You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आसाम पूर: काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील दुर्मीळ प्रजातीच्या 8 गेंड्यांचा पुरामध्ये मृत्यू
नुकताच आलेल्या पुरामध्ये आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील अनेक प्राण्यांचं निधन झाल्याचं वृत्त आहे. या पुरामध्ये किमान 8 गेंडे मृत्युमुखी पडल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात एकशिंगी गेंड्यांची दुर्मीळ प्रजाती आढळते. ही प्रजाती नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहे. अशा परिस्थितीमध्ये आठ गेंडे मृत्युमुखी पडण्याची घटना घडली आहे.
अभयारण्यात असलेल्या इतर गेंड्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
आसाममध्ये आलेल्या पुरामुळे 85 टक्के काझीरंगा राष्ट्रीय उद्यान पाण्याखाली आले आहे. या पुरात आसाममधील 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
आसाममध्ये मुसळधार पावसाने पुराचा हाहाकार सुरू आहे. पुरामुळे सुमारे 20 लाख नागरिकांना फटका बसला असून 50 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
नुकतेच आसामच्या एका मंत्र्यांचा व्हीडिओ समोर आला होता. यामध्ये ते लोकांना वाचवण्यासाठी गढूळ पाण्यात फिरताना दिसत आहे. या व्हीडिओमधून आसामची परिस्थिती समजून घेता येईल.
मुसळधार पावसाने हजारो गावे पाण्याखाली गेली आहेत. तर विस्थापित नागरिकांना आश्रय देण्यासाठी मदतकेंद्र उभे करण्यात आले आहेत.
आसाममध्ये पूर येणं ही काय नवीन गोष्ट नाही. पण सध्या कोरोना व्हायरसविरुद्ध लढाई सुरू असताना पुरामुळे ही परिस्थिती आणखीनच बिकट बनल्याचं दिसत आहे.
मंत्री मृणाल सैकिया यांचा दोन मुले आणि एका महिलेला वाचवतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये पुरात अडकलेल्यांच्या मदतीसाठी मंत्री सैकिया एका बोटीतून जात आहेत.
माझ्या मतदारसंघातील बिकट अवस्था, या ओळीसह त्यांनी संबंधित व्हीडिओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला होता.
पूरप्रवण क्षेत्रातील लोकांसाठी मदतकार्य अजूनही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
मंत्री सैकिया यांनी रविवारी आणखी एक व्हीडिओ शेअर केला. यामध्ये ते बकऱ्यांना वाचवताना दिसत आहेत.
युनेस्कोने जागतिक संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या आसामच्या काझिरंगा राष्ट्रीय अभयारण्यालाही पुराचा जोरदार फटका बसला आहे. मंगळवारी हे संपूर्ण क्षेत्र पाण्याखाली गेलं. यामध्ये किमान 51 प्राण्यांची जिवीतहानी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी 102 प्राण्यांना पुरातून सोडवलं असून काही वाघ आणि गेंडे अजूनही पुरात अडकल्याचं सांगितलं जात आहे. काही प्राणी पुरातून वाचण्यासाठी शेजारच्या गावांमध्ये प्रवेश करत आहेत.
काझिरंगा अभयारण्यात जगातील दोन तृतीयांश एक शिंगाचे गेंडे आढळून येतात.
स्थानिक माध्यमांमधील बातम्यांनुसार, पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी राज्यात 100 बोटी तैनात करण्यात आल्या आहेत.
शिवाय, राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये 480 मदतकेंद्र उभारण्यात आले आहेत. यामध्ये सुमारे 60 हजार लोकांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था प्रशासनाने केली आहे.
राज्यात सध्या तरी सर्वत्र पाण्याचंच साम्राज्य दिसून येत आहे. आसाममधील नागरिकांना दरवर्षी अतिवृष्टीमुळे महापुराचा सामना करावा लागतो.
पावसाळ्याच्या दिवसांत पूर तसंच दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे त्यांना आपली राहती घरं सोडून मदत केंद्रामध्ये आश्रयाला जावे लागते.
पावसामुळे घरं उद्ध्वस्त झाल्यामुळेच इथल्या नागरिकांनी वादग्रस्त नागरिकत्व कायद्याला विरोध केला होता. पावसाळ्यात सामान वाहून गेल्यानंतर कागदपत्रे कहाळ झाल्यामुळेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करू शकत नसल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत आलेल्या पुराचा फटका मोठ्या प्रमाणात भारतासह, नेपाळ आणि बांगलादेशलाही बसला होता.
भारतात आसामसह बिहारमध्ये महापुरामुळे जवळपास 100 लोकांचा मृत्यू झाला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)