You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुकाराम मुंढे यांच्याविरोधात महिलेची तक्रार; महिला आयोगाची नोटीस #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.
1. तुकाराम मुंढेंविरोधात महिलेची तक्रार, महिला आयोगाची नोटीस
नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या कंपनी सेक्रेटरी असलेल्या महिलेनं मॅटर्निटी बेनिफिट नाकारल्याबद्दल आणि मानसिक छळ तसंच अपमानास्पद वागणुकीची तक्रार राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली होती.
या वागण्यावर आक्षेप घेत मुंढे यांना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावली आहे. सात दिवसात योग्य तो अहवाल सादर करावा असंही म्हटलं आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे नागपूर स्मार्ट अँड सस्टनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीईओपदाचा कार्यभार आहे. मुंढे हे नेहमी इतर अधिकाऱ्यांपुढे अपमान करतात, प्रत्येक स्त्री कर्मचाऱ्याचा अधिकार असलेली प्रसूती रजा व लाभही मला नाकारण्यात आला, असं या महिलेचं म्हणणं आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
दरम्यान नागपूर महापालिका क्षेत्रात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीवरून आयुक्त मुंढे आणि सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये वाद निर्माण झाला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचं सीईओपद बळकावल्याचा आरोप केला होता.
2. विकास दुबे आपल्यासाठी नेपाळमधील दाऊद ठरू नये- शिवसेना
कानपूर पोलीस हत्याकांडाने उत्तर प्रदेशातील एन्काऊंटर स्पेशालिस्ट सरकारची पोलखोल केली आहे. या हत्याकांडाने 40 वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातच झालेल्या नथुआपूर पोलीस हत्याकांडाच्या दु:खद स्मृतींना उजाळा मिळाला आहे.
40 वर्षांनंतरही उत्तर प्रदेशात पोलिसांना गुंड अशा पद्धतीने मारत असतील तर योगी महाराजांच्या उत्तर प्रदेशात बदललं काय? असा सवाल सामन्याच्या अग्रलेखात करण्यात आला आहे.
विकास दुबे नेपाळमध्ये फरार होऊ शकतो असा संशय असल्याने उत्तर प्रदेश पोलिसांनी सीमा सील केल्याच्या बातम्या आहेत. या पार्श्वभूमीवर विकास दुबे आपल्यासाठी नेपाळमधला दाऊद ठरू नये म्हणजे मिळवलं अशी भीतीही शिवसेनेने व्यक्त केली आहे.
विकास दुबेच्या गुंडांकडून आठ पोलिसांचे निर्घृण शिरकाण झाले, त्यामुळे देश हादरला आहे. या हत्याकांडामुळे संतापलेल्या योगी प्रशासनाने दुसऱ्या दिवशी विकास दुबेचे आलिशान घर जेसीबी लावून जमीनदोस्त केलं. हे घर अनधिकृत होते असं सांगण्यात येतंय. अनधिकृत घर तोडलं ते बरंच झालं पण शहीद पोलिसांच्या उद्धवस्त घराचं काय? उत्तर प्रदेशात ठिकठिकाणी कोणाच्या तरी आश्रयाने जी गुंडांची घरं उभी राहिली आहेत ती यापूर्वीच उद्धवस्त केली असती तर 2 जुलैची दुर्देवी घटना घडली नसती असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
3. मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाचा दिवस आहे. वैद्यकीय पदव्युतर परीक्षा अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाच्या विरोधी याचिकांवर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेतं या प्रश्नांची उत्तरं मंगळवारी (7 जुलै) न्यायालयात मिळेल.
मागच्या वेळी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाला स्थगिती द्यायला नकार दिला होता. पण सोबतच हा अंतरिम निर्णय असून, याचं भवितव्य अंतिम निकालावर अवलंबून असेल असं सांगितलं होतं. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.
पदव्युतर मेडिकल अभ्यासक्रमाची प्रक्रिया 30 जुलैपर्यंत संपत आहेत. मराठा आरक्षणाच्या विरोधात जयश्री पाटील यांची मूळ याचिका आहे. मराठा आरक्षण चळवळीतले कार्यकर्ते विनोद पाटील यांनी हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्यात यावं अशी मागणी केली आहे.
4. AIIMS मध्ये कोरोनाबाधित पत्रकाराची आत्महत्या; चौकशीचे आदेश
AIIMS मध्ये 37वर्षीय पत्रकाराने ट्रॉमा सेंटरच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या पत्रकाराला कोरोनाचा संसर्ग झाला होता. या कथित आत्महत्येप्रकरणी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी चौकशीचे आदेश दिलेत. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
पत्रकाराला ट्रॉमा सेंटरच्या पहिल्या मजल्यावर दाखल करण्यात आलं होतं. तिथून त्याने खिडकी तोडून उडी मारली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं.
हा पत्रकार एका हिंदी वर्तमानपत्रासाठी काम करत होता. काही दिवसांपूर्वीच त्याला ब्रेन ट्यूमर झाला होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
5. टाटांकडून मुंबई मनपाला 10 कोटी, 100 व्हेंटिलेटर्स, 20 अँम्ब्युलन्स
कोरोना संकटाची तीव्रता लक्षात घेऊन टाटा समूहाने मुंबई महानगरपालिकेला प्लाझ्मा थेरपीसाठी दहा कोटींचे अर्थसहाय्य, 100 व्हेंटिलेटर्स आणि 20 अँम्ब्युलन्स अशी मदत केली आहे. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.
समाजातील प्रत्येक घटक एकत्र येऊन जेव्हा संकटाशी मुकाबला करतात त्यावेळी यश नक्कीच मिळते. त्याच जिद्दीने कोरोनाशी लढा देताना टाटा समूहासारख्या उद्योग संस्था शासनाच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत. आपण कोरोना लढाईत नक्कीच विजयी होऊ असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
दरम्यान हे साहित्य वापरण्याची वेळ येऊ नये अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो असं मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)