गटारी अमावस्या : ‘मटणाचा घमघमाट आणि मित्रांच्या गप्पा... जुन्या दिवसांच्या फक्त आठवणीच’

मटणाचा घमघमाट

फोटो स्रोत, BBC/SwatiPatil

    • Author, हर्षल आकुडे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

रविवार आणि गटारी अमावस्या जोडून येणं म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच. यंदाच्या वर्षी हा योग जुळून आला मात्र, कोरोनाची साथ आणि लॉकडाऊन यांच्यामुळे नागरिकांचा भ्रमनिरास झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

आषाढ अमावस्येला दीप अमावस्या असंही संबोधलं जातं. श्रावण महिन्यात अनेक जण मांसाहार करत नाहीत. त्यामुळे मांसाहार करण्याची हौस या दिवशी पूर्ण केली जाते.

आषाढ अमावस्येला नेमकं काय म्हणून संबोधलं जावं, याबाबत अनेक वादविवाद असले तरी यादिवशी बऱ्याच ठिकाणी मटण, चिकन, मासे यांची मेजवानी होते. याशिवाय, मित्रमंडळी एखाद्या मित्राचं शेत किंवा एखादं पर्यटन क्षेत्र गाठून तिथं जेवणाचा सगळा बेत आखतात.

पण कोरोनामुळे ही सगळी लगबग यंदाच्या वर्षी दिसून आली नाही. सोशल डिस्टन्सिंग आणि इतर निर्बंधांमुळे नागरिकांच्या उत्साहावर विरजणच पडल्याचं पाहायला मिळालं.

हॉटेल बंद, कामगार घरी

कोरोना लॉकडाऊनमुळे पुण्यातल्या हॉटेल व्यावसायिकांना गटारी अमावस्येच्या दिवशीही आपलं हॉटेल उघडता आलं नाही. परिणामी, त्यांना प्रचंड नुकसान सहन करावं लागलं आहे.

पुण्याच्या फर्ग्यूसन रोडवर 'सुर्वेज प्यूअर नॉनव्हेज' नामक हॉटेल आहे. पुण्यात शिक्षण घेणारे विद्यार्थी, स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि इतर नागरिकांची इथं नेहमीच गर्दी असते.

पण यंदा गटारीच्या दिवशीही हॉटेल बंद ठेवण्याची वेळ सुर्वे यांच्यावर आली.

सुर्वेज प्यूअर नॉनव्हेजचे मालक माधवराज सुर्वे सांगतात, "आमच्या हॉटेलच्या चार शाखा पुण्यात आहेत. गेल्या वर्षी गटारीच्या दिवशी सर्व शाखांमध्ये मिळून जवळपास 700 किलो मांसाहारी पदार्थ आम्ही विकले होते. पण यंदाच्या वर्षी आमचं दुकान लॉकडाऊनमुळे पूर्णपणे बंद आहे."

चिकन

फोटो स्रोत, Getty Images

माधवराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुर्वेज हॉटेलच्या चार शाखांमध्ये पूर्वी 270 कामगार काम करायचे. पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेशसह इतर राज्यातील लोक त्यांच्या हॉटेलमध्ये काम करायचे. पण कोरोनामुळे अनेक कामगार आपापल्या गावी निघून गेलेत.

व्हीडिओ कॅप्शन, तुमच्या आहारामुळे हवामानात होतोय बदल? - पाहा व्हीडिओ

"सध्या फक्त 45 कामगार याठिकाणी उरले असून लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर फक्त इतक्याच मनुष्यबळासह काम सुरू होतं. पार्सल देण्याची परवानगी असताना हॉटेलने फक्त 20 टक्के व्यवसाय केला," असं माधवराज यांनी म्हटलं.

मटण विक्रीत घट

लॉकडाऊनमध्ये तीन महिने घालवल्यानंतर जून-जुलैपासून अनलॉकच्या प्रक्रियेस सुरुवात झाली होती. पण कोरोना व्हायरसचा प्रसार वाढल्याचं निदर्शनास आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन घोषित केला.

मटणासाठीची रांग

फोटो स्रोत, DGIPR

श्रावण महिना तोंडावर आलेला असतानाच ठाणे, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद यांच्यासारख्या प्रमुख शहरांमध्ये पुन्हा कठोर निर्बंध लावण्यात आले. त्या सर्वांचा थेट फटका इतर व्यावसायिकांप्रमाणेच मटण विक्रेत्यांनाही बसला आहे.

कोल्हापूरच्या मटण विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विजय कांबळे यांच्याशी बीबीसीने बातचीत केली.

लॉकडाऊनचा मटण विक्री व्यवसाय करणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याची माहिती कांबळे यांनी दिली.

ते सांगतात, "महाराष्ट्रात बकऱ्यांच्या 100 ते 125 बाजारपेठा आहेत. त्यामध्ये मुंबई, चाकण, लातूर, कराड, आटपाडी आणि जत इथल्या बाजारपेठा मोठ्या मानल्या जातात. पण लॉकडाऊन हळूहळू उठवण्यात येत असताना मटण दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात आली तरी या बाजारपेठा मात्र अजूनही बंद आहेत. यामुळे मालाची टंचाई जाणवत आहे."

राज्यभर अनलॉक होत असतानाच काही शहरांमध्ये पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला. शिवाय जिल्हाबंदीही कायम आहे. त्यामुळे या सर्वांचा परिणाम मटण विक्री व्यवसायावर झाल्याचं कांबळे सांगतात.

मटण विक्रीसाठी माल आणणं अत्यंत जिकिरीचं बनलं आहे. शिवाय, माल आणण्यासाठी ई-पास मिळवणं, बाजार बंद असल्यामुळे खेड्यात जाऊन बोकड विक्रेते शोधणं, ही प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक बनली आहे. त्यामुळे नाईलाजाने मटणाच्या दरामध्ये वाढ करावी लागल्याची माहिती कांबळे यांनी दिली.

सध्या कोल्हापुरात मटण 600-650 रुपये प्रतिकिलो तर चिकन 200-250 रुपये प्रतिकिलो दराने विकलं जात आहे. राज्यात विविध भागातही याच्याच जवळपास दर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दर 50 रुपयांनी जास्त आहे.

कांबळे यांच्या मते, "एकट्या कोल्हापुरातच मटण विक्री व्यवसाय एका दिवसात एक-दोन कोटींपर्यंतची उलाढाल या दिवशी व्हायची, पण यंदा हे चित्र दिसून आलं नाही."

'घरच्या घरी गटारी'

कराडमध्ये मसूर गावात राहणारे विशाल जाधव आपल्या गावातच हार्डवेअरचा व्यवसाय करतात. ते यंदाची गटारी घरच्या घरीच साजरी करणार आहेत.

आतापर्यंत दरवर्षी विशाल आपली मित्रमंडळी आणि कामगार वर्गासोबत मिळून हा दिवस साजरा करायचे. पण आता इथून पुढे मित्रांसोबत एकत्र येऊन गटारी साजरी करता येईल किंवा नाही, याबाबत त्यांना शंका वाटते.

ते सांगतात, "दरवर्षी एखाद्या मित्राचं शेत ठरवून आम्ही गटारीचा बेत आखायचो. त्यासाठी एक दिवस आधीपासूनच तयारी केली जायची. कोण कुठलं काम करेल याची जबाबदारी दिली जायची. मटणाचा घमघमीत सुगंध, मित्रांच्या गप्पा यांचा एक वेगळाच माहौल होता."

"पण कोरोनामुळे हा आनंद यावर्षी घेता आला नाही. यावर्षी घरच्या घरी गटारी साजरी करण्याचा निर्णय घेतला. भविष्यातही लोकांच्या एकत्रित येण्यावर मर्यादा असतील, अशा स्थितीत कोरोनापूर्वीच्या काळातील जुने दिवस फक्त आठवणीच बनून राहणार आहेत," असं विशाल यांना वाटतं.

'गटारी नव्हे दिव्याची अमावास्या'

आषाढ अमावस्येला काही लोक गटारी अमावस्या संबोधतात. तर काहींच्या मते ही दीप अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या आहे. गटारी अमावस्येबाबत पार्टीची तयारी करण्याबाबतचे मॅसेज, व्हीडिओ किंवा मीम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतं.

यासोबतच गटारी अमावस्या म्हणणं कशा प्रकारे चुकीचं आहे, अशा आशयाचे मॅसेजही व्हॉट्सअॅपवर हमखास फॉरवर्ड केले जातात. त्यामुळे दरवर्षी हा दिवस जवळ आला की सोशल मीडियावर चांगलेच वादविवाद रंगू लागतात.

खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनाही आषाढी अमावस्येला गटारी अमावस्या संबोधणं चुकीचं वाटतं.

त्यांच्या मते, "आषाढ अमावास्येला 'दिव्याची अमावास्या' असे म्हणतात. कारण, या दिवशी घरातील दिवे घासून-पुसून एकत्र मांडले जातात. त्यांची पूजा करण्यात येते. प्राचीनकाळी विद्युत दिवे नव्हते. दरम्यान, आषाढपासून पावसाळ्याची सुरुवात होते. या कालावधीत घरात जास्त अंधार होतो. त्यामुळे घरातील दिवे सुस्थितीत असावेत, त्यांची देखभाल केली जावी हे दीपअमावस्या साजरी करण्याचं कारण असू शकतं."

आषाढ अमावास्येनंतर श्रावण सुरू होतो. काहींच्या मते, या महिन्यात मांसाहार किंवा मद्यपान करणं वर्ज्य असल्याचं मानलं जातं. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आषाढी अमावस्येचं नामकरण गटारी अमावस्या म्हणून गेल्या काही वर्षांमध्येच झालं आहे. याला कोणताही ऐतिहासिक दाखला नाही, असं सोमण यांना वाटतं.

ते सांगतात, "महिनाभर मांसाहार करण्यास मिळणार नसल्यामुळे मांसाहारी लोक आषाढ अमावास्येलाच यथेच्छ मांसाहार करतात. मद्यप्राशन करणारे मद्यपानही करून घेतात. या दिवशी अतिमद्यपान केल्याने काहीजण रस्त्यावर पडतात. या व्यंगातून गंमत म्हणून या दिवसाला गटारी अमावास्या' म्हणण्याचा प्रघात पडलेला असू शकतो."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)