पण आशा
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
मुंबईत लोकल रेल्वे सुरू करण्याची मागणी रास्त आहे. मात्र ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ट्रेन सुरू करायच्या की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असं टोपे यांनी स्पष्ट केलं.
मुंबईप्रमाणे पुण्यातही मिशन झिरो प्रकल्प राबवण्यात येणार आहे. अक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी करणं, बेडची संख्या वाढवणं, आयसोलेशन करणं, टेस्ट करणं या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी करण्यात येईल.
सिंगल पॉइंट कॉन्टॅक्ट प्रणाली तयार करण्यात येईल. जेणेकरून एकाच ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध होईल असं टोपे यांनी सांगितलं.
विरोधीपक्षाने काम करावं. चांगल्या सूचना द्याव्यात. मात्र राजकारण करू नये. २०१६-१९ या काळात त्यांनी काही जीआर काढले. त्यांची आठवण करून दिली तर काही ठिकाणी तर काही गैर नाही. आमचा हेतू त्यांना काही गोष्टी समजू नयेत असा अजिबात नाही, असंही टोपे यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रात नेहमीच टेस्टींग मोठ्या प्रमाणावर होत आहे. टेस्टींग वाढवल्यानेच खरा आकडा कळतोय. सर्व यंत्रणा पारदर्शक आहे. महाराष्ट्राचा विचार करताना गुजरात, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात किती टेस्ट करतात याचादेखील विचार करायला हवा असंसुद्धा ते म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)