कोरोना: प्लाझ्माचा काळाबाजार, अव्वाच्या सव्वा किमतीला होतेय प्लाझ्माची विक्री

Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

वेगवेगळ्या शहरातले हॉस्पिटल्स, ब्लड बँक आणि नातेवाईकांना फोन करून आता वैभव आणि त्यांच्या पत्नी सुकन्या यांच्या हाताची बोटं दुखायला लागली आहेत. रात्र-रात्र झोप लागत नाही. त्यामुळे दोघांचेही चेहरे काळवंडलेत. गेल्या तीन दिवसांपासून हे दोघं फक्त आणि फक्त एकच काम करत आहेत.

वैभवचे वडील विकासचंद अग्रवाल यांच्यासाठी कुठूनतरी AB+ ग्रुपच्या प्लाझ्माची व्यवस्था होते का, यासाठी प्रयत्न करणं. तीन दिवस प्रयत्न करूनही कुठूनही प्लाझ्मा मिळाला नाही.

आग्र्यातल्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या विकासचंद अग्रवाल यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळतेय. तर दुसरीकडे वैभव यांची काळजी आणि चिंता इतकी वाढली आहे की आता ते प्लाझ्मासाठी काहीही करायला तयार आहेत.

प्लाझ्मा मिळवण्यासाठी जीवाचं रान करणारे वैभव एकटे नाहीत. गुरुवारी प्लाझ्मा मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या दोघांचा आम्हाला फोन आला होता.

'ढूंढ' ही प्लाझ्मा मॅचमेकिंग संस्था आहे. ही संस्था डोनर आणि रिसिव्हर यांना एकत्र आणते. या संस्थेच्या वेबसाईटवर रोज डझनभर लोक नोंदणी करत आहेत.

ज्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊन ती व्यक्ती त्यातून पूर्णपणे बरी झाली आहे, अशा व्यक्तीच्या रक्तातला प्लाझ्मा इतर कोरोनाग्रस्त रुग्णाला दिल्यास त्याच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असल्याचं आढळलं आहे.

लंडनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारे आणि 'ढूंढ' या संस्थेचे पार्टनर मुकूल पहावा सांगतात त्यांच्या वेबसाईटवर 'रिसिव्हर म्हणजे ज्यांना प्लाझ्मा हवाय' अशांची संख्या 'डोनर म्हणजे प्लाझ्मा देणाऱ्यांपेक्षा' कितीतरी जास्त आहे.

इतर वस्तूंच्या तुटवड्यात जी परिस्थिती बघायला मिळते तशीच परिस्थिती प्लाझ्माबाबतही दिसतेय. गरजवंताला प्लाझ्मासाठी अव्वाच्या-सव्वा किंमत मोजावी लागतेय.

एक युनिट म्हणजेच 525 मिलीलीटर प्लाझ्मासाठी 25 ते 30 हजार रुपये किंमत आकारली जात आहे. बऱ्याच ठिकाणी प्लाझ्माच्या व्यवहारासाठी डार्क-वेबची मदत घेतली जात असल्याचीही चर्चा आहे.

काही वृत्तपत्रांनी तर डोनरला पैसे देण्यासोबतच दुसऱ्या शहरात त्याच्या जाण्या-येण्याचा खर्च उचलावा लागत असल्याचंही म्हटलं आहे. असं असूनही सर्वांनाच प्लाझ्मा मिळतोय, असं नाही.

काही लोक प्लाझ्माच्या नावाखाली फसवणूक करत असल्याचं आणि काही लोकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळण्यात आल्याचा इशारा काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला होता.

प्लाझ्मा थेरपी ही काही कोव्हिड-19 आजारावरचा उपचार नाही. मात्र, आजारातून पूर्णपणे बरी झालेल्या व्यक्तीच्या शरीरातला प्लाझ्मा दिल्याने कोरोनाग्रस्ताच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं दिसतं आणि म्हणूनच प्लाझ्माची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं.

प्लाझ्माचं महत्त्व लक्षात घेता काही दिवसांपूर्वी कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांनी प्लाझ्मा डोनरला 5 हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्याची घोषणा केली होती.

प्लाझ्माचा तुटवडा का आहे?

'नॅशनल ब्लड ट्रान्सफ्युजन काउंसील' ही संस्था रक्त, प्लेटलेट्स, प्लाझ्मा अशा रक्तघटकाशी संबंधित बाबींचं नियमन करणारी संस्था आहे. या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार एक युनिट प्लाझ्मासाठी 400 रुपये घेतले जाऊ शकतात.

अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेजमध्ये कम्युनिटी मेडिसिन्सचे प्राध्यापक नफिस फैजी म्हणतात, "प्लाझ्माचा तुटवडा आहे. याचं एक मोठं कारण पॅथॉलॉजी लॅब, कलेक्शन-प्रिजर्वेशनच्या सोयी अशा मुलभूत सुविधांची वानवा आहे. दुसरं कारण म्हणजे लोकांमध्ये रक्तदान, अवयवदान याविषयी फारशी माहिती नाही आणि त्याची भीतीही आहे."

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था 'जनस्वास्थ्य अभियान'चे डॉक्टर गार्गेया तेलकापल्ली यांच्याशी आम्ही बातचीत केली. या परिस्थितीसाठी संपूर्णपणे सरकार जबाबदार आहे, असं त्यांना वाटत नाही. ते म्हणतात, "प्लाझ्मा दान करणाऱ्यांमध्ये एक अशीही भीती आहे की उद्या मला पुन्हा कोरोना विषाणूची लागण झाली तर माझं काय होईल?"

प्लाझ्मा थेरपीवर अजूनही संशोधन सुरू आहे आणि सध्या जे निष्कर्ष येत आहेत, ते अंतिम मानले जाऊ शकत नाही. मात्र, काही प्रतिष्ठित परदेशी वृत्तपत्रांमध्ये अशा आशयाच्या बातम्या छापून आल्या आहेत की कोव्हिड-19 संसर्गानंतर शरीरात जी रोगप्रतिकार शक्ती तयार होते, ज्याला अँटीबॉडीज म्हणतात, त्या अँटीबॉडीज तीन महिन्यांनंतर संपतात.

कोव्हिड-19 आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या लोकांना पुन्हा संसर्गाची लागण झाल्याचीही अनेक उदाहरणं आहेत.

आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णाच्या रक्तातला प्लाझ्मा काढून तो आजारी व्यक्तीच्या शरीरात टाकणं, याला 'क्वॉन्व्हेलेसंट प्लाझ्मा थेरपी' म्हणतात.

आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात तयार झालेली रोगप्रतिकार शक्ती आजारी व्यक्तीच्या शरीरात टाकल्यास आजारी व्यक्तीमध्ये त्या अँटीबॉडीज तयार होऊन त्याचाही आजार बरा होतो, या धारणेवर प्लाझ्मा थेरपी आधारलेली आहे.

कोव्हिड-19 साथीपूर्वी सार्स, मर्स आणि एच1एन1 या साथीच्या रोगांमध्येही प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला होता.

लॅब, ब्लड बँक, आवश्यक औषधांचा पुरवठा आणि सर्व मोठ्या हॉस्पिटल्समध्ये कोव्हिड-19 च्या उपचारांवर योग्य पद्धतीने लक्ष दिलं गेलं असतं तर आज ही परिस्थितीच निर्माण झाली नसती, असं आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक तज्ज्ञांना वाटतं.

गेल्या काही दिवसा प्लाझ्माची मागणी वाढली

अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेजमध्ये प्लाझ्मा थेरपीसाठीच्या सर्व सोयी उपलब्ध नाहीत. येत्या काही दिवसात प्लाझ्मा थेरपी सुरू होऊ शकेल.

काही वर्तमानपत्रातल्या वृत्तांनुसार बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेजमध्ये गेल्याच आठवड्यात प्लाझ्मा थेरपी सुरू झाली आहे. लखनौमधल्या केजीएमयूमध्ये प्लाझ्मा थेरपी सुरळित सुरू आहे. मात्र, डोनर मिळत नसल्याची एसजीपीजीआयची तक्रार आहे.

राजधानी दिल्लीत गेल्याच आठवड्यात लोकनायक जयप्रकाश हॉस्पिटलमध्ये दुसरी प्लाझ्मा बँक सुरू करण्यात आली आहे. वसंतकुंजमधल्या आयएलबीएसमध्ये गेल्या महिन्यातच पहिली प्लाझ्मा बँक सुरू करण्यात आली होती.

डॉ. गार्गेया तेलकापल्ली म्हणतात, "लोकांना हे समजण्याची गरज आहे की ते जे रक्त किंवा प्लाझ्मा दान करतात त्यातून अतिशय आजारी किंवा मरणाला टेकलेल्या रुग्णाला जीवनदान मिळू शकतं. म्हणजेच कामाचा एंड रिजल्ट काय असणार आहे, याविषयी जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे. मात्र, आज अशी परिस्थिती आहे की आपण आपल्या हॉस्पिटल्समधल्या ब्लड बँक सुरळित चालवू शकत नाही आणि सरकार तर दिवसेंदिवस आरोग्यासाठीचा निधी कमी करतंय."

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्याच आठवड्यात हॉस्पिटल्सना आवाहन केलं आहे की तुमच्या हॉस्पिटलमध्ये कोव्हिड-19 आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याविषयी माहिती द्या. प्लाझ्माची मागणी गेल्या काही दिवसात वेगाने वाढल्याचंही त्यांनी सांगितलं.

आतापर्यंत कोव्हिड-19 च्या उपचारांमध्ये ज्या चार-पाच गोष्टी चांगले रिझल्ट्स देत आहेत त्यात प्लाझ्मा थेरपीचाही समावेश आहे. त्यामुळे त्याची मागणी वाढणं स्वाभाविक आहे.

अशा परिस्थितीत अद्वितीय मल्ल यांना जेव्हा प्लाझ्माची गरज होती तेव्हा देणारे त्यांच्याकडून मोठ्या रकमेची मागणी करत होते.

याच मल्ल यांनी मुकूल पहावा या त्यांच्या मित्रासोबत मिळून 'ढूंढ' संस्था स्थापन केली आहे. लोकांना स्वस्त किंमतीत आणि लवकरात लवकर प्लाझ्मा मिळावा, यासाठी ही संस्था प्रयत्न करते.

तुटवड्यामुळे प्लाझ्माचा काळाबाजार

मुकूल पहावा सांगतात, "देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक त्यांच्याशी संपर्क साधत आहेत. जवळपास महिनाभरापूर्वीच त्यांनी ही संस्था सुरू केली आणि सुरुवातीला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून लोकांनी प्लाझा दान करण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं."

मात्र, ही कंपनी डोनर आणि रिसिव्हर यांना समोरासमोर आणतात. पुढची सगळी प्रक्रिया त्या दोघांनाच करायची असते. प्लाझ्माचा तुटवडा बघता अशा प्रकारे डोनर मिळाल्यावर आर्थिक व्यवहार होणंही स्वाभाविक आहे.

महाराष्ट्राच्या कोव्हिड-19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. ओम श्रीवास्तव यांनीही दोन दिवसांपूर्वी असाच उपक्रम 'प्राण' नावाने सुरू केला आहे. त्यांच्या सहकारी डॉ. मारिया निगम सांगतात की या पायलट प्रोजेक्टचे प्रोटोकॉल्स आणि इतर बाबींवर सध्या काम सुरू आहे.

डॉ. नफीस फैजी सांगतात की कुठलीही नवीन थेरपी आली की तिची किंमत आणि अशा प्रकारच्या गोष्टी (आर्थिक व्यवहार) चालतात. शिवाय, अशा गैरव्यवहारांवर आळा घालणाऱ्या संस्थाच दुबळ्या असतात तेव्हा त्यांना आळा घालणं आणखी अवघड असतं.

आरोग्य क्षेत्रात अशी कुठली गोष्ट आहे जिचा काळाबाजार सुरू नाही आणि ज्यांना कोव्हिड-19 आजार आहे, ते तर इतके हताश झालेले असतात की काहीही करायला तयार होतात, असं म्हणणं आहे स्वयंसेवी आरोग्य कर्मचारी आशा मिश्रा यांचं.

कोव्हिड-19 आजारावरचं रेमडेसिविअर औषधाचीसुद्धा तिप्पट-चौपट किमतीने विक्री होत आहे.

कोव्हिड-19 च्या उपचारांसाठी खाजगी हॉस्पिटल्स लाखो रुपयांची बिल लावत असल्याच्या बातम्यांनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंबंधीची रेट लिस्ट प्रसिद्ध केली होती. मात्र, तरीही परिस्थिती फारशी सुधारलेली नाही.

राष्ट्रीय ब्लड पॉलिसीनुसार ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट 1940 अंतर्गत रक्त औषधाच्या श्रेणीत ठेवण्यात आलं आहे आणि रक्ताची बेकायदा खरेदी-विक्री करणाऱ्याला 2 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)