You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी लडाखमधील आपला भूभाग परत केव्हा मिळवणार - सोनिया गांधी
चीनने लडाखमधला बळकावलेला आपला भूभाग पंतप्रधान नरेंद्र मोदी परत केव्हा मिळवणार आहेत, असा सवाल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी उपस्थित केला आहे.
एक व्हीडिओ प्रसिद्ध करत त्यांनी म्हटलं की, "लडाखमधील आपल्या भूभागात कुणीच शिरलेलं नाही, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. असं असेल तर आपल्या 20 जवानांचा मृत्यू कसा काय झाला?"
"लडाखमधील आपला भूभाग आपण केव्हा परत मिळवणार आहोत, हे देशाला माहिती करून घ्यायचं आहे. तसंच चीननं गलवान खोऱ्यात आणि पॅँन्गॉग त्सो तलावाच्या परिसरात नवीन बांधकाम केलं आहे का, तेसुद्धा जाणून घ्यायचं आहे. या प्रकरणात पंतप्रधान देशाला विश्वासात घेणार आहे की नाहीत," असाही सवाल सोनिया गांधीनी उपस्थित केला आहे.
लडाखमधील गलवान खोऱ्यात 15 जून रोजी झालेल्या 20 भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन्ही देशांतील संबंधांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या काही सॅटेलाईट फोटोंवरून चीननं भारतीय भागात घुसखोरी केल्याचा दावा करण्यात आला आहे. वेगवेगळ्या संस्था आणि मीडिया हाऊसेसनं हा दावा केला. त्यात नेमकं किती तथ्या आहे हे तुम्ही इथं वाचू शकता - गलवान खोऱ्याच्या सॅटेलाईट इमेजमध्ये नक्की काय दिसतंय?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही व्हीडिओ प्रसिद्ध करून मोदींवर निशाणा साधला आहे.
ते म्हणाले, पंतप्रधान मोदी तुम्ही खरं काय ते सांगायला हवं, तुम्ही सगळं काही देशाला सांगायला हवं, यात घाबरण्यासारखं काहीच नाही.
"चीननं जर आपल्या भूभागावर ताबा मिळवला नाही असं जर पंतप्रधान बोलत असतील तर त्याचा चीनलाच फायदा होईल. पण, आपण एकत्र येत याविरुद्ध लढायला हवं आणि चीनला तिथून बाहेर काढायला हवं. त्यामुळे न घाबरता तुम्ही सत्य काय ते सांगायला हवं. चीननं आपल्या भूभागावर कब्जा मिळवला आहे, असं मान्य करा आणि चीनला आम्ही हुसकावून लावण्यासाठी काम करू तेही सांगा," असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सोनिया गांधी यांच्या व्हीडिओनंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी #SpeakUpForOurJawans हॅशटॅग अंतर्गत नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)