कोरोना रुग्णसंख्या: राजेश टोपे म्हणतात मृत्यू लपवायचे असते, तर नंतर का जाहीर केले असते? #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1) कोरोना: मृत्यू लपवायचे असते, तर नंतर का जाहीर केले असते? - टोपे

मुंबईतील कोरोनाचे मृत्यू लपवल्याचा आरोप भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिलंय.

"मृत्यू लपवायचे असते, तर नंतर जाहीर करण्याचे तरी काय कारण होते? अनेकदा मृत्यू झालेल्या रुग्णाचा अहवाल येण्यास उशीर होतो. तो अहवाल आल्यानंतरच आपण त्याला कोरोनाग्रस्त घोषित करतो," असं राजेश टोपे म्हणाले. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत टोपेंनी फडणवीसांना हे उत्तर दिलं.

उशिरा अहवाल आल्यानंतर डॉक्टरांनी प्रशासनाला कळवणं, प्रशासनानं आम्ही प्रेस रिलिज करतो तिथं कळवणं, यात कधी कधी उशीर लागतो, असंही टोपे म्हणाले.

2) कोरोना: डेक्सामेथासोनसंबंधी प्रोटोकॉल सरकारकडून जाहीर

भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं मेथिलप्रेडनिसोलोनला पर्याय म्हणून डेक्सामेथासोन औषधाच्या वापरास परवानगी दिलीय. कोरोनासंदर्भात आरोग्य मंत्रालयानं क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल जाहीर केले. त्यात डेक्सामेथासोनसंदर्भात माहिती दिली. द हिंदूनं ही बातमी प्रसिद्ध केलीय.

डेक्सामेथासोन औषध मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यास यशस्वी ठरल्याचं समोर आलंय. कोरोनामुळे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना मृत्यूच्या दारातून परत आणण्यास हे औषध यशस्वी ठरल्याची उदाहरणं समोर आल्यानंतर आता भारतातही हे औषध वापरले जाईल.

यूकेमध्ये डेक्सामेथासोनची पहिली चाचणी झाली होती. या चाचणीत हे औषध मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यात प्रभावी असल्याचं लक्षात आलं.

3) चिनी मालाची आयात रोखल्यास भारतीय उद्योजकांना फटका बसेल - गडकरी

चीनमधून आयात होणाऱ्या मालाला बंदरांवर रोखल्यास भारतीय उद्योजकांना फटका बसेल, अशी भीती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्ती केलीय. त्यांनी क्विंटला दिलेल्या मुलाखतीत चीनसंदर्भात भाष्य केलं.

गडकरी म्हणाले, "केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांना यासंदर्भात पत्र पाठवलं आहे. चीनमधून आयात होणारा माल बंदरांवर रोखल्यास भारतीय उद्योजकांना फटका बसेल. त्यामुळे चीनमधून आयात रोखायचीच असेल तर कर वाढवला पाहिजे."

काही अडचणी आहेत, मात्र आम्ही त्या सोडवू, असंही यावेळी गडकरींनी नमूद केलं.

आयातीपेक्षा निर्यातीला प्रोत्साहन देऊन अर्थव्यवस्था बळकट केली पाहिजे. कारण त्यामुळे नवीन रोजगारनिर्मिती होईल आणि भारताचा जीडीपी वाढण्यासही मदत होईल, असंही गडकरी म्हणाले.

4) पूर्व लडाखमध्ये 'आकाश' क्षेपणास्त्र तैनात

भारत-चीन सीमेवरील प्रत्यक्ष सीमारेषेजवळ चीनच्या हालचाली वाढल्यानंतर भारतानंही महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. भारतानं 'आकाश' हे क्षेपणास्त्र पूर्व लडाखमध्ये तैनात केलंय. टाइम्स नाऊनं ही बातमी दिलीय.

भारत-चीनमधील प्रत्यक्ष सीमारेषेवर चीनचे हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमानांच्या हालचाली वाढल्यानंतर भारतातनं तातडीनं पावलं उचलली आहेत.

पिपल्स लिबरेशन आर्मी (चिनी सैन्य) कडून कुठल्याही प्रकरणाचा गैरप्रकार झाल्यास तो थांबवण्यासाठी खबरदारी म्हणून हे क्षेपणास्त्र लडाखमध्ये तैनात करण्यात आलंय.

5) जगातील इतर देशांच्या तुलनेत भारत कोरोनाशी चांगलं लढतंय - मोदी

जगातील इतर कुठल्याही देशांच्या तुलनेत भारत कोरोना व्हायरसशी चांगल्या पद्धतीनं लढतंय, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिलीय.

"संपूर्ण जग जागतिक आरोग्य संकटाशी लढतंय. कोरोना केवळ आपल्या जीवाशी खेळणारा शारीरिक आजार नाही, तर आपल्या आरोग्यास अहितकारक जीवनशैलीवर बोट ठेवणाराही आजार आहे," असंही मोदी यावेळी म्हणाले.

कोरोनाशी लढण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत चांगल्या स्थानी आहे. भारतात रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचे प्रमाणा) सुद्धा चांगला आहे, असंही मोदींनी नमूद केलं.

दुसरीकडे, भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येनं 5 लाखांचा टप्पा पार केलाय. काल दिवसभरात आतापर्यंतचे एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण (18 हजार 552 रुग्ण) सापडले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)