You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लॉकडाऊन: घरापासून दोन किमी संचाराची अट रद्द, मुंबईकरांच्या नाराजीनंतर पोलिसांची माघार #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1) घरापासून दोन किमी संचाराची अट रद्द
कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांनी घराबाहेर फिरण्याबाबत काही अटी लागू केल्या होत्या.
त्यातील घरापासून केवळ दोन किलोमीटर परिघातच प्रवासाची मुभा देणाऱ्या अटीवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अखेर ही अट रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
राज्य सरकारनं अट रद्द करताना, लोकांना आवाहन केलंय की, कुठलीही खरेदी करायची असल्यास घराजवळच करावी. तसंच, मुंबई पोलिसांनाही अट रद्दबाबतची सूचना देण्यात आली आहे.
घराबाहेर दोन किमीच्या परिघातल्या संचाराबाबतच्या अटीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. राज्याचे गृहमंत्रीही यांनीही मुंबई पोलिसांच्या या अटीबद्दल आक्षेप नोंदवला, त्यानंतर मुंबई पोलिसांनी सुधारित आदेश जारी केला.
"प्रवासासाठी फक्त दोन किमी अंतराची अट घालण्याच्या आदेशावर प्रतिक्रिया उमटली होती. त्यामुळेच घराजवळ खरेदी करण्याचा पर्याय असावा, अशी सूचना मुंबई पोलिसांना करण्यात आली आहे. लोकांनीही घराजवळच खरेदीसाठी जावे," असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
2) निमलष्करी दलांमध्ये लवकरच CRPF मध्ये तृतीयपंथीयांची भरती होणार
निमलष्करी दलांमध्ये लवकरच तृतीयपंथीय व्यक्तींचीही भरती केली जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं CRPF, ITBP, SSB आणि CISF या दलांकडून याबाबत सूचना आणि शिफारशी मागवल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) परीक्षेच्या नियमांमध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे.
आयटीबीपी, बीएसएफ, एसएसबी, सीआरपीएफ यांचा समावेश निमलष्करी दलांमध्ये होतो. भारतच्या सीमांसह देशांतर्गतही हे दल कार्यरत असतात.
3) राज्यसभेचं पावसाळी अधिवेशन: 127 खासदार सभागृहात, बाकी 'ऑनलाईन'
संसदेच्या पावसाळी अधिवेशनांना आता सुरुवात होईल. राज्यसभेचं पावसाळी अधिवेशन ऑगस्ट महिन्यात किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला होणं अपेक्षित आहे.
मात्र, कोरोनाचं संकट पाहता, शारीरिक अंतर राखून अधिवेशन घेण्यासाठी राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी बैठक घेतली. त्यात अधिवेशन कसं घेता येईल, यासंबंधी चर्चा झाली. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
राज्यसभेच्या मुख्य सभागृहात सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करून 127 खासदारांच्या बसण्याची व्यवस्था होऊ शकते. तसंच, मीडिया गॅलरी वगळता इतर ठिकाणीही खासदार बसू शकतात. इतर खासदार ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अधिवेशनात सहभागी होऊ शकतात.
काही खासदारांना सेंट्रल हॉल किंवा बालयोगी ऑडिटोरियममधून व्हर्च्युअली सहभागी करून घेतले जाऊ शकते.
राज्यसभेसह लोकसभेचं पावसाळी अधिवेशनही सुरु होईल. लोकसभेच्या अधिवेशनाचंही नियोजन कसं केलं जातंय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
4) भारतानं आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूकबंदी 31 जुलैपर्यंत वाढवली
कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार लक्षात घेता, भारताच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवरील बंदी 31 जुलैपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
भारतात लॉकडाऊन लागू झाल्यापासून हवाई वाहतूक बंद आहे. विशिष्ट दिवसांच्या अंतरानं आंतराराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद ठेवण्यात येत होती. आता 15 जुलैपर्यंत वाहतूक बंद होती. मात्र, कोरोनाची गंभीर स्थिती पाहता, पुन्हा एकदा 15 दिवसांनी बंदी वाढवण्यात आलीय.
देशाअंतर्गत हवाई वाहतूक मात्र अधिक सुरळीत करण्याकडे सरकारचा कल दिसून येत आहे. कारण देशाअंतर्गत आधी 33 टक्के हवाई वाहतूक सुरू होती, ती आता 45 टक्क्यांवर पोहचली आहे.
5) शिर्डीतील गुरुपौर्णिमा रद्द, साईदर्शनालाही बंदी
लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त मोठा सोहळा असतो. मात्र, यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, गुरुपौर्णिमा रद्द करण्यात आली आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
शिर्डीतील गुरुपौर्णिमा सोहळा रद्द करण्याचं पत्र नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना दिलं.
सोहळा रद्द करण्यासह साईदर्शनालाही बंदी घालण्यात आली आहे.
दरवर्षी लाखो भाविक गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईदर्शनासाठी शिर्डीत दाखल होत असतात. राज्यभरातून पालख्याही शिर्डीत येतात. मात्र, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे चित्र पाहायला मिळणार नाही.
हेही नक्की वाचा
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)